कोरोनाग्रस्ताला हॉस्पिटलच्या बसने वाटेतच सोडले, दुसऱ्या दिवशी आढळला मृतदेह
रुग्ण बसस्थानकापर्यंत कसा पोहोचला याबद्दल आपल्याला कोणतीही माहिती दिली नसल्याचा दावाही रुग्णाच्या कुटुंबीयांनी केला आहे. (Gujarat Corona Patient Body Found on Bus Stand)
गांधीनगर : गुजरातमधील अहमदाबाद सिव्हील हॉस्पिटलचा भयंकर गलथानपणा समोर आलेला आहे. कोरोनाबाधित रुग्णाला घरी क्वारंटाइन होण्यासाठी पाठवलेल्या हॉस्पिटलच्या बसने वाटेतच सोडले. दुसऱ्या दिवशी पोलिसांना या रुग्णाचा मृतदेह बस स्टँडवर आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी या प्रकरणी तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. (Gujarat Corona Patient Body Found on Bus Stand)
रुग्णाच्या कुटुंबाला कोणत्याही संरक्षणात्मक उपाययोजना न देताच मृतदेह स्वत: स्मशानभूमीकडे नेण्यास भाग पाडले गेले. रुग्ण बसस्थानकापर्यंत कसा पोहोचला याबद्दल आपल्याला कोणतीही माहिती दिली नसल्याचा दावाही रुग्णाच्या कुटुंबीयांनी केला आहे.
संबंधित रुग्णाला 10 मे रोजी अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलच्या कोविड आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल केले होते. त्याला श्वसनाचा त्रास होता आणि कोविड19 ची इतर लक्षणेही आढळली होती. त्यांची ‘कोरोना’ व्हायरस चाचणी घेतल्याच्या तीन दिवसांनंतर मुलाला ईमेलद्वारे त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याच कळवलं होतं.
“तीन दिवस मला माझ्या वडिलांच्या तब्येतीविषयी माहिती मिळत नव्हती. कारण कोणालाही आयसोलेशन वॉर्डात जाण्याची परवानगी नाही आणि रुग्णालयाने मला घरी जाण्यास सांगितले होते” असं मयत वृद्धाच्या मुलाने सांगितलं. अहमदाबादजवळच्या डॅनिलिम्डा भागात हा तरुण टेक्सटाईल मिलमध्ये मजुरी करतो.
हेही वाचा : लॉकडाऊनदरम्यान कसाबसा गावी पोहोचला, क्वारंटाईन केलेल्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
15 मे रोजी सकाळी दहा वाजता मला डॅनिलिम्डा पोलिस स्टेशनमधून फोन आला. अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलपासून 6 किमी अंतरावर असलेल्या एसव्हीपी हॉस्पिटलच्या पोस्टमॉर्टम रुममधून वडिलांचा मृतदेह नेण्यास सांगितल्याचं तो म्हणाला. (Gujarat Corona Patient Body Found on Bus Stand)
“पोलिसांना माझ्या वडिलांचा मृतदेह आदल्या रात्री तीन वाजता डॅनिलिम्डा बीआरटीएस बस थांब्यावर आढळला. त्यांनी तो एसव्हीपी रुग्णालयात नेला. जेव्हा माझे कुटुंब तिथे पोहोचले, तेव्हा पोस्टमार्टम आधीच झाले होते. रुग्णालय प्रशासन म्हणते, की वडिलांचा मृत्यू कोविड19 मुळे झाला, परंतु आम्हाला अद्याप अहवाल मिळालेला नाही. त्यांचा मृत्यू केव्हा किंवा कुठे झाला, याची आम्हाला कल्पना नाही.” असं मुलगा काकुळतीने म्हणाला.
“एसव्हीपी रुग्णालयातून मृतदेह स्मशानभूमीत नेण्यासाठी आम्हाला बॉडी बॅग किंवा रुग्णवाहिका देण्यात आली नव्हती. आम्ही शरीर झाकण्यासाठी प्लास्टिक विकत घ्यायला दीड हजार रुपये खर्च केले. वॉर्डबॉयने पार्थिवावर जंतुनाशक फवारण्यासाठी आणखी दोनशे रुपये घेतले”, असा दावा त्यांच्या मुलाने केला. “आम्हाला मृतदेह स्वतःच स्मशानभूमीत न्यावा लागला. जेव्हा आम्ही मास्क आणि हातमोजे मागितले, तेव्हा रुग्णालयाने आम्हाला ते विकत घेण्यास सांगितले, जे आम्हाला शक्य झाले नाही” असा दावाही मृताच्या मुलाने केला.
(Gujarat Corona Patient Body Found on Bus Stand)