Vande Bharat Express | मुंबईहून सुरु होऊ शकतो वंदेभारतचे हे व्हर्जन, या मार्गावर चालविण्याची योजना
सध्या वंदेभारत एक्सप्रेस 25 राज्यात सुरु आहेत. वंदेभारत ही देशाची पहिली सेमी हायस्पीड ट्रेन आहे. हिला स्वतंत्रपणे इंजिन जोडण्याची गरज लागत नाही. तिला आरामदायी प्रवासासाठी आणखीन आधुनिक करण्याचे काम सुरु आहे.
मुंबई | 21 जुलै 2023 : वंदेभारत एक्सप्रेसचा स्लीपर कोच व्हर्जन ( Vande Bharat Express ) तयार केला जात आहे. देशाची पहिली वंदेभारत तयार करणाऱ्या चेन्नईच्या आयसीएफ फॅक्टरीच ( ICF Factory ) वंदेभारतचे शयनयान श्रेणीचे मॉडेल ( Sleeper Coach ) तयार केले जात आहे. या ट्रेनला आता देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईतून सुरु करण्याची योजना आहे. पाहूया कोणत्या मार्गावर वंदेभारतचा स्लीपर कोच सुरु करण्याची तयारी सुरु आहे.
देशाची पहिली सेमी हायस्पीड ट्रेन वंदेभारत दिल्ली ते वाराणसी मार्गावर सुरु करण्यात आली. आतापर्यंत देशातील विविध मार्गावर 25 वंदेभारत सुरु करण्यात आल्या आहेत. वंदेभारत ही इंजिनलेस वीजेवर धावणारी लक्झरीय ट्रेन असून तिला आतापर्यंत चेअरकारची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे लांबच्या प्रवासासाठी तिचा फायदा होत नाही. त्यामुळे वंदेभारतचे स्लीपर कोच व्हर्जन तयार केले जात आहे.
वंदेभारतचा स्लीपर कोच प्रोटोटाईप चेन्नईतील इंटिग्रेल कोच फॅक्टरीत तयार केला जात आहे. या वंदेभारत स्लीपर कोच व्हर्जनला सध्या फायद्याच्या मार्गावर चालविण्याची योजना आहे. मुंबई ते दिल्ली मार्गावर सध्या पश्चिम रेल्वेच्या तेजस एक्सप्रेसचा स्लीपर कोच चालविण्यात येत आहे. त्याला आता वंदेभारत स्लीपर कोचमध्ये रिप्लेस केले जाऊ शकते.
प्रवास 12 तासांवर आणणार
मुंबई ते दिल्ली दरम्यान प्रवासाला सध्या 16 तास लागतात. आता हा प्रवास 12 तासांवर आणण्याची तयारी सुरु आहे. त्यासाठी रेल्वे रुळांची क्षमता वाढविण्याच्या कामाला 2017-18 मध्ये मंजूरू मिळाली होती. मुंबई सेंट्रल ते नागदा या 694 किमी अंतराचे काम सुरु आहे. बडोदा आणि अहमदाबाद दरम्यान 100 किमी अंतरावर काम सुरु आहे, त्यासाठी 3,227 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. रुळांभोवती 570 किमीच पोलादी कुंपण आणि 195 किमीची संरक्षक भिंत उभारण्याचेही काम सुरु आहे.
सुरुवातीला 9 स्लीपर कोच
मुंबई ते अहमदाबाद 474 किमीचे कुंपणाचे काम झाले आहे. नागदा ते मथुरापर्यंत पश्चिम मध्य रेल्वे 545 किमीचे काम करीत आहे, मथुरा ते पालीवल 82 किमीचे काम उत्तर मध्य रेल्वे तर पलवल ते दिल्ली 57 किमीचे काम उत्तर रेल्वे करीत आहे. आयसीएफने 86 वंदेभारत तयार करण्याचे कंत्राट मंजूर केले आहे. त्यातील 9 ट्रेन स्लीपर कोचवाल्या असतील. येत्या चार वर्षांत 400 वंदेभारत सुरु करण्याची योजना आहे.