माझ्या मुलींना किडनॅप केलंय…छोट्या पडद्यावरील ‘कृष्णा’च्या कुटुंबात ‘महाभारत’; थेट मुख्यमंत्र्यांकडेच IAS बायकोची तक्रार
महाभारत या मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका करून घराघरात पोहोचलेले प्रसिद्ध अभिनेते नीतीश भारद्वाज सध्या कौटुंबीक कलहातून जात आहेत. त्यांनी त्यांची सनदी अधिकारी असलेल्या आधीच्या पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत. पत्नीने आपला मानसिक छळ केल्याचा आरोप करतानाच पत्नीने माझ्या दोन्ही मुलींचं अपहरण केलं आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांकडेही तक्रार केल्याचं अभिनेत्याने म्हटलं आहे.
भोपाळ | 15 फेब्रुवारी 2024 : टीव्हीवरील प्रसिद्ध महाभारत मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेल्या अभिनेता नितीश भारद्वाज यांच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यात महाभारत घडलं आहे. नितीशी भारद्वाज यांनी त्यांची पूर्वीची पत्नी आणि मध्यप्रदेशातील आयएएस अधिकारी स्मिता भारद्वाज यांच्याविरोधात गंभीर आरोप केले आहेत. पत्नीकडून मानसिक छळ होत आहे. माझ्या दोन्ही जुळ्या मुलींशी मला भेटू दिलं जात नाही. माझ्या मुलींचं अपहरण केलं आहे, असे गंभीर आरोप नीतीश भारद्वाज यांनी केले आहेत. थेट मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी तक्रार केली आहे.
नीतीश भारद्वाज यांनी मीडियाशी संवाद साधताना जे जे घडलंय ते स्पष्ट केलं आहे. पत्नीच्या छळाची आपण मुख्यमंत्र्यांकडेही तक्रार केली आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांना मी भेटलो होतो. त्यांना संपूर्ण प्रकरण सांगितलं. त्यांच्यासमोर पुरावेही दिले आहेत. माझी पत्नी वरिष्ठ आयएएस अधिकारी आहे. त्यामुळे ती तिच्या पदाचा आणि अधिकाराचा गैरफायदा उचलू शकते. पोलिसांवर दबाव टाकू शकते, असं मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. आवश्यकता भासल्यास मदत करू, असं मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं आहे, अशी माहिती नीतीश भारद्वाज यांनी दिलीय.
मानसिक संतुलन ढासळल्याची चौकशी करा
पत्नीचं मानसिक संतुलन बिघडल्याचा संशयही नीतीश यांनी व्यक्त केलाय. मला माझ्या दोन मुलींची चिंता आहे. कारण मला माझ्या मुलींपासूनच चार वर्षापासून दूर ठेवलं गेलं आहे. त्यामुळे मी माझ्या मुलींचं अपहरण केलं आहे असं म्हणू नको का? खोटं बोलून लोकांची सहानुभूती मिळवणं ही या महिलेची सवय आहे. त्यामुळे तिच्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. गेल्या चार वर्षापासून तिने मला माझ्या मुलींपासून दूर ठेवलंय. ही चांगली वर्तवणूक नाही. ही ऑबेसिव्ह वर्तवणूक आहे. तिची ही वर्तवणूक पाहून तिचं मानसिक संतुलन ठिक नाही असं मला वाटतंय. फॅमिली कोर्ट अॅक्टच्या सेक्शन 12 नुसार तिच्या मानसिक स्थितीची चौकशी करण्याची मी मागणी केली आहे, असंही ते म्हणाले.
मुलींवर विपरीत परिणाम होऊ शकतो
ही महिला माझ्या मुलांचा मानसिक छळ करत आहे. 12 ते 13 वर्षापासून माझाही मानसिक छळ होत आहे. त्यामुळे पुन्हा तिच्याशी संसार थाटायला मला वेड लागलेलं नाही, असं नितीश म्हणाले. मुलींना भेटायचं असेल तर माझ्या घरी या असं स्मिता भारद्वाज यांनी सांगितले आहे. असं पोलीस आयुक्तांनी मला सांगितलं. मी त्यांना म्हणालो, मला माझ्या मुलींना भेटायला बोलवायचंच असेल तर पोलीस ठाण्यात बोलवा, तसेच मीडियाने माझ्या मुलीचे फोटो दाखवू नयेत. सोशल मीडियातही माझ्या मुलीचे फोटो व्हायरल करू नयेत ही माझी विनंती आहे. असं केल्यास त्याचा मुलींवर विपरीत परिणाम होऊ शकतो, असंही त्यांनी सांगितलं.
मला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न
तिचं घर चुकीच्या ठिकाणी आहे. तिथे ती माझ्यावर कोणतेही चुकीचे आरोप लावू शकते. त्यामुळे मी तिथे चक्रव्यूहमध्ये अडकण्यासाठी का जाऊ? मी ऊटीतील शाळेला सांगितलं की मी माझ्या मुलींना भेटायला येईन. त्यावेळी तुमच्या शाळेचा काऊंन्सीलर किंवा प्रिन्सिपल तिथे उपस्थित असायला हवा. म्हणजे मी माझ्या मुलींना ज्या पद्धतीने भेटलो त्यात काही चुकीचं नव्हतं हे दिसलं पाहिजे. त्यावर तिने मला उत्तर दिलंय. मी मुलींना एकांतात भेटावं असं त्यांनी मेलमध्ये म्हटलं आहे. जर मी चुकीचा आहे, असं तिला वाटतंय तर ती मला मुलींना एकांतात का भेटायला देत आहे. माझ्यावर गंभीर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची ती संधी शोधत आहे. पण मला तिच्या कोणत्याही जाळ्यात फसायचं नाहीये, असंही त्यांनी सांगितलं.