Chandrayaan 3 : चंद्रयान 3 मिशनसाठी किती खर्च झाला? या मोहिमेतील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जाणून घ्या
इस्रोचं चंद्रयान मिशन यशस्वी झाल्यानंतर प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावली आहे. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येक भारतीयाला हे मिशन यशस्वी व्हावं असं वाटत होतं आणि झालंही तसंच..चला जाणून मोहिमेच्या खर्चापासून सर्वकाही

मुंबई : भारताच्या चंद्रयान 3 नं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग केलं आहे. चंद्रयान 3 च्या यशानंतर भारताने स्पेस पॉवर असल्याचं जगाला दाखवून दिलं आहे. इस्रोच्या या कामगिरीने भारतीयांनी आनंद व्यक्त केला आहे. ठिकठिकाणी नागरिकांनी जल्लोष केला. तसेच मिठाई वाटत आनंद साजरा केला. लँडर विक्रमने चंद्राच्या पृष्ठभागावर ठाण मांडताच आपलं काम सुरु केलं आहे. चंद्रावर पोहोचताच विक्रम लँडरने पहिला मेसेज पाठवला आहे. “मी माझ्या ठिकाणी व्यवस्थितरित्या पोहोचलो आहे”, असा संदेश लँडरने पाठवला आहे. लँडर आणि रोवर आपली मोहीम पूर्ण करण्यासाठी सौरउर्जेचा वापर करणार आहे. या मोहिमेंतर्गत पुढच्या काळात चंद्राबाबतची महत्त्वाची माहिती हाती लागणार आहे. त्यामुळे भविष्यात या अभ्यासाचा खूप फायदा होणार आहे.
चंद्रयान 3 चा प्रवास कधीपासून सुरु झाला?
इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने (इस्रो) चंद्रयान 3 मिशन 14 जुलैला लाँच केलं गेलं. 14 जुलैला चंद्रयान झेपावलं. आंध्रप्रदेशच्या श्रीहरीकोट येथून जीएसएलव्ही मार्क 3 (एलव्हीएम 3 ) हेवी लिफ्ट लाँच व्हेईकलच्या माध्यमातून दुपारी 2.35 मिनिटांनी लाँच केलं गेलं.
चंद्रयान मिशन किती दिवसांचं आहे?
चंद्रयान 3 मिशन 14 दिवसांचं आहे. कारण चंद्रावरील एक दिवस पृथ्वीच्या 14 दिवसांच्या बरोबर असतो. त्यानंतर 14 दिवस रात्र असणार आहे. त्यामुळे मिशन लँडिंगनंतर 14 दिवसापर्यंत काम करेल.
चंद्रयान 3 मिशनसाठी किती खर्च आला?
चंद्रयान 3 मोहिमेसाठी 615 कोटी रुपये खर्च आला. इतर स्पेस मिशनच्या तुलनेत हा खर्च खूपच कमी आहे. चंद्रयान 3 च्या तुलनेत रशियाच्या लूना 25 मिशनसाठी 1500 कोटीहून अधिक खर्च आला.
चंद्रयान 3 चंद्रावर कुठे उतरलं?
चंद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलं आहे. आतापर्यंत अशी कामगिरी करणारा भारत हा पहिला देश आहे. जगातील बलाढ्य देशांना अशी कामगिरी करणं जमलं नाही. या ठिकाणी लँडिंग करणं खूपच कठीण आहे. तसेच इथलं तापमान -230 डिग्रीच्या आसपास आहे. दक्षिण ध्रुवावर पाणी इतर खनिज असल्याचं बोललं जात आहे.
लँडिंगनंतर चंद्रयान काय करणार?
चंद्रच्या दक्षिण ध्रुवावर लँडरनं सॉफ्ट लँडिंग केलं आहे. आता पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी रोवर बाहेर आलं असून रिसर्च सुरु झालं आहे. रोवर पृष्ठभागावरील पदार्थांचा अभ्यास करेल. उष्णता आणि चंद्रावरील घडामोडींचा आढावा घेईल.