जन्मठेपेची शिक्षा भोगतोय ‘तो’ दहशतवादी, पत्नी होणार मंत्री, काय खेळला असा मोठा गेम?
दोन वेगवेगळ्या प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याच्या कारवाया 'दुर्मिळातील दुर्मिळ' असल्याने त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी NIA ने केली आहे.
इस्लामाबाद : त्याची आणि तिची पहिली भेट 2005 मध्ये झाली. काश्मिरी फुटीरतावादी चळवळीचा तो कार्यकर्ता होता. या चळवळीला पाठिंबा मिळवण्यासाठी तो इस्लामाबादला गेला होता. तेथे एका कार्यक्रमात त्याने फैज अहमद फैज यांची ‘हम देखेंगे’ ही लोकप्रिय कविता म्हटली. याच कार्यक्रमात त्याची आणि तिची भेट झाली. ती त्याच्यापेक्षा 20 वर्षांनी लहान. पण, एकमेकांच्या प्रेमात पडले आणि 2009 मध्ये त्यांनी लग्न केले. पण, त्यानंतर इतका बदल झाला की तो दहशतवादी ठरला. त्याला जन्मठेप झाली. इकडे ती राजकारणात उतरली आणि आता ती मंत्री होत आहे.
काश्मीरमधील फुटीरतावादी नेता आणि टेरर फंडिंग प्रकरणात यासिन मलिक जेलमध्ये आहे. त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. यासीन याच्यावर दहशतवादी आणि फुटीरतावादी कारवायांमध्ये सामील असल्याचा आरोप आहे. भारत सरकारविरुद्ध युद्ध पुकारणे या आयपीसी कलम १२१ अंतर्गत त्याला दोषी ठरवण्यात आले आहे.
गेल्या वर्षी एनआयए कोर्टाने यासिन मलिक याला टेरर फंडिंग प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तर, ट्रायल कोर्टानेही UAPA च्या कलम 121 आणि कलम 17 (टेरर फंडिंग) अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दोन वेगवेगळ्या प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याच्या कारवाया ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ असल्याने त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी NIA ने केली आहे.
यासीन याला या दोन प्रकरणाव्यतिरिक्त अन्य पाच खटल्यांमध्ये दहा दहा वर्षे आणि तीन वेगळ्या प्रकरणात पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याशिवाय 1990 मध्ये हवाई दलाच्या चार जवानांची हत्या, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांची मुलगी रुबिया सईद हिचे अपहरण केल्याचाही त्याच्यावर आरोप आहे.
यासीन मलिक याची पत्नी मुशाल हुसैन
यासिन मलिकची पत्नी मुशाल हुसैन हिचा जन्म पाकिस्तानात झाला. तिचे वडील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ज्ञ तर आई पाकिस्तान मुस्लिम लीगच्या महिला विंगच्या माजी सरचिटणीस. मुशाल उत्तम चित्रकार असून काश्मीरमधील लोकांच्या दयनीय स्थितीचे चित्रण करणारी तिने काढलेली अनेक चित्रे प्रसिद्ध आहेत.
जागतिक शांतता आणि सौहार्दासाठी काम करणाऱ्या पाकिस्तानच्या पीस अँड कल्चर ऑर्गनायझेशन या संस्थेच्या मुशाल अध्यक्षा आहेत. यासिन मलिक याला जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतर पत्नी मुशाल हुसैन यांनी पाकिस्तान नेते आणि आंतरराष्ट्रीय संस्थांकडे दाद मागितली. आपला पती निर्दोष आहे. त्याला वाचवा असे आवाहन त्यांनी केले होते.
मुलगी रझिया हिचा पंतप्रधान मोदी यांच्यावर आरोप
यासीन मलिक याची ११ वर्षांची मुलगी रझिया सुलतान हिने पाकव्याप्त काश्मीर (मुझफ्फराबाद) च्या संसदेत आपले वडील निर्दोष आहेत. त्यांनी आयुष्यभर काश्मीरसाठी काम केले. काश्मीरच्या कल्याणाचे त्यांनी स्वप्न पाहिले. त्यामुळे काश्मीरने एकत्र येऊन आपल्या वडिलांच्या सुटकेची मागणी करावी असे ती म्हणाली होती. माझ्या वडिलांचे काही नुकसान झाल्यास पंतप्रधान मोदी यांनाच मी जबाबदार धरेन. वडिलांना फाशी दिल्यास तो भारतावरील काळा डाग ठरेल अशा शब्दात रझिया हिने आरोप केला.
मुशाल होणार मंत्री
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे देशाचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून अन्वर उल हक काकर यांच्य्कडे पदभार देण्यात आला आहे. पंतप्रधान काकार यांच्या मंत्रिमंडळामध्ये मानवाधिकार विषयावरील विशेष सहाय्यक मंत्री म्हणून मुशाल हुसेन यांना पदभार देण्यात येणार आहे. म्हणजेच पाकिस्तानच्या अंतरिम सरकारमध्ये त्या आता मंत्री होणार आहेत.