Indian Railway | एकदम अनोखी ट्रेन! नाव तेच, नंबरही तोच, मार्गही तोच, पण धावते तीन ठिकाणांहून
Indian Railway | भारतीय रेल्वे, एक अशी ट्रेन चालवते, जिचा नंबर एक आहे, तिचे नाव पण एक आहे. तिचा मार्ग पण एकच आहे. पण एकाच वेळी ही रेल्वे तीन वेगवेगळ्या रेल्वे स्टेशनवरुन धावते, त्यामुळे या रेल्वेतून प्रवास करणारा चक्रावून जातो. या रेल्वेला प्रवाशी जादूई ट्रेन म्हणतात.
नवी दिल्ली | 23 February 2024 : देशात एक अशी रेल्वे चालविण्यात येते, जिचा नंबर एक आहे, नाव एक आहे आणि मार्ग पण एकच आहे. पण तरीही ती एकाच वेळी तीन वेगवेगळ्या रेल्वे स्टेशनवरुन धावते. त्यामुळे या रेल्वेने प्रवास करणारे प्रवाशी चक्रावतात. अनेक प्रवाशी यामधून प्रवास करतात, ते हिला जादूई ट्रेन म्हणतात. तुम्हाला पण आश्चर्य वाटत असेल की एकच ट्रेन एकाच वेळी तीन ठिकाणाहून कशी बरं धावत असेल? नाही का? चला तर जाणून घ्या या खास रेल्वेची कहाणी..
गंतव्य स्थानावर पोहचण्यासाठी लागतो वेळ
कमी पल्ल्याच्या रेल्वेला त्यांच्या गंतव्य स्थानी, अखेरच्या स्थानकापर्यंत पोहचण्यासाठी 24 तासांपेक्षा कमी कालावधी लागतो. ती एका वेळी एका स्टेशनवर असते. पण या रेल्वेला तिच्या अखेरच्या स्थानापर्यंत पोहचण्यासाठी 24 तासांपेक्षा अधिकचा कालावधी लागतो. ही ट्रेन एकावेळी दोन स्थानकांवर असते. तर तिला अखेरच्या स्थानकावर पोहचण्यासाठी 48 तासांपेक्षा अधिकचा कालावधी लागतो. अनेकदा ही रेल्वे तीन स्थानकांवर पण असू शकते. एकाचवेळी तीन स्टेशनवर रोज जाणारी ट्रेन असू शकते.
देशातील लांब पल्ल्याची रेल्वे
देशातील सर्वात लांब पल्ल्याच्या रेल्वेचा क्रमांक 15909/15910 असा आहे. या रेल्वेचे नाव अवध-आसाम असे आहे. ही ट्रेन आसाममधील दिब्रुगड ते राजस्थानातील लालगडपर्यंत धावते. या दरम्यान ही रेल्वे 3100 किमीपेक्षा अधिकचा पल्ला गाठते. ही रेल्वे तिच्या प्रवासात एकूण 88 स्थानकांवर थांबते. या स्थानकांवर ही रेल्वे दोन ते पाच मिनिटे थांबते. एकूण स्टेशनचा आणि थांबण्याचा विचार करता या रेल्वेचे एकूण चार तास स्टेशनवर थांबण्यात जातात.
एक, दोन नाही तर सात ट्रेन सेटची गरज
अवध-आसाम या रोज धावणाऱ्या एक्सप्रेस ट्रेनसाठी सात ट्रेन सेटची गरज पडते. स्टेशनवरुन सुटल्यानंतर चौथ्या दिवशी ही रेल्वे तिच्या निर्धारीत स्टेशनवर, गंतव्य स्थानावर पोहचते. या कारणामुळे दोन्ही बाजूने तीन-तीन ट्रेन चालविण्यात येते आणि एक ट्रेन सेट अतिरिक्त असतो.
ट्रेन अशी करते ‘जादू’
15909 नंबरची ट्रेन सकाळी दिब्रुगडहून 10.20 वाजता सुटते. त्याचदरम्यान दुसरी ट्रेन 10.45 वाजता बिहार येथील कटियार जंक्शनहून निघते. हे स्थानक दिब्रुगडहून 1166 किमी इतके दूर आहे. एक ट्रेन दिब्रुगडवरुन एक दिवसाअगोदरच निघते. तर त्याचवेळी तिसरी ट्रेन 2247 किमी दूर सकाळी 10.38 वाजता उत्तर प्रदेशातील बरेली स्टेशनवर असते. ही रेल्वे दोन दिवसांपूर्वी दिब्रुगडवरुन निघालेली असते. त्यामुळे भविष्यात तुम्ही या रेल्वेने प्रवास करत असाल तर चक्रावून जाऊ नका.