अहमदाबाद: गुजरात विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असतानाच काँग्रेसला (congress) मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस नेते हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. फक्त राजीनामा देऊनच हार्दिक पटेल थांबले नाहीत. तर राजीनामा देतानाच त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. हार्दिक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून राजीनाम्याची घोषणा केली आहे. तसेच काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. हार्दिक गेल्या काही महिन्यांपासून पक्षात नाराज झाले होते. मधल्या काळात तर त्यांनी भाजपची (bjp) स्तुती केली होती. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. शिवाय हार्दिक पटेल काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याची जोरदार चर्चा होती. अपेक्षेनुसार त्यांनी आज पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे पटेल आता भाजपमध्ये जाणार की आम आदमी पार्टीत की पाटीदार समाजाचं संघटन उभारून स्वतंत्र राजकारण करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आज मैं हिम्मत करके कांग्रेस पार्टी के पद और पार्टी की प्राथमिक सदस्यता से इस्तीफा देता हूँ। मुझे विश्वास है कि मेरे इस निर्णय का स्वागत मेरा हर साथी और गुजरात की जनता करेगी। मैं मानता हूं कि मेरे इस कदम के बाद मैं भविष्य में गुजरात के लिए सच में सकारात्मक रूप से कार्य कर पाऊँगा। pic.twitter.com/MG32gjrMiY
— Hardik Patel (@HardikPatel_) May 18, 2022
हार्दिक पटेल यांनी ट्विट करून राजीनामा दिला आहे. यात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नावाने एक पत्रं लिहिलं आहे. त्यात त्यांनी आपल्या राजीनाम्याची कारणमीमांसा केली आहे. आज मी हिंमत करून काँग्रेस पक्षाचे पद आमि पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. माझे सहकारी आणि गुजरातची जनता माझ्या या निर्णयाचं स्वागत करतील. या निर्णयानंतर मी गुजरातसाठी सकारात्मक रित्या काम करेन असा मला विश्वास आहे, असं हार्दिक यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
हार्दिक पटेल यांना गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष बनवण्यात आले होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून ते काँग्रेस नेतृत्वावर नाराज होते. त्यांनी अनेकदा आपली नाराजीही व्यक्त केली होती. एखाद्या नवरदेवाची नसबंदी करावी अशी माझी काँग्रेसमध्ये अवस्था झाली आहे, असं त्यांनी म्हटलं होतं. आपल्याला पक्षात निर्णय घेण्याचा कोणताही अधिकार नसल्याचं त्यांना सांगायचं होतं. मात्र, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधींवर आपली नाराजी नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होत. राज्य नेतृत्वावर आपली नाराजी असल्याचं ते म्हणाले होते.