भोपाळ : वारंवार पैशाची मागणी करणाऱ्या सहा वर्षांच्या गरीब मुला (Boy)ची एका पोलिस हेडकॉन्स्टेबल (Police Head Constable)ने गळा दाबून हत्या (Murder) केली. मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली असून या घटनेने संपूर्ण राज्यभर खळबळ उडाली आहे. आरोपीने मृतदेह आपल्या कारमध्ये टाकून शेजारच्या ग्वाल्हेर जिल्ह्यातील एका निर्जन ठिकाणी फेकून दिला. बुधवारी या धक्कादायक घटनेची माहिती मध्य प्रदेश पोलिसांनी प्रसारमाध्यमांना दिली. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या घटनेचा अधिक तपशील पत्रकारांना सांगितला. या घटनेने रक्षक भक्षक बनल्याचे कटू सत्य अधोरेखित केले आहे.
घटनेबाबत दतिया जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अमन सिंह राठोड यांनी पत्रकारांना सांगितले की, हत्येची घटना 5 मे रोजी घडली. ग्वाल्हेरच्या पोलीस ट्रेनिंग स्कूलमध्ये तैनात हेड कॉन्स्टेबल रवी शर्माला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. आरोपी शर्मा हा 4 मे रोजी दतिया प्राईड डे ड्युटीसाठी दतिया येथे आला होता. त्याची ड्युटी पंचशील नगरजवळ होती. त्याचवेळी हत्या झालेला मुलगा त्याच्याकडे वारंवार पैशाची मागणी करीत होता. आरोपी शर्माने त्याला दम दिल्यानंतरही तो पळत नव्हता. त्यामुळे अनेक महिन्यांपासून डिप्रेशनमध्ये असलेल्या आरोपी शर्माने अखेर मुलाचा गळा आवळून खून केला.
जबाबात आरोपी शर्माने पोलिसांना सांगितले कि गेल्या अनेक महिन्यांपासून तो नैराश्य आणि मानसिक तणावाखाली आहे. त्यात गरीब मुलगा वारंवार पैसे मागून मला त्रास देत होता. त्याच रागातून मी मुलाला गाडीत नेले आणि त्याचा गळा आवळून खून केला. नंतर त्याचा मृतदेह गाडीतून ग्वाल्हेरला नेला आणि विवेकानंद तिराहा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील झाशी रोडजवळ फेकून दिला. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर आणि तपासादरम्यान मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपी शर्माला अटक करून कारसह अन्य महत्त्वाचे पुरावे त्याच्याकडून हस्तगत केले आहेत.
घटनेबाबत दतियाच्या पंचशील कॉलनीतील रहिवासी संजीव सेन यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यांचा मुलगा मयंक सेन (6) याला 5 मे रोजी अज्ञात व्यक्तीने पळवून नेले होते. त्याआधारे पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मुलाच्या शोधासाठी एक विशेष टीम तयार करण्यात आली. याचदरम्यान ग्वाल्हेरच्या झाशी रोड परिसरात 6-7 वर्षे वयोगटातील एका अनोळखी मुलाचा मृतदेह आढळून आला. नंतर या मृतदेहाची ओळख पटवण्यात आली असता तो बेपत्ता मयंकचाच मृतदेह असल्याचे उघड झाले. हा मुलगा ज्या भागातून बेपत्ता झाला होता, त्या भागातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांनी एका व्यक्तीला काही संशयास्पद हालचाली करताना पाहिले. नंतर तो आरोपी पोलीस हेड कॉन्स्टेबल शर्मा हाच असल्याचे सिद्ध झाले.