पत्नीच्या प्रेमासमोर झुकला पती, 8 वर्षांच्या नात्यानंतर प्रियकराकडे सोपवलं.!
लग्नाला आठ वर्ष उलटून गेल्यानंतर पतीला त्याच्या बायकोचे दुसऱ्यावर प्रेम आहे समजलं. त्याने सर्वांसमोर तिला प्रियकराकडे सोपवलं.
कोलकाता | 21 ऑगस्ट 2023 : हम दिल दे चुके समन आठवतोय ? त्यामध्ये नंदिनीचं (पत्नी) दुसऱ्या कोणावर प्रेम आहे हे समजल्यावर वनराज (पती) तिला तिच्या प्रियकराकडे सोपवण्यासाठी जीवाचं रान करतो. तशीच एक घटना पश्चिम बंगालमध्ये घडली आहे. पत्नीच्या प्रेमासमोर अखेर पती झुकला आणि लग्नानंतर आठ वर्षांनी त्याने तिला तिच्या प्रियकराकडे सुपूर्त केलं.
पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यातील हरिश्चंद्रपूर तुलसीहाता भागात ही घटना घडली. प्रेमापोटी ही महिला आपल्या पाच वर्षांच्या मुलाला आणि पतीला सोडून शेजारी राहणाऱ्या लोहारासोबत पळून गेली होती. काही महिन्यांनंतर दोघेही गावी परतले, मात्र याची गावात जोरदार चर्चा झाली. तेव्हा पतीला शेजाऱ्यांकडून बायकोबद्दल अनेक टोमणे ऐकावे लागायचे. अखेर याबाबत गावात पंचायतीची बैठक झाली. तेव्हा पतीने सर्वांसमोर पत्नीला तिच्या प्रियकराकडे सोपवले. यानंतर त्या महिलेला तिच्या प्रियकरासोबत कौटुंबिक जीवन सुरू करण्यासाठीही सामाजिक ‘स्वीकृती’ मिळाली. तिच्या पतीने ग्रामसभेत विभक्ततेच्या मुद्द्यावर जाहीर शिक्कामोर्तब केले.
आठ वर्षांनंतर केले प्रियकराकडे सुपूर्त
त्या दोघांच्याही लग्नाला आठ वर्ष झाली होती, मात्र त्या महिलेचे दुसऱ्या इसमावर प्रेम होते. त्याच्याही घरी पत्नी आणि दोन मुलं आहेत. मात्र तरीही त्याने आपल्या प्रेयसीसोबत नवी सुरूवात केली.
मालदा येथील तुलसीहाता परिसरात राहणारे मोतीलाल यांचा विवाह बिहारमधील आबादपूर जवळील एका गावातील स्वप्ना हिच्याशी आठ वर्षांपूर्वी झाला होता. मोतीलाल हे गवंडी आहेत. त्या दोघांनाही एक मुलगा आहे.
गेल्या वर्षभरापासून त्यांना स्वप्ना हिच्या वागण्यावर संशय येत होता. ती बहिणीच्या घरी जाते असं सांगून तिथे ५-७ दिवस राहू यायची. एवढंच नव्हे तर ती रात्री उशीरापर्यंत कोणाशी तरी मोबाईलवर बोलत असे. मोतीलाल म्हणाले, “ती अनेकदा मोबाईलवर बोलायची. ती कोणाशी बोलत आहे, ते मला समजत नव्हते. मी तिच्याकडून मोबाईल घेतला. मग एक दिवस अचानक ती घरातून पळून गेली.
ग्रामपंचायतीने दिली मंजूरी
त्याच गावात लोहाराचे काम करणारे तपस यांच्या घरी पत्नी आणि दोन मुले आहेत. तपस अधूनमधून दिल्लीला काम करत असे. पंचायत सभेच्या बैठकीत गावकऱ्यांच्या उपस्थितीत तपसने सपनासोबत एक वर्षापासून संबंध असल्याचे सांगितले. कधी कधी स्वप्नासोबत तो हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये जायचा, हेही त्याने सांगितले.
शनिवारी झालेल्या बैठकीत, स्वप्नानेही तिचे तपस सोबत संबंध असल्याचे कबूल केले. त्यानंतर तिच्या पतीने , स्वप्नाला तपस याच्याकडे सोपवले.