26 वर्षांच्या नोकरीत केवळ एकच दांडी, या कर्मचाऱ्याने केला नवा रेकॉर्ड
एकीकडे बऱ्याच कॉर्पोरेट कार्यालयात पाच दिवसांच्या आठवड्याचा नियम राबविला जात आहे. कर्मचाऱ्यांना अधिक आराम देऊन त्यांची कार्यक्षमता वाढविण्याचे प्रयोग होत आहेत, तर दुसरीकडे एका कर्मचाऱ्याने आपल्या 26 वर्षांच्या करीयरमध्ये केवळ एकच दिवस रजा घेतली आहे. त्याच्या एक दिवसाचा अपवाद वगळता सलग काम करण्याच्या विक्रमाची नोंद घेण्यात आली आहे.
उत्तर प्रदेश | 11 मार्च 2024 : एकीकडे पाच दिवसांचा आठवडा करण्याची चर्चा सुरु असताना एका कर्मचाऱ्याने सलग 26 वर्षात केवळ एका सुटीचा अपवाद वगळता सतत ड्यूटी करण्याचा अनोखा विक्रम स्थापित केला आहे. उत्तर प्रदेशातील बिजनौर येथे राहणारे तेजपाल सिंह यांनी सलग ड्यूटीवर येऊन केलेल्या नव्या विक्रमाची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे. तेजपाल यांनी आपल्या करीयर मध्ये केवळ एकच दिवस सुट्टी घेतली आहे. कोणताही सण असो किंवा रविवार ते आपल्या कारखान्यात नेमाने हजर राहीले आहेत.
उत्तर प्रदेशातील बिजनौर येथील रहिवासी असलेल्या तेजपाल सिंह हे 1995 पासून एका शुगर फॅक्टरीत काम करतात. त्यांना वर्षाला 45 सुट्ट्या मिळतात. परंतू त्यांनी केवळ एकच सुट्टी घेतली आहे. आपल्या मर्जीने मी कामावर येत गेलो आणि हा रेकॉर्ड झाल्याचे तेजपाल सांगतात. कॉर्पोरेट जगतात आठवड्याचे कमी दिवस जादा तास काम करुन विकेण्ड दीर्घ रजा घेऊन कर्मचाऱ्यांची उत्पादकता आणि कार्यकुशलता वाढविण्याच्या चर्चा सुरु आहेत. अशा वातावरणात तेजपाल सिंह यांचा कामसूपणाची चर्चा होत आहे.
तेजपाल सिंह कोण
द्वारिकेश शुगर इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये तेजपाल सिंह यांनी 26 डिसेंबर 1995 मध्ये प्रशिक्षणार्थी क्लार्क म्हणून प्रवेश केला होता. कंपनी साप्ताहिक सुट्ट्या आणि सणाच्या सुट्ट्या मिळून वर्षाला एकूण 45 हक्काच्या सुट्ट्या देते. परंतू तेजपाल यांनी 1995 ते 2021 पर्यंत एकही सुट्टी घेतली नाही. आपल्या करीयरमध्ये एकमेव सुट्टी त्यांनी 18 जून 2021 रोजी एकमेव सुट्टी घेतली होती, ती त्यांचा धाकटा भाऊ प्रदीप कुमार यांच्या लग्नासाठी घेतली होती.
संयुक्त कुटुंब
तेजपाल सिंह यांच्या अनोखा रेकॉर्डला ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये समाविष्ट केले आहे. तेजपाल यांचे संयुक्त कुटुंब आहे. त्यांना दोन लहान भाऊ आहेत.संपूर्ण कुटुंब एकत्र राहते. तेजपाल यांना चार मुले आहेत. दोन मुले आणि दोन मुली. तेजपाल सिंह नेहमी वेळेवर कार्यालयात पोहोचतात आणि वेळेवर घरी येतात. परंतू स्वत: हून सुटी घेत नाहीत.