Train Ticket : रेल्वे प्रवाशांना हे माहिती असणं गरजेचं, जर तिकीट हरविले तर काय करायचं, पुन्हा तिकीट काढायचं? काय आहे नियम
रेल्वेने प्रवासाला निघालाय आणि तिकीटच हरवलं तर काय करायचं, प्रवास करता येतो का ? काय आहे रेल्वेचा नियम पाहा
नवी दिल्ली | 28 ऑगस्ट 2023 : रेल्वे प्रवासात तिकीट काढून प्रवास करायचा असतो. अधिकृत तिकीटाशिवाय प्रवास केल्यास आपल्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. प्लॅटफॉर्मसाठी देखील स्वतंत्र तिकीट ( Train Ticket ) काढावी लागते. परंतू काही वेळा तिकीट काढल्यानंतर ती हरविली जाण्याचा प्रकार घडतो. तेव्हा रेल्वे प्रवाशांना प्रचंड टेन्शन येऊ शकते. प्रवासी संकटात सापडतात. तिकीट घरी विसरले ( Train Ticket Lost ) असेल किंवा आरक्षित तिकीट विसरले असेल तुम्हाला प्रवास करण्याचा अधिकार आहे की नाही ? जर ट्रेनमध्ये आपण तसेच चढलो तर दंड भरावा लागतो का ? पाहूयात काय आहेत यासंदर्भात नियम…
रेल्वेचा प्रवास करताना तिकीट जर हरविले तर काही चिंता करण्याची गरज नाही. तिकीट हरविले तर तुम्ही डुप्लिकेट तिकीट काढून प्रवास करु शकता. वेगळ्या – वेगळ्या श्रेणीच्या डुप्लीकेट तिकीटाचे नियम वेगवेगळे आहेत. प्रवासी ट्रेनमध्ये तिकीट तपासणीसाकडे ( टीटीई) जाऊन त्यांच्याकडून डुप्लिकेट तिकीट बनवू शकता. तिकीट काऊंटरवरही डुप्लीकेट तिकीट मिळवू शकता.
डुप्लीकेट तिकीटाचा नियम
भारतीय रेल्वेची अधिकृत वेबसाईट indianrail.gov.in अनूसार डुप्लिकेट तिकीट बनविण्यासाठी तुम्हाला काही शुल्क भरावे लागू शकते. सेंकड आणि स्लीपर क्लासचे डुप्लिकेट तिकीट तयार करायला 50 रुपये. त्यावरील श्रेणीसाठी डुप्लीकेट तिकीट तयार करायला 100 रुपये फि द्यावी लागते. जर रिझर्व्हेशन चार्ट तयार झाल्यानंतर कन्फर्म तिकीट हरविले तर भाड्याच्या 50 टक्के शुल्क भरावे लागते. जर हरविलेले तिकीट सापडले तर आपण दोन्ही तिकीटे दाखवून काऊंटरवरून डुप्लीकेट तिकीटासाठी भरलेले पैसे परत मिळवू शकता.
तर डुप्लीकेट तिकीट बनवता येत नाही
जर काही कारणाने तिकीट कन्फर्म झाल्यानंतर फाटले तर डुप्लीकेट तिकीट भाड्याचे 25 टक्के शुल्क भरुन तयार करता येते. परंतू जर वेटींगलीस्टचे तिकीट हरविले असेल किंवा फाटले असेल तर डुप्लीकेट तिकीट तयार करता येत नाही.