13 डिसेंबर 2001 रोजीचा संसदेवरील हल्ला नेमका कसा झाला ? नेमकं काय घडले त्या दिवशी
संसदेवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याला आज 22 वर्षे पूर्ण होत असतानाच अधिवेशन सुरु असताना पासेसवर शिरलेल्या दोघा तरुणांनी संसदेत प्रेक्षा गॅलरीतून उडी मारीत गोंधळ घातला. यामुळे संसदेवर 13 डिसेंबर 2001 रोजी झालेल्या हल्लाच्या कटु स्मृतींचा पट पुन्हा नजरेसमोर आला आहे.
मुंबई | 13 डिसेंबर 2023 : देशातील लोकशाहीचे मानबिंदू समजल्या जाणाऱ्या संसदेवर 13 डिसेंबर 2001 रोजी अमानूष दहशतवादी हल्ला झाला होता. या घटनेला आज 22 वर्षे पूर्ण होत आहेत. आजच्या दिवशी संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु असताना पांढऱ्या एम्बेसेडर कारचा वापर करीत संसदेत अतिरेकी घुसले आणि त्यांनी ए.के.47 ने अंधाधुंद गोळीबार केला होता. या हल्ल्यात संसदेची सुरक्षा करणारे कर्मचारी आणि दिल्ली पोलिस असे एकूण नऊ जण शहीद झाले तर 15 जण जखमी झाले. या हल्ल्याप्रकरणात प्रमुख आरोपी अतिरेकी मोहम्मद अफझल गुरु याला 9 फेब्रुवारी 2013 रोजी फासी देण्यात आली होती.
संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु असताना सकाळी पाच दहशतवाद्यांनी संसदेत पांढऱ्या रंगाच्या अॅम्बेसिडरमधून आले होते. त्यांना संसदेच्या आवारातील सुरक्षा दलांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न करताचे त्यांच्यावर अतिरेक्यांनी फायरिंग करीत त्यांना ठार केले. सुरक्षा दलांनी स्वत:च्या प्राणाची आहुती देऊन पाचही दहशतवाद्यांना ठार केले. या हल्लात दिल्ली पोलिसांचे पाच जवान, सीआरपीएफची एक महिला कॉन्स्टेबल आणि संसदेचे दोन गार्ड शहीद झाले. हल्ल्याच्या काही मिनिटांपूर्वी तत्कालिक पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि विरोधी पक्षनेत्या सोनिया गांधी संसंदेच्या बाहेर पडल्या होत्या. परंतू उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, भाजपा नेते प्रमोद महाजन सेंट्रल हॉल परिसरात होते. या सर्वांना तात्काळ संसदेतील एका गुप्तस्थळावर हलविण्यात आले.
अफजल गुरुला फाशी !
संसदेवरील हा हल्ला लश्कर – ए- तयब्बा आणि जैश-ए- महम्मदच्या या पाकपुरस्कृत दहशतवादी संघटनेने केला होता. संसदेवर हल्ला करून सर्व खासदार आणि मंत्र्यांना ओलीस ठेवण्याची दहशतवाद्यांची योजना होती. परंतू संसदेतील सुरक्षा रक्षकांच्या प्रसंगावधानाने दहशतवाद्याची योजना तडीस गेली नाही. या प्रकरणात 6 डिसेंबर 2002 रोजी मोहम्मद अफजल गुरु, शौकत हुसैन, अफसान आणि सय्यद अब्दुल रहमान गिलानी यांना अटक करून खटला उभारण्यात आला होता. या हल्ल्याचा प्रमुख मास्टर माईंड मोहम्मद अफजल गुरु याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. अफजल गुरु याला 9 फेब्रुवारी 2013 रोजी दिल्लीतील तिहार तरुंगात फासावर चढविण्यात आले.