देशात कोरोना नियंत्रणात असताना दिल्लीत रुग्णांमध्ये वाढ… त्यावर तज्ज्ञ म्हणतात…
देशात कोरोनाचा हत्ती गेल्यात जमा असून केवळ शेपूटच जाण्याची बाकी असल्याचे म्हटले जात आहे. याला कारण म्हणजे देशभरात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने खाली येत आहे. नवीन व्हेरिएंटची भीती असली तरी त्याची आताच चिंता करण्याचे कारण नाही. असे सगळे असताना दिल्लीत मात्र गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाच्या सक्रीय रुग्णांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. पुढील काही दिवस महत्वपूर्ण असल्याचे सांगण्यात आले आहे.
नवी दिल्लीः देशाच्या राजधानीत कोरोनाच्या (covid) सक्रीय रुग्णसंख्येत होत असलेली वाढ काहीशी चिंताजनक आहे. एकीकडे देशभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट होत असताना तज्ज्ञांच्या मते दिल्लीत मात्र कोरोना रुग्णांमध्ये काहीसा चढ-उतार बघायला मिळत आहे. दिल्लीमध्ये 30 मार्चपर्यंत 459 सक्रीय रुग्णसंख्या होती. ती आता वाढून 488 इतकी झाली आहे. ही वाढ फार वाटत नसली तरी देशात इतर ठिकाणी कोरोनाचा आलेख कमी होत असताना दिल्लीतील वाढ मात्र विचार करण्यास भाग पाडणारी आहे. दिल्लीतील पॉझिटिव्हीटी रेटदेखील (Positivity rate) वाढत आहे. गेल्या 24 तासांमध्ये हा रेट 1.05 इतका नोंदवला गेला आहे. काही दिवसांपूर्वी हा रेट 1 पेक्षाही कमी होता. दिल्लीतील कोरोना रुग्णवाढीबाबत तज्ज्ञ म्हणतात, की दिल्लीत कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येतील. परंतु सध्या दिल्लीत कोरोना लाटेची शक्यता कमी आहे. परंतु ज्या पध्दतीने सक्रीय रुग्णसंख्येत (Active patient) वाढ होत आहे ते पाहून पुढील 10 ते 15 दिवस निर्णायक ठरणार आहेत.
दिल्लीतील कोरोना रुग्णवाढीवर एम्सचे क्रिटिकल केअर विभागातील डॉ. युध्दवीर सिंह यांच्या मते, दिल्लीत होत असलेल्या रुग्णवाढीबाबत आताच चिंता करण्याचे काही कारण नाही. कारण दिल्लीतून अनेक लोक विदेशात जात असतात. नंतर पुन्हा परतताना त्यांना कोरोनाची लागण होउ शकते. अशा वेळी ते उपचार घेण्यासाठी रुग्णालयांमध्ये दाखल होतात, त्यामुळे कोरोना रुग्णांचा आकडा वाढतो. डॉ. सिंह सांगतात, की दिल्लीत कोरोनाच्या आकड्यांमध्ये चढ-उतार दिसून येईल. परंतु असे असले तरी, पुढील काही दिवस या आकड्यांवर लक्ष ठेवावे लागेल. रुग्णवाढीचा आलेख असाच कायम राहिल्यास याची समिक्षा करावी लागेल.
चौथ्या लाटेचा धोका नाही
कोरोना तज्ज्ञ डॉ. अंशुमान कुमार यांच्या मते, किमान पुढील चार ते पाच महिने कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका राहणार नाही. ओमिक्रॉन हा नवीन व्हेरिएंट आल्यानंतर लोकांमधील रोगप्रतिकार शक्ती वाढली आहे. त्या सोबतच लसीकरणदेखील झाले आहे. काही प्रमाणात कोरोना रुग्ण वाढत असले तरी अद्याप चौथ्या लाटेचा धोका नसल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. परंतु तरीही लोकांना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे आवश्यक राहणार आहे.
दिल्लीतील आकडे असे
एकूण रुग्ण : 1865494 बरे झालेल : 1838852 दाखल रुग्ण : 488 मृत्यू : 26154
संबंधित बातम्या
‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ नांदेडमध्ये संत बाळूमामाच्या पालखीचा सोहळा थाटात संपन्न