गुजरातमध्ये काँग्रेसला अक्षरश: गाडलं, आप, एमआयएमची टक्कर, वाचा अंतिम निकाल सविस्तर
गुजरातमधील 31 जिल्ह्यांमधील जिल्हा पंचायतींवर भाजपचा झेंडा फडकला आहे. | Gujrat loacal body elections
अहमदाबाद: गुजरातमध्ये नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने (BJP) काँग्रेसला अक्षरश: भुईसपाट केले आहे. गुजरातमधील 31 जिल्ह्यांमधील जिल्हा पंचायतींवर भाजपचा झेंडा फडकला आहे. याशिवाय, 81 महापालिकांमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर तालुका स्तरावरील 231 प्रभागांपैकी 200 तालुका पंचायतींवरही भाजपने आपले वर्चस्व स्थापन केले आहे. 28 फेब्रुवारीला पार पडलेल्या या निवडणुकांचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. (Gujrat Rural bodies elections results 2021)
काही दिवसांपूर्वी गुजरातमधील बड्या महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या होत्या. यामध्येही भाजपने बाजी मारली होती. भाजपने 2015 साली पाटीदार आंदोलनानंतर काँग्रेसच्या ताब्यात गेलेल्या सहा महानगरपालिकांची सत्ता पुन्हा मिळवली होती.
तर 2015 मध्ये 31 पैकी 24 जिल्ह्यांमध्ये पंचायत निवडणुकांमध्ये भाजपला फटका बसला होता. तर तालुका स्तरावर 228 पैकी 138 पंचायतींमध्ये भाजपने सत्ता गमावली होती. मात्र, त्यावेळी निमशहरी भागांमध्ये भाजपने आपली सत्ता राखण्यात कसेबसे यश मिळवले होते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत भाजपने दणदणीत यश मिळवून या पराभवाचे उट्टे फेडले आहे.
काँग्रेसचं पानिपतं, ‘आप’चा उदय
गुजरातमधील महापालिका निवडणुकांपाठोपाठ पंचायत स्तरावरील निवडणुकीतही काँग्रेस पक्ष आणखी गाळात गेला आहे. काँग्रेसला अवघ्या एका जिल्हा पंचायतीमध्ये यश मिळाले. त्यामुळे आता ग्रामीण भागातूनही काँग्रेसची पाळेमुळे उखडली गेली आहेत. तर दुसरीकडे गुजरातच्या राजकारणात आम आदमी पक्षाचा (आप) उदय होताना दिसत आहे. नुकत्याच झालेल्या सुरत महानगरपालिकेत ‘आप’ने 27 जागांवर विजय मिळवत विरोधी पक्षाचे स्थान काबीज केले होते. तर ग्रामीण भागात ‘आप’ने 2,097 जागा लढवून 42 जागांवर यश मिळवले.
एमआयएमकडे विरोधी पक्षनेतेपद
अरवल्लीच्या मोडासा नगरपालिकेत एमआयएमने 8 जागा जिंकल्या आहेत. या ठिकाणी एमआयएमने अवघे 12 उमेदवार उभे केले होते. या पैकी 8 जागा एमआयएमने जिंकल्या आहेत. विशेष म्हणजे मोडासा नगरपालिकेतील काँग्रेसकडे असलेलं विरोधी पक्षनेतेपदही एमआयएमने स्वत:कडे खेचून आणलं आहे. त्यामुळे काँग्रेसच्या तंबूत खळबळ उडाली आहे.
एमआयएमचं प्रस्थ वाढतंय?
बिहार विधानसभा निवडणुकीत एमआयएमने पाच जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर हैदराबाद नगरपालिकेच्या निवडणुकीतही मोठं यश मिळवलं होतं. आता गुजरातच्या नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीतही एमआयएमने मोठा विजय मिळवून सर्वच राजकीय पक्षांना धडकी भरवली आहे. एमआयएमचं देशातील प्रस्थ वाढू लागल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात. त्यामुळे पश्चिम बंगालसह पाच राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही एमआयएम विजयाची मालिका सुरू ठेवणार का? असा सवाल केला जात आहे.
संबंधित बातम्या:
प्रशांत किशोर पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे नवे सल्लागार; एक रुपया पगार घेऊन देणार सल्ला
लालूंचा आदेश, भाजपला रोखण्यासाठी तेजस्वी यादव पश्चिम बंगालच्या मैदानात!
… आणि काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी व्यासपीठावरून निघून गेले; बंगालमध्ये बनते बनते बिगड गयी बात!
(Gujrat Rural bodies elections results 2021)