परदेशी उद्योगपतीला भारताचा ‘पद्मभूषण’, चीनला झोंबल्या मिरच्या, कारण ऐकलं तर…
भारत सरकारने 2024 सालासाठी पद्म पुरस्कारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये 4 उद्योगपतींना पद्म पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. त्यापैकी तीन भारतीय आहेत, पण एका परदेशी उद्योजकाचाही समावेश आहे.
नवी दिल्ली | 26 जानेवारी 2024 : देशाच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारत सरकारने 2024 सालासाठी पद्म पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये 4 उद्योगपतींना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यापैकी तीन भारतीय आहेत. तर एक व्यक्ती परदेशी आहेत. त्यांनी भारतासाठी दिलेले योगदान पाहून त्यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मात्र, त्यांना पद्म पुरस्कार देण्यात आल्याने शेजारी राष्ट्र चीनला मात्र चांगल्याच मिरच्या झोंबल्या आहेत.
भारत सरकारने जाहीर केलेल्या पद्म पुरस्कारामध्ये चार उद्योजकांचा समावेश आहे. कर्नाटकच्या सीताराम जिंदाल यांना पद्मभूषण, महाराष्ट्राच्या कल्पना मोरपरिया आणि कर्नाटकच्या शशी सोनी यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर, फॉक्सकॉनचे अध्यक्ष यंग लू यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या सर्व उद्योजक आणि पद्म पुरस्कार घोषित झालेल्या मान्यवरांचा सन्मान एप्रिल किंवा मे महिन्यात करणार आहेत.
कर्नाटकच्या शशी सोनी यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 69 वर्षीय शशी सोनी या भारतातील महिला उद्योगपतींच्या यादीतील एक प्रसिद्ध नाव आहे. इज्मो लिमिटेडच्या त्या संस्थापक आहेत. त्यांची कंपनी जगातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल सोल्यूशन प्रोवाइडर कंपनी आहे.
महाराष्ट्राच्या कल्पना मोरपरिया यांनाही पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. कल्पना मोरपरिया या आयसीआयसीआय बँकेशी तेहतीस वर्षे निगडीत होत्या. $2.1 ट्रिलियन अमेरिकन कंपनीच्या भारतीय विस्तार JPMorgan च्या दक्षिण आणि आग्नेय आशियासाठी त्या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. कल्पना या अनेक आघाडीच्या भारतीय कंपन्यांच्या संचालक मंडळावर स्वतंत्र संचालक म्हणून काम करत आहेत.
पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित झालेले कर्नाटकचे डॉ. सीताराम जिंदाल यांनी निसर्गोपचारात पदवी प्राप्त केली. जिंदाल ॲल्युमिनियम लिमिटेडचे संस्थापक, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांनी बंगळुरू बाहेर निसर्ग उपचार आणि योग रुग्णालयाची स्थापना केली आहे.
उद्योजकांच्या या यादीत चौथे नाव आहे ते फॉक्सकॉनचे अध्यक्ष यंग लू यांचे. चीन देशातील तैवान येथील बहुराष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी फॉक्सकॉनचे ते अध्यक्ष आहेत. यंग लू यांनी चीनमधील फॉक्सकॉन उत्पादनाचा कारखाना चीनमधून भारतात हलवला. फॉक्सकॉन कंपनी ही ॲपल मोबाईल फोनची उत्पादने बनवते. पूर्वी ही सर्व उत्पादने चीनमध्ये बनविली जात होती. मात्र, आता ॲपलच्या आयफोनपासून आयपॅडपर्यंत सर्व काही भारतात बनवले जात आहे. त्याचा चीनला आधीच धक्का बसला होता. त्यातच आता भारत सरकारने लू यांना पद्मभूषण देऊन सन्मानित केल्याने चीन अडचणीत येणार हे निश्चित आहे.