independence day : भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील या 20 थोर महिला सेनानींना सलाम
ज्या काळात महिलांनी एकट्याने घराचा उंबरठा ओलांडू नये अशी बंधने त्यांच्यावर होती.त्याच काळात अनेक महिलांनी बंधने झुगारून ब्रिटीशांच्या सत्तेला ललकारले होते. या महिला स्वातंत्र्य सैनिकांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्वातंत्र्याचा लढा लढला होता. त्यापैकी अनेकांची नावे तुम्ही विसरला असाल तर पाहूयात कोण आहेत त्या धाडसी महिला...
भारताला अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानातून स्वातंत्र्य मिळालेले आहे. ब्रिटीशांनी आपल्या देशावर राज्य करुन आपली साधनसामुग्री लुटली. ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी व्यापाऱ्याच्या नावाखाली सन 1600 मध्ये भारतात आले आणि राज्यकर्ते बनले. त्यांच्यापासून आपल्या देशाला मुक्त करण्यासाठी महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, नेताजी सुभाष चंद्र बोस, भगत सिंह, राम प्रसाद बिस्मिल, चंद्रशेखर आझाद यासारख्या स्वातंत्र्य सैनिकांनी सर्वस्व वेचले. परंतू काही नावे आपल्याला माहिती आहेत तर काही नावे आपल्याला माहिती देखील नाहीत. स्वातंत्र्यासाठी काही महिला स्वातंत्र्य सैनिकांनी देखील आपले आयुष्य वेचले. चला या महिला स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृतीला वंदन करुया ज्यांच्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले.
1.बेगम रोयका ( Begam Royeka )
जन्म : 9 डिसेंबर, रंगपूर जिल्हा, बांग्लादेश मृत्यू : 9 डिसेंबर 1932 कोलकाता
बेगम रोयका या पहिल्या महिला स्वातंत्र्य सैनिक आहेत ज्यांनी लैंगिक समानतेचा लढा दिला. जेव्हा देशाला देखील स्वातंत्र्य मिळाले नव्हते तेव्हा त्यांनी पुरुष आणि महिला यांना समान अधिकार मिळायला हवेत हे सांगितले.त्यांनी कांदबरी, कविता,लघुकथा आणि निबंधातून या संदर्भात सातत्याने लिखाण केले.त्यांनी महिलांना योग्य शिक्षण मिळायला हवे तरच त्यांची प्रगती होईल असे त्यांनी सांगितले आणि आयुष्यभर त्यांना स्री -पुरुष समानतेसाठी लढा दिला.
2.सरोजिनी नायडू (Sarojini Naidu)
जन्म: 13 फेब्रुवारी 1879, हैदराबाद
मृत्यु: 2 मार्च 1949, लखनऊ
सरोजिनी नायडू या एक कवी होत्या आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी क्रांतीकारक होत्या. त्यांनी माहेर मुनीर हे नाटक लिहिल्याने त्यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळाली.त्या भारतीय कॉंग्रेसच्या दुसऱ्या महिला अध्यक्ष होत्या.आणि स्वातंत्र्यानंतर पहिल्या राज्यपाल देखील झाल्या. त्यांनी महात्मा गांधी यांच्या आंदोलनात स्वत:ला वाहून घेतले.मोंटगु-चॅम्सफोर्ड रिफॉर्म्स, खिलाफत चळवळ, साबरमती करार आणि सविनय कायदेभंग चळवळ मध्ये सहभाग घेतला. त्यांना राजकीय आंदोलनात उतरल्याने ब्रिटीशांनी 21 महीने जेलमध्ये ठेवले होते.
3. कित्तूर राणी चेन्नम्मा (Kittur Rani Chennamma)
जन्म: 23 ऑक्टोबर, 1778, बेळगाव
मृत्यु: 21 फेब्रुवारी 1829, बॅल्हंगल
कित्तूर राणी चेन्नम्मा भारताच्या स्वातंत्र्य सैनिक होत्या. त्यांनी घोडेस्वारी,तलवारबाजी, तिरंदाजीत व्यावसायिक प्रशिक्षण घेतले होते. त्यांचा जन्म छोट्या गावात झाला होता. देसाई कुटुंबांतील राजा मल्लासराजा यांच्याबरोबर वयाच्या 15 वर्षी त्यांचा विवाह झाला. पती आणि मुलाचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना राज्य सांभाळावे लागले.1824 मध्ये ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीपासून संस्थान वाचविले. त्या अंतिम युद्धात यशस्वी झाल्या नसल्या तरी त्यांनी सर्वांमध्ये स्वातंत्र्याचे स्फुलिंग चेतविले.
4. झलकारी बाई (Jhalkari Bai)
जन्म: 22 नोव्हेंबर 1830, झाँसी
मृत्यु : 1890, ग्वॉल्हेर
राणी लक्ष्मी बाई यांच्याबद्दल आपल्याला सर्वांना माहिती आहे. त्यांचे धाडस सर्व भारतीयांना प्रेरणादायी आहे.परंतू झलकारी बाईंबद्दल फारच थोड्या लोकांना माहिती आहे.लक्ष्मीबाई यांच्यासारख्या झलकारी बाई देखील साहसी होत्या. त्यांचा जन्म शूद्र कुटुंबात झाला. त्यांचा पराक्रम राणी लक्ष्मी बाई यांच्या सारखा आहे. झलकारी बाई यांचे दुर्गा दल नावाचे सैन्य होते. एकदा तिने जंगलात वाघाशी लढा दिला होता. तिने कु्ऱ्हाडीने वाघाचा फडशा पाडला.झॉंशीच्या लढाईत त्यांची भूमिका मोठी होती. त्यांनी स्वत:ला राणी लक्ष्मीबाई सारखे लढावू केले आणि इंग्रजांविरोधात लढा दिला.
5.उमाबाई कुंदापूर ( Umabai Kundapur)
जन्म: 1892
मृत्यु: 1992, हुबली
उमाबाई यांचे वय अवघे 9 वर्षे असताना त्यांचे लग्न लावून दिले. परंतू सासऱ्याने पाठिंबा दिल्याने उमाबाई या मुंबईतील एलेक्झेंड्रा हायस्कूलमधून शिक्षण घेतले. त्यांनी भगिनी मंडळाची स्थापना केली.हिंदुस्थानी सेवा दलाच्या महिला शाखेचे नेतृत्व देखील केले. त्यांनी इंग्रजांकडून मिळणारे सगळे मानसन्मान नाकारले. त्यांनी स्वातंत्र्य सैनिकांना ब्रिटीशांपासून वाचविले.
6.सावित्री बाई फुले (Savitri Bai Phule)
जन्म: 3 जन्म 1831, नायगांव
मृत्यु: 10 मार्च 1897, पुणे
सावित्रीबाई फुले या पहिल्या महिला शिक्षक होत्या. त्यांनी महिलांना शिक्षण देण्यासाठी आयुष्य वेचले. त्यांनी 19 व्या शतकात त्याचे पती ज्योतिबा फुले यांच्या सोबत मिळून विधवा महिलांना शिक्षण दिले.पेशवेकाळात पुण्यात समाजात महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. त्यावेळी त्यांनी महिलांसाठी शाळा काढली.तत्कालिन उच्चभ्रू समाजाने त्यांच्या अंगावर शेण, दगड फेकले.तरीही त्यांनी मुलींना शिक्षण देणे सुरुच ठेवले.
7. कॅप्टन लक्ष्मी सहगल (Capt. Laxmi Sehgal)
जन्म: 24 ऑक्टोबर 1914, मालाबार जिल्हा
मृत्यु: 23 जुलै, कानपूर
कॅप्टन लक्ष्मी सहगल यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेत भारतीय महिला रेजिमेंटचे नेतृत्व केले.त्या एक डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्त्या होत्या. 92 व्या वर्षांपर्यंत अत्यंत कमी अल्प मानधनात त्यांनी कानपूर येथे रुग्णांची सेवा केली.त्यांचा जन्म मद्रासच्या वकील कुटुंबात झाला. त्यांना पद्म विभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांनी नेताजींच्या नेतृत्वाखाली महिला रेजिमेंट स्थापन केली तिचे नाव राणी लक्ष्मीबाई झॉंशी रेजिमेंट ठेवले होते.
8.मूलमती (Moolmati)
मूलमती सर्वसाधारण महिला होती. राम प्रसाद बिस्मिल यांच्या माता होत. बिस्मिल यांनी 1928 मध्ये भगत सिंह, चंद्रशेखर आझाद, राजगुरु आणि अन्य लोकांसोबत हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोशिएशन स्थापन केले.त्यांच्या मुलाला ब्रिटीशांनी ठार केले.तरीही त्यांच्या कार्यावर याचा काही परिमामझाला आहे.
9.उदा देवी ( Uda Devi )
जन्म: लखनऊ
मृत्यु: नोव्हेंबर 1857, लखनऊ
उदा देवी या साहसी महिला होत्या. त्यांनी राणी बेगम हजरत महल यांच्याशी हातमिळवणी करीत ब्रिटीशांना हादरा दिला होता. भारतीयांना ब्रिटीश सरकार विरोधात तेव्हा प्रचंड असंतोष होता. बेगमने युद्धाच्या तयारीसाठी उदा देवी यांची मदत केली. उदा देवीनी पती सोबत युद्धात बहादूरीचे काम केले. त्या एका झाडावर चढल्या आणि त्यांनी 32 ते 36 ब्रिटीश सैनिकांची गोळ्या घालून हत्या केली.त्यांच्या बहादूरीमुळे कॅंपबेल हे अधिकारी देखील त्यांच्यासमोर झुकले. त्यांना 1857 च्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील दलित वीरांगणा म्हणून पाहीले जाते.
10.जानकी अथी नाहप्पन (Janaky Athi Nahappan)
जन्म: 1925, क्वालालंपूर, मलेशिया
मृत्यु: 2014, छेरस, क्वालालंपूर, मलेशिया
जानकी अथी नाहप्पन यांचा जन्म एका तामिळ कुटुंबात झाला. सुभाष चंद्र बोस यांनी लोकांना त्यांची संपत्ती दान करायचे आवाहन केले तेव्हा त्यांच्या कुटुंबाने आपली सोन्याची कमाई दान केली.अनेकांना त्यांच्याबद्दल माहिती नाही. परंतू मलेशियन भारतीय कॉंग्रेसच्या त्या संस्थापक सदस्य होत्या. त्या भारतीय स्वातंत्र्याची लढाई लढण्यासाठी जपान येथे स्थापन झालेल्या भारतीय राष्ट्रीय सैन्यात सामील झाल्या होत्या. त्यांना साल 2000 मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले.
11.अम्मू स्वामीनाथन (Ammu Swaminathan)
जन्म: 1894, भारत
मृत्यु: 1978, पलक्कड़ जिल्हा
अम्मू स्वामीनाथन कधी शाळेत गेली नाही.लग्नासाठी तिला जुजबी लिहायला आणि वाचायला शिकविण्यात आले.तिचा विवाह डॉ.सुब्रमण्यम स्वामिनाधन यांच्याशी झाली. त्यांनी पतीच्या मदतीने पुढील शिक्षण पूर्ण केले.भारताच्या स्वांतत्र्यासाठी लढणारा चेहरा बनली. त्यांनी भारताच्या संविधान सभेचे सदस्य म्हणून देखील काम केले. भारतीय घटनेच्या मसुदा समितीची सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले.
12. मातंगिनी हाजरी (Matangini Hazri)
जन्म: 19 ऑक्टोबर, 1870, तमलुक
मृत्यु: 29 सप्टेंबर 1942, तमलुक
मातंगिनी यांचा जन्म एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला होता. वैयक्तिक जीवनात अपशय आल्याने त्यांनी देशसेवेला वाहून घेतले. अवघ्या 18 व्या वर्षी त्यांना मुल नसताना वैध्यव्य आले. त्यांना ‘गांधी बरी’ नावाने ओळखले जायचे. ज्याचा अर्थ म्हातारी लेडी गांधी असा होता. ‘भारत छोडो’ आंदोलनात 71 वर्षांच्या मातंगिनी यांच्या सोबत सहा हजार समर्थक होते. त्यांना तमलुक पोलिस स्टेशनच्या समोर ब्रिटीशांच्या पोलिसांनी गोळी मारली होती. आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी वंदेभारतचा जयघोष सुरु ठेवत भारतीय ध्वज पकडून ठेवला.
13.नेली सेनगुप्ता (Nellie Sengupta)
जन्म: 1886, कॅम्ब्रिज, यूनायटेड किंगडम
मृत्यु: 1973, कोलकाता
नेली यांचे डाऊनिंग कॉलेजात एका युवा बंगाली विद्यार्थी जतिंद्र मोहन सेनगुप्ता यांच्याशी सूत जुळले.नेली या ब्रिटीश नागरिक होत्या.त्यांनी आई-वडीलांचा विरोध डावलून जतिंद्र यांच्याशी विवाह केला आणि कोलकातात आश्रय घेतला.त्यांचे पती वकील होते. त्यानंतर त्यांनी महात्मा गांधी यांच्या आंदोलनात उडी घेतली. त्यांनी खादीची घरोघरी विक्री केली. त्यांनी मिठाच्या सत्याग्रहात अटक देखील झाली होती.
14.राणी गायदिन्ल्यू (Rani Gaidinluiu)
जन्म: 26 जानेवारी 1915, मणिपूर
मृत्यु: 17 फेब्रुवारी 1993, मणिपूर
अवघ्या 13 वर्षांची असताना राणी यांनी आपल्या जनजातीच्या लोकांमध्ये प्रचार सुरु केला.नागात आदिवासींना परत आणण्यासाठी झालेल्या आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला होता. त्यांनी ब्रिटीशांच्या विरोधात आंदोलन सुरु केले होते. त्यावेळी त्या अवघ्या 17 वर्षांच्या होत्या. आंदोलनामुळे त्यांना 14 वर्षे तुरुंगात राहावे लागले. त्यांच्या अनुयायात वाढ झाल्याने ब्रिटीश घाबरले होते.त्यामुळे त्या अनेक वर्षे भूमिगत राहिल्या होत्या. त्यांच्या बलिदानामुळे पंडित जवाहरलाल यांच्या त्या प्रिय होत्या.
15. सुचेता कृपलानी (Sucheta Kriplani)
जन्म: 25 जून 1908, अंबाला
मृत्यु: 1 डिसेंबर 1974, नवी दिल्ली
सुचेता यांचा जन्म एका बंगाली ब्राह्मण कुटुंबात अंबाला येथे झाला. त्यांनी इंद्रप्रस्थ कॉलेजात आणि पंजाब युनिव्हर्सिटीतून शिक्षण पूर्ण केले त्या बनारस हिंदु युनिव्हर्सिटीत प्राध्यापक बनल्या. त्या पहिल्या मुख्यमंत्री देखील बनल्या. त्या एक धाडसी महिला होत्या. त्यांना फाळणीच्या वेळी झालेल्या दंगलीच्या वेळी रस्त्यावर उतरून शांतता निर्माण करण्याचे कार्य केले.
16. अरुणा आसफअली –
महात्मा गांधी यांच्या मिठाच्या सत्याग्रहात अरुणा आसफअली यांचे नेतृत्व दिसले. या आंदोलनात सहभागी झाल्याने त्यांना तुरुंगवास देखील झाला.त्यांनी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर भारत छोडो आंदोलनाचे नेतृत्व केले. त्यामुळे कल्पना येते की भारतात स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होणाऱ्या महिला किती धाडसी होत्या.त्यांनी तिहार तुरुंगातील राजकीय कैद्यांच्या अधिकारासाठी देखील लढा दिला होता. यासाठी त्यांनी उपोषण केल्याने कैद्यांचे प्रश्न चव्हाट्यावर आले. त्या साहसी महिला होत्या आणि त्यांना रुढीवाद पसंत नव्हता.त्या ब्रह्मो समाजाच्या असूनही त्यांनी एका मुस्लीम तरुणाशी विवाह केला. त्यांच्या कुटुंबियांकडून त्यांना विरोध झाला. परंतू आपण काय करतोय याची त्यांना संपूर्ण कल्पना होती.
17. उषा महेता –
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभागी असलेल्या सर्वात कमी वयाच्या स्वातंत्र्य सेनानी पैकी एक असलेल्या उषा महेता यांच्यावर महात्मा गांधी यांचा प्रभाव होता. पाच वर्षांची असताना त्यांची भेट गांधीजीशी झाली. त्या आठ वर्षांच्या असताना त्यांनी सायमन गो बॅक आंदोलनात भाग घेतला होता. त्यांचे वडील ब्रिटीश सरकारमध्ये न्यायाधीश होते. शिक्षण सोडल्यानंतर त्यांनी संपूर्णपणे स्वातंत्र्य लढ्यात स्वत:ला झोकून दिले. त्यांनी ब्रिटीश सरकार विरोधात रेडीओ चॅनल चालविल्याने त्यांना तुरुंगवास झाला होता.
18. भिकाजी कामा –
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अग्रणी असलेल्या भिकाजी कामा यांना मॅडम कामा देखील म्हटले जाते. त्यांनी स्वातंत्र्य लढ्या दरम्यान भारतीयांच्या मनात पुरुष आणि महिला समानता आणि महिला सशक्तीकरणाचे बीज रोवले.त्या पारसी कुटुंबातील होत्या. त्याचे वडील सोराबजी फ्रामजी पटेल पारसी समुदायातील अग्रगण्य नेते होते. त्यांनी अनाथ मुलींचे जीवन सुधारले. राष्ट्रीय आंदोलनात देखील त्यांनी सक्रीय सहभाग घेतला.
19. कस्तुरबा गांधी –
महात्मा गांधी यांच्या पत्नी असलेल्या कस्तुरबा गांधी यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान मोठे आहे.त्या एक राजकीय कार्यकर्त्या होत्या. त्यांनी नागरिकांच्या अधिकारासाठी आवाज उठविला होता. गांधीजींच्या दक्षिण आफ्रीकेतील दौऱ्यात त्या डरबन येथील फिनिक्स बस्तीच्या सक्रीय सदस्य बनल्या. त्यांनी नेहमीच स्वच्छता, आरोग्य आणि शिस्तबद्ध जीवन आणि लोकांना सुशिक्षित व्हावे यासाठी जागरुकता पसरवली.
20. बेगम हजरत महल –
बेगम हजरत महल या भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील सर्वात महत्वाच्या सेनानी आहेत.त्यांना झाँसीच्या राणीच्या समकक्ष मानले जाते. 1857 मध्ये जेव्हा लढा सुरु झाला तेव्हा ग्रामीण भागातील लोकांना ब्रिटीशांच्या विरोधात लढण्यासाठी प्रेरित करण्याचे काम बेगम हजरत महल यांनी केले. त्यांनी त्यांच्या मुलाला अवधचा राजा म्हणून घोषीत केले.आणि लखनऊ ताब्यात घेतले.हे युद्ध सोपे नव्हते. ब्रिटीश सरकारने राजाकडून लखनऊचे नियंत्रण स्वत:च्या ताब्यात घेतले आणि त्यांना नेपाळला जाण्यासाठी भाग पाडले.