Corona Update: अरे देवा! देशातील कोरोना रुग्णावाढीचा वेग 10 दिवसांत दुप्पट; गेल्या 24 तासांत 2,00,739 नवे रुग्ण

| Updated on: Apr 15, 2021 | 9:57 AM

भारतात अवघ्या 10 दिवसांतच कोरोना रुग्णवाढीचे प्रमाण दुप्पटीने वाढले आहे. | Coronavirus updates

Corona Update: अरे देवा! देशातील कोरोना रुग्णावाढीचा वेग 10 दिवसांत दुप्पट; गेल्या 24 तासांत 2,00,739 नवे रुग्ण
कोरोनाचा हा वेग धडकी भरवणारा आहे.
Follow us on

नवी दिल्ली: कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे महाराष्ट्रावर लॉकडाऊनची (Maharashtra Lockdown) वेळ ओढावली असली तरी देशातील परिस्थितीही फारशी वेगळी नाही. संपूर्ण देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी भर पडताना दिसत आहे. त्यामुळे अवघ्या 10 दिवसांत देशातील कोरोना रुग्णवाढीचा वेग दुप्पट झाला आहे. दहा दिवसांपूर्वीच देशात 1 लाख नव्या रुग्णांची नोंद झाली होती. मात्र, आता हा आकडा थेट 2,00,739 वर जाऊन पोहोचला आहे. गेल्या 24 तासांमध्ये हे नवे रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. त्यामुळे कोरोनाचा हा वेग धडकी भरवणारा आहे. (Coronavirus updates in India)

यापूर्वी फक्त अमेरिकेतच प्रत्येक दिवसाला 2 लाख नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र, अमेरिकेला एक लाखापासून ते दोन लाखापर्यंतचा आकडा पार करण्यासाठी 21 दिवस लागले होते. मात्र, भारतात अवघ्या 10 दिवसांतच कोरोना रुग्णवाढीचे प्रमाण दुप्पटीने वाढले आहे. अमेरिकत 8 जानेवारीला एकाच दिवसात 3,09,035 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती. भारताचा सध्याचा वेग पाहता भारत हा आकडा येत्या पाच दिवसांत गाठेल, अशी शक्यता आहे. ही शक्यता खरी ठरल्यास ही भारतासाठी मोठी चिंताजनक बाब असेल.

भारतात दररोज कोरोना रुग्णवाढीचा उच्चांक

कोरोनाची दुसरी लाट आल्यापासून गेल्या काही दिवसांमध्ये भारत कोरोना रुग्णवाढीचे नवनवे उच्चांक स्थापन करत आहे. गेल्या 11 दिवसांत फक्त दोनवेळा रुग्णवाढ मंदावलेली दिसून आली. मात्र, त्यावेळी कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी करण्यात आले होते. आता तर भारताने दोन लाखांची वेसही ओलांडली आहे. तर गेल्या 24 तासांत देशभरात 1, 038 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रातील लॉकडाऊनचा देशभरात काय परिणाम होणार?

गेल्या लॉकडाऊनवेळी बाजार आणि अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला होता. अजूनही त्याचे परिणाम जाणवत आहेत. दिल्ली ही देशाची राजधानी असली तरी अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने मुंबईचं देशात खूप महत्त्व आहे. गेल्यावर्षीच्या लॉकडाऊनमुळे देशातील रिटेल आणि इंडस्ट्री या दोन्ही विभागांवर मोठा दुष्परिणाम झाला. यातून देश हळूहळू सावरत होता तोच आता पुन्हा एकदा लॉकडाऊनची नामुष्की आलीय. एक वर्षानंतर देशभरात पुन्हा लॉकडाऊनची स्थिती तयार झालीय.

महाराष्ट्रात लॉकडाऊन लागल्यास सर्वाधिक फटका बसणाऱ्यांमध्ये हॉटेल आणि रेस्टॉरन्टचाही समावेश आहे. इंडियन एक्स्प्रेसमध्ये आलेल्या एका अहवालानुसार महाराष्ट्रातील जवळपास 20 टक्के हॉटेल आणि रेस्टॉरन्ट अजूनही बंद आहेत. मागील लॉकडाऊनच्या झटक्याने ही हॉटेल आणि रेस्टॉरन्ट चालूच होऊ शकली नाही. जी झाली त्यातील अनेक बंद करण्याची वेळ आली. 30 टक्के हॉटेल आणि रेस्टॉरन्ट आर्थिक तोट्यामुळे कायमचे बंद करावी लागतील.

संबंधित बातम्या:

Maharashtra Lockdown: मुंबईकरांनो सावध व्हा; गर्दी झाल्यास बाजारपेठा आणि अत्यावश्यक सेवाही बंद होणार

सुरतमध्ये कोरोनामुळे हाहा:कार; स्मशानात रांगा; मृतदेह दहनाने विद्युतदाहिन्यांची धुरांडी वितळली

Coronavirus News: शरीरातील ‘या’ नव्या जागेत लपून बसलाय कोरोना; RT-PCR चाचणीतही सापडत नाही

(Coronavirus updates in India)