‘मला माझ्या पत्नीचा चेहरा पाहायला आवडते…,’ ९० तास काम वादावर आनंद महिंद्र यांचा टोला
प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्र यावेळी म्हणाले की ही चर्चा चुकीच्या दिशेने जात आहे. तासांची मोजणी महत्वाची नसून कामाचे आऊटपुट महत्वाचे असावे. ४० तास असोत किंवा ९० तास, प्रश्न असा आहे की तुम्ही कोणते आउटपुट देत आहात?
लार्सन अण्ड टुब्रोचे चेअरमन एस.एन. सुब्रह्मण्यम यांनी आठवड्यातून ९० तास काम करण्याचा सल्ला भारतीय कर्मचाऱ्यांना दिला आहे. त्यावरुन वाद निर्माण झाला आहे. या वादाची सुरुवात इन्फोसिसचे सह संस्थापक एन्.आर. नारायण मूर्ती यांच्या वक्तव्याने झाली होती. ताज्या वादात सुब्रह्मण्यम यांनी कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून ९० तास काम करावे, हवे तर रविवारी देखील काम करावे, घरी राहून बायको किंवा नवऱ्याचे तोंड किती काळ पाहणार त्यापेक्षा काम केले तर चीनच्या स्पर्धेला तोंड देता येईल अशा आशयाचे वक्तव्य केल्यानंतर दोन दिवसांपासून यावर देशभरातून प्रतिक्रीया येत आहेत. समाजाच्या विविध घटकांकडून सुब्रह्मण्यम यांच्या वक्तव्यावर सोशल मीडियातून टीका होत आहे. यावर आता उद्योजक आनंद महिंद्र यांनी उपरोधिक टोला लगावला आहे.
महिंद्र ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिद्र यांनी या मुद्द्यावर आपली बाजू मांडली आहे. कामाच्या गुणवत्तेवर भर द्यायला हवा आणि तासनतास काम करण्यापेक्षा आऊटपुटवर लक्ष केंद्रीत करायला हवे असे ते म्हणाले. दिल्ली येथे ‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग २०२५’ या संमेलनाला महिंद्र संबोधित करत होते. त्यावेळी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना आनंद महिंद्र यांनी ‘वर्क लाईफ बॅलन्स’ आणि एसएन सुब्रह्मण्यम यांच्या विधानावर आपली भूमिका मांडली. हा वाद चुकीच्या दिशेला जात आहे. येथे तासांची मोजणी करायला नको. तर कामाचे आऊटपुट काय आहे हे महत्वाचे आहे. ४० तास काम करा किंवा ९० तास काम करा. प्रश्न आहे की आऊटपुट काय देत आहात ? जर तुम्ही कुटुंबाला वेळ देत नाही. मित्र परिवारात वेळ घालवत नाहीत. वाचत नाहीत किंवा नवीन काही विचार करीत नाहीत तर योग्य निर्णय कसे घेणार ? तुम्ही दरवेळी एकाच दबावाखाली कसे काम करणार असेही ते म्हणाले.
येथे पोस्ट पाहा –
‘मेरी पत्नी बहुत ही अच्छी हैं। मैं उनको देखता रहता हूँ. बहस Quality Of Work पर होनी चाहिए, Quantity पर नहीं’
L&T प्रमुख के ‘90 घंटा काम’ ‘बीवी को कब तक देखोगे’ जैसे बयान पर बोले Industrialist @anandmahindra pic.twitter.com/qhf9Kh93qg
— Sanket Upadhyay (@sanket) January 11, 2025
माझी बायको खूप छान आहे, तिला पाहून मला खूप आनंद होतो..
सोशल मीडियावरील त्यांच्या सक्रीयतेबद्दल विचारले असता, आनंद महिंद्र म्हणाले की, मला अनेकदा विचारले जाते की मी सोशल मीडियावर किती वेळ घालवतो. मी X (पूर्वी ट्विटर) किंवा सोशल मीडियावर यासाठी आलो नाही की एकटा आहे. माझी बायको खूप छान आहे, मला तिला पाहायला आवडते. मी सोशल मीडियावर मित्र बनवण्यासाठी नाही तर सोशल मीडियाचा वापर व्यवसायाचे साधन म्हणून करण्यासाठी आलो आहे असेही ते म्हणाले. मी नारायण मूर्ती आणि इतरांचा आदर करतो. परंतू माझ्याबद्दल गैरसमज नकोय, ही चर्चा चुकीच्या दिशेने जात आहे. कामाच्या दर्जावरच आपण अधिक चर्चा करायला हवी. त्यामुळे ४० की ९० तास काम केले, हे महत्त्वाचे नाही. तुम्ही १० तास चांगले काम करु शकता. जग बदलू शकता असेही ते म्हणाले.