India-Canada वाद चिघळला असताना आनंद महिंद्रा यांचा मोठा निर्णय, नेटकऱ्यांकडून कौतुक
भारत आणि कॅनडामधील वाद आता आणखीनच चिघळला आहे. कॅनडाच्या पंतप्रधानांनी जाहीरपणे केलेल्या गंभीर आरोपानंतर वातावरण आणखी गंभीर होत चालल्याचं दिसत आहे. या वादादरम्यान आनंद महिंद्र यांनीही मोठा निर्णय घेतलाय.
मुंबई : कॅनडा-भारत वाद आता आणखीनच चिघळत चालल्याचं दिसत आहे. कॅनडा आणि भारतामधील जो काही तणाव वाढत आहे त्याचा परिणाम थेट दोन्ही देशांच्या व्यावसायिक संबंधांवर दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर भारत सरकारने कॅनडाच्या नागरिकांना भारताचा व्हिसा बंद केला आहे. त्यामुळे हो वाद आणखी चिघळत जाणार असल्याचं चिन्ह असताना प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी मोठा निर्णय घेत कॅनडाला मोठा धक्का दिला आहे.
आनंद महिंद्रा यांनी कोणता निर्णय घेतलाय?
आनंद महिंद्रा यांची महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची उपकंपनी असलेल्या रेसन एरोस्पेस कॉर्पोरेशनमध्ये 11.18 टक्के भागीदारी आहे. ही कंपनी शेतीसंबंधित निगडित सर्व उत्पादने बनवत होती. 20 सप्टेंबरपासून महिंद्रा कंपनीने कॅनडामधील आपला व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतलाय. महिंद्रा कंपनीनेच यासंदर्भात माहिती दिली आहे. कॅनडा आणि भारतामधील वाद सुरू असताना महिंद्रा कंपनीने घेतलेल्या हा निर्णय चर्चेचा विषय ठरत आहे.
महिंद्रा कंपनीने हा निर्णय घेतला खरा पण त्याचा परिणान थेट त्यांच्या शेअरवर दिसून आला आहे. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने हा निर्णय घेतल्यानंतर त्यांचे शेअर्स 3 टक्क्यांनी पडलेत. मार्केटमधील 1584 वरून घसरुन 1557 वर आला आहे. शेअर्सचा भाव पडला असल्याने कंपनीला तब्बल 7200 कोटी रूपयांचं नुकसान झालं आहे. कंपनीला नुकसान झालं असली तरी त्यांनी हा निर्णय या तणावाच्या पार्श्वभूमीवर घेतल्याची चर्चा सोशल मीडियावर होतान दिसत आहे.
नेमका वाद कशावरून?
खलिस्तानवादींचा म्होरक्या हरदीपसिंह निज्जर याची हत्या करण्यात आली होती. यामागे भारतीय गुप्तचर यंत्रणेचा हात असल्याचा उघडपणे आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केला होता. जस्टिन ट्रुडो यांच्या आरोपानंतर आता परस्थिती गंभीर होताना दिसत आहे. भारतीय नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा भारत सरकारने दिला होता.