नवी दिल्ली : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या आरोपांमुळे सध्या भारत आणि कॅनडाचे संबंध ताणले गेले आहेत. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी केलेल्या आरोपांमुळे मोठं वादळ निर्माण झालय. जस्टिन ट्रूडोने खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येत भारताचा सहभाग असल्याचा आरोप केलाय. ट्रूडो यांनी केलेल्या आरोपानंतर माजी डिप्लोमॅट दीपक वोहरा यांनी कॅनडाला खडेबोल सुनावले आहेत. “ट्रूडो यांनी केलेले आरोप मान्य नाहीत. त्यांना त्याची किंमत चुकवावी लागली” असं डिप्लोमॅट दीपक वोहरा यांनी म्हटलय. ट्रूडो यांच्या कृतीमुळे तिथे राहणाऱ्या भारतीयांच्या अडचणी वाढू शकतात.
“जेव्हा मी डिप्लोमॅट होतो, तेव्हा कॅनडाच्या उच्चायोगातील एका अधिकारी मला म्हणाला होता की, आम्हाला माहितीय, पण मॅच्युरिटी दाखवून आम्ही ही गोष्ट बाहेर येऊ देत नाही. पण हा माणूस जस्टिन ट्रूडो मूर्ख आहे. तीन वर्षापूर्वी जस्टिन ट्रूडो भारतात आले होते. तेव्हा काही खलिस्तान्यांना सोबत घेऊन आलेले. ते मूर्खपणा करतात. परराष्ट्र संबंध अशा पद्धतीने विकसित होत नाहीत” असं दीपक वोहरा इंडिया टुडेशी बोलताना म्हणाले. “जस्टिन ट्रूडोच्या आरोपामुळे कॅनडामध्ये राहणाऱ्या भारतीयांच्या अडचणी वाढू शकतात. कॅनडामध्ये भारतीय समुदायाला खूप मान-सन्मान आहे. या आरोपामुळे तिथल्या भारतीयांच्या मान-सन्मान आणि आनंदावर परिणाम होईल” असं दीपक वोहरा यांनी सांगितलं.
जस्टिन ट्रूडो यांनी इतका मोठा आरोप भारतावर का केला?
कॅनडाच्या Kwantlen Polytechnic युनिव्हर्सिटीमध्ये पॉलिटिकल सायन्सचे प्रोफेसर शिंदर पोरेवल यांनी सांगितलं की, जस्टिन ट्रूडो यांनी आपली सत्ता टिकवण्यासाठी जाणून-बुजून हा आरोप केलाय. “जस्टिन ट्रूडो यांनी केलेल्या आरोपाबद्दल बोलायच झाल्यास आज कॅनडाच्या संसदेचा पहिला दिवस होता. ट्रूडो यांच्याकडे बोलायला काही मुद्दा नाहीय. त्यांची लोकप्रियता वेगाने संपत चाललीय. ते जगमीत सिंह न्यू डेमोक्रॅटिक पार्टीचे खासदार यांच्या समर्थनाने सत्तेवर आहेत. त्यांनी कुठल्याही आधाराशिवाय हा आरोप केलाय. ते पुढच्या निवडणुकीत जिंकणार नाहीत” असं शिंदर पोरेवल म्हणाले.