जम्मूच्या अखनूर येथे LoC जवळ IED स्फोट, दोन जवान झाले शहीद
जम्मूच्याअखनूर सेक्टरमध्ये आयईडी स्फोटात दोन जवान शहीद झाले आहेत. लालेलीत बाडजवळ सर्च ऑपरेशन सुरु असतानाच आयईडी ब्लास्ट होऊन दोन जवान शहीद झाले आहेत.

कायम दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असलेल्या कश्मीर येथील अखनूर सेक्टरमध्ये एलओसीजवळच्या भट्टल परिसरात लष्कराचे जवान गस्त घालत असताना एका ब्लास्ट होऊन दोन जवान गंभीर झाले. प्राथमिक माहितीनुसार हे जवान गस्त घालत असताना आयईडी ब्लास्ट ( इम्प्रोवाईज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस) होऊन त्यात या दोघा जवानांचा मृत्यू झाला आहे. ब्लास्टनंतर संपूर्ण परिसराची घेराबंदी केलेली आहे.
अखनूर सेक्टरच्या नामंदर गावाजवळ सापडले मोर्टार शेल
अखनूर येथे झालेल्या स्फोटात दोन जवान शहीद झाल्याने खळबळ उडाली असताना अखनूर सेक्टरमध्ये एक मोर्टार शेल देखील सापडला आहे. या शेलला बॉम्ब नाशक पथकाने निष्क्रिय केले आहे. नामंदर गावाजवळ प्रतापनगर ओढ्यात स्थानिकांना हा सुरुंग गोळा सापडला. याची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले. त्यानंतर बॉम्ब नाशक पथकाने या सुरुंग निष्क्रिय केला आहे.
जम्मू रिजनला टार्गेट
कश्मीर रिजनमध्ये नाकेबंदी झाल्यानंतर आता अतिरेकी संघटना आणि त्यांना पोसणारा पाकिस्तान लागोपाठ जम्मू रिजनला टार्गेट करण्याचा डाव रचत आहे. या महिन्यात जम्मू रिजनच्या राजौरी जिल्ह्यात केरी सेक्टरमध्ये एलओसी जवळ घुसखोरीचा प्रयत्न अतिरेक्यांनी केला होता. त्याचा सुगावा लागताच सतर्क जवानांनी मोर्चा सांभाळत घुसखोरीचा डाव हाणून पाडला आहे.




देवदारच्या झाडात शस्रसाठा
अतिरेक्यांची कंबर मोडणाऱ्या लष्कराने आधी कश्मीर झोनच्या बारामुल्ला येथे शस्रास्र आणि दारुगोळा जप्त केला आहे. लष्कर आणि पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत नेजीले येथील उडी सेक्टरच्या अंगनपथरीच्या जंगलात सर्च ऑपरेशन केले. या दरम्यान तीन एके – ४७ रायफल, ११ मॅगझिन, २९२ काडतूस, एक अंडर बॅरल ग्रेनेड लाँचर, नऊ ग्रेनेड आणि अनेक हँड ग्रेनेड जप्त केले आहेत. हा शस्रसाठा देवनार वृक्षाच्या पोकळ ढोलीत लपवून ठेवली होती.