भारतातील शेतकरी आंदोलनाच्या बातम्या दडपण्यासाठी ट्विटरवर दबाव, जॅक डॉर्सी यांचा खुलासा, सरकारने मात्र दावा फेटाळला

| Updated on: Jun 13, 2023 | 4:12 PM

शेतकरी आंदोलनादरम्यान ट्विटर बंद करण्याच्या धमक्या मिळाल्याचा आरोप ट्विटरच्या माजी सीईओने भारत सरकारवर केला आहे. मात्र हे धादांत खोटं असल्याचे सरकारने म्हटले आहे.

भारतातील शेतकरी आंदोलनाच्या बातम्या दडपण्यासाठी ट्विटरवर दबाव, जॅक डॉर्सी यांचा खुलासा, सरकारने मात्र दावा फेटाळला
Follow us on

नवी दिल्ली : ‘ट्विटरचे’ सहसंस्थापक आणि माजी सीईओ जॅक डॉर्सी (Jack Dorsey) यांनी भारता सरकारविषयी खळबजनक दावा केला आहे. ‘शेतकरी आंदोलनादरम्यान सरकारवर होणारी टीका रोखण्यासाठी अनेक अकांऊट ब्लॉक करण्याचा दबाव मोदी सरकारकडून ट्विटरवर (twitter) टाकण्यात येत होता’, असा दावा केला होता. मात्र केंद्र सरकारने या आरोपांना आता प्रत्युत्तर दिले आहे. सरकारने ट्विटरच्या माजी सीईओचा हा आरोप धादांत खोटा असल्याचे सांगितले आहे.

जॅक डोर्सी यांनी एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या वक्तव्यामुळे या प्रकरणाने पेट घेतला आहे. हे संपूर्ण प्रकरण शेतकरी चळवळीशी संबंधित आहे. खरंतर, ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी यांची नुकतीच एक मुलाखत समोर आली आहे. ब्रेकिंग पॉइंट्स या यूट्यूब चॅनलला दिलेल्या या मुलाखतीत त्यांनी भारतातील शेतकरी आंदोलनादरम्यान ट्विटरला ब्लॉक करण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता, असे त्यांनी यामध्ये म्हटले होते. त्यानंतर भारत सरकारकडून ट्विटर बंद करण्याची धमकी देण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेसने जॅक डॉर्सी यांचा हा व्हिडीओ ट्विट केला आहे. विरोधकांचे ट्विटर हँडल ब्लॉक करण्यासाठी अनेकदा आपल्यावर दबाव आणला गेला, असा खुलासा डॉर्सी यांनी केला. ‘ भारतात शेतकरी आंदोलनावेळी बातम्या दडपण्यासाठी दबाव होता. सरकारवर टीका करणारे पत्रकार, तसेच विरोधकांचं ट्विटर हँडल ब्लॉक करण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता’ असं जॅक डॉर्सी यांनी या मुलाखतीत म्हटलं आहे.

 

एवढंच नव्हे तर भारतातील ट्विटरची कार्यालये बंद करू. तुमच्या अधिकाऱ्यांच्या घरांवर छापे टाकू अशा धमक्याही देण्यात आल्याचं त्यांनी या मुलाखतीत नमूद केलं.

डॉर्सी खोटं बोलत आहेत, सरकारचा दावा

ट्विटरच्या माजी सीईओचे हे विधान पूर्णपणे खोटे असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. डोर्सीच्या आरोपांना केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ट्विट करून उत्तर दिले आहे.

ते म्हणाले की, जॅक सरळ खोटे बोलत आहे. कदाचित ट्विटरच्या इतिहासातील तो संशयास्पद काळ पुसून टाकण्याचा हा प्रयत्न आहे. तसेच राजीव चंद्रशेखर यांनीही आपल्या ट्विटमध्ये काही तथ्ये शेअर केली आहेत. जॅक डॉर्सी आणि त्यांच्या टीमने अनेकदा भारतीय कायद्यांचं उल्लंघन केलं आहे. खरंतर ट्विटरकडून 2020 ते 2022 दरम्यान कोणत्याही भारतीय कायद्याचं पालन करण्यात आलं नाही. परंतु अखेर जून 2022 पासून ट्विटर भारतीय कायद्यांचं पालन करु लागलं. मात्र या दरम्यान कोणत्याही ट्विटरच्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली नाही किंवा ट्वटिरवर बंदी देखील घालण्यात आली नाही.’

जॅक डोर्सी यांच्या कार्यकाळात ट्विटरला भारतीय कायद्यांचं पालन करण्यास अडचणी होत्या असा थेट आरोप राजीव चंद्रशेखर यांनी जॅक डोर्सी यांच्यावर केला आहे.

2020-21 दरम्यान देशात शेतकरी आंदोलन सुरू होते. त्या काळात ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी होते. 2021 मध्ये त्यांनी ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा दिला.