India vs Bharat | ‘तुम्हाला झाकाव लागतय, कारण लोक तुमचं….’, संजय राऊत यांनी वापरले बोचरे शब्द
India vs Bharat | "यांनी नया भारत निर्माण करण्याची गोष्ट केली होती. तुम्ही कोणत्या ग्रहावर, चांद्रयानात बसून वरुन काम करताय का?" अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपाचा समाचार घेतला. संजय राऊत यांनी अत्यंत बोचणाऱ्या, टोचणाऱ्या शब्दात टीका केली.
नवी दिल्ली : “सरकारने अचानक विशेष अधिवेशन का बोलावलं आहे?. अनन्यसाधारण परिस्थितीत अधिवेशन बोलावलं जातं. हे निमंत्रण बारश्याचं आहे का? लग्नाचं आहे का? मोदींच्या वाढदिवस साजरा केला जातोय? भाजपचा निरोप समारंभ आहे. नक्की काय अजेंडा आहे. हे काय सुरू आहे देशात?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारलाय. “तुम्ही संसदेच विशेष अधिवेश बोलवलय. तुम्ही तुमचा कार्यक्रम का लपवता? एवढ देशात गोपनीय काय चाललय? ही कोणती हुकूमशाही आहे. संसदेच्या अधिवेशनाचा कार्यक्रम सांगितला जात नाही. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलाय. याविषयी आवाज उठवायचा आहे. महाराष्ट्रात प्रचंड दुष्काळ आहे, हे मुद्दे आम्ही मांडू शकतो की, नाही?” असा सवाल शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी विचारला.
“एक देश-एक निवडणूक हा एक घोटाळा आहे. या सरकारने मागच्या आठ-नऊ वर्षात घोटाळे केले. त्यातला हा एक घोटाळा आहे. देश लुटण्याचा, देशाला खड्ड्यात घालण्याचा हा एक प्रकार आहे” अशा शब्दात संजय राऊत यांनी टीका केली. “आम्ही इंडिया आघाडी स्थापन केल्यापासून इंडिया शब्दाच भय वाटू लागलय. देशातील एका सरकारला घटनेतील नावाच भय वाटणं हे विचित्र आहे. घटनेत भारत सुद्धा नाव आहे. या देशातल्या विरोधीपक्षांनी एकत्र येऊन इंडिया आघाडी स्थापन केलीय. म्हणून इंडिया नाव मिटवणं हा डरपोकपणा, विकृतपणा आहे. यांनी नया भारत निर्माण करण्याची गोष्ट केली होती. तुम्ही कोणत्या ग्रहावर, चांद्रयानात बसून वरुन काम करताय का? इंडिया नाव राहील, इंडिया आहे आणि भविष्यात इंडिया सत्तेवर येईल” असं संजय राऊत म्हणाले.
’10 वर्षात देश एक इंचही पुढे गेलेला नाही’
“मुंबईत G20 ची बैठक झाली, त्यावेळी सुद्धा पडदे लावले होते. सांताक्रूझ विमानतळाच्या पुढचा भाग झाकावा लागला होता. तुम्हाला झाकाव लागतय, कारण लोक तुमच वाकून बघतायत. 10 वर्षात देश एक इंचही पुढे गेलेला नाही. महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी हे मुद्दे तसेच आहेत. इंडिया नाव बदलून लपवालपवी चालणार नाही” असं संजय राऊत यांनी सांगितलं.