Himachal Rain : कुल्लूमध्ये ढगफुटी, 4 जण बेपत्ता; पूल, घरे, रेस्टॉरंट आणि कॅम्पिंग साइट वाहून गेले
बुधवारी सकाळी शिमला, सोलन, सिरमौर, बिलासपूर आणि कांगडा येथे येत्या 48 तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

कुल्लू : हिमाचल प्रदेशात बुधवारी मान्सूनने उग्र स्वरूप धारण केले आहे. कुल्लू (Kullu) जिल्ह्यातील मणिकर्ण खोऱ्यात ढगफुटी (Cloudburst) झाली असून चार जण बेपत्ता (Missing) झाले आहेत. पुरामुळे कॅम्पिंग साईट वाहून गेली आहे. कुल्लूचे एडीएम प्रशांत सरकई यांनीही या घटनेला दुजोरा दिला आहे. कुल्लूच्या मणिकर्ण खोऱ्यातील चोज गावात ढगफुटी झाली असून स्थानिक नाल्याला आलेल्या भीषण पुरामुळे चार लोक वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. चार जण बेपत्ता झाल्याची माहिती लोकांनी प्रशासनाला देण्या आली आहे. तसेच काही घरेही पाण्याखाली गेली असून, गावाकडे जाणाऱ्या पुलाला तडे गेले आहेत. मलाणा येथे धरणात बुडून महिलेचा मृत्यू झाला आहे.
घरांचेही नुकसान
कुल्लू प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता झालेल्यांची ओळख पटली आहे. रोहित ( मंडी सुंदरनगर), कपिल (राजस्थान पुष्कर), रोहित चौधरी (धर्मशाला), अर्जुन (कुल्लू बंजार) अशी बेपत्ता झालेल्यांची नावे आहेत. याशिवाय या परिसरात सहा ढाबे, तीन कॅम्पिंग साइट, एक गोशाळा आणि त्यात बांधलेल्या चार गायी वाहून गेल्या आहेत. त्याचबरोबर गेस्ट हाऊसमध्येही मलबा शिरला आहे. तसेच इतर काही घरांचेही नुकसान झाले आहे.
येत्या 48 तासांत मुसळधार पावसाचा इशारा
गावकऱ्यांनी कुल्लू प्रशासनालाही याबाबत माहिती देण्यात आली आहे. माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे पथकही घटनास्थळी रवाना झाले आहे. गुरुवार रात्रीपासून कुल्लूमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. कासोलजवळही डेब्रिज रस्त्यावर आले आहे. त्याचबरोबर मलाणा येथील धरणाच्या जागेचे मोठे नुकसान झाले आहे. हिमाचलमधील हवामान विभागाने बुधवारी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर गुरुवारपासून तीन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. बुधवारी सकाळी शिमला, सोलन, सिरमौर, बिलासपूर आणि कांगडा येथे येत्या 48 तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाने लोकांना नदी-नाल्यांजवळ न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. पावसाळ्याच्या पहिल्याच आठवड्यात हिमाचलमध्ये 40 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये रस्ते अपघातांचाही समावेश आहे. आतापर्यंत 1 कोटी 32 लाख रुपयांहून अधिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. (Heavy rain in Himachal Pradesh, cloudburst in Kullu district, 4 missing)


