India’s Growth Rate: जागतिक बँकेने घटविला भारताचा विकास दर, काय आहे सध्याची आकडेवारी
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि जागतिक बँकेच्या वार्षिक बैठकीपूर्वी जारी केलेल्या अहवालात जागतिक बँकेने भारताचा विकासदर घटविला आहे.
मुंबई, जागतिक बँकेने (World Bank) भारताच्या विकास दराची (India’s Growth Rate) नवी आकडेवारी जाहीर केली आहे. यामध्ये भारताचा विकास दर 6.5 पर्यंत कमी झाला आहे. जागतिक बँकेने आर्थिक वर्ष 2022-23 साठी ही आकडेवारी जाहीर केली आहे. भारताचा विकासदर पूर्वी 7.5 टक्के होता. जागतिक बँकेच्या अहवालात म्हटले आहे की रशिया-युक्रेन युद्ध आणि ग्लोबल मॉनेटरी टाईटनिंगमुळे हा परिणाम झाला. जागतिक बँकेने भारताचा विकासदर 1 टक्क्याने कमी केला आहे.
जागतिक बँकेने सांगितले कपातीचे कारण
जागतिक बँकेच्या अहवालात कपातीचे कारण देताना असे म्हटले आहे की, रशिया-युक्रेन युद्ध आणि जागतिक आर्थिक घट्टपणामुळे आर्थिक दृष्टीकोन प्रभावित होईल. या अनिश्चिततेच्या काळात खाजगी गुंतवणूक कमी होण्याची शक्यता आहे. जागतिक मागणीत घट झाल्यामुळे देशाच्या निर्यातीवरही परिणाम होईल, अशी शक्यता अहवालात वर्तविण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय परिस्थिती कारणीभूत
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि जागतिक बँकेच्या वार्षिक बैठकीपूर्वी जारी केलेल्या अहवालात बँकेने म्हटले आहे की, भारत जगातील इतर देशांच्या तुलनेत मजबूत आहे. विशेष म्हणजे गेल्या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर 8.7 टक्के होता.
अहवालात जागतिक बँकेचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ हंस टिमर यांनी म्हटले आहे की, भारत आणि इतर सर्व देशांसाठी आंतरराष्ट्रीय परिस्थिती बिकट होत चालली आहे. परिणामी वर्षाचा उत्तरार्थ सर्वच देशांसाठी आव्हानात्मक असेल.
अहवालात भारताचे कौतुक
दक्षिण आशियातील इतर देशांच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्थेने मजबूत विकासासह चांगली कामगिरी केली असल्याचे म्हणत मुख्य अर्थतज्ज्ञ हंस टिमर यांनी भारताचे कौतुक केले आहे. कोरोनातून सावरण्याचा देशाचा वेगही वेगवान आहे. याशिवाय, भारतीय अर्थव्यवस्थेने विशेषतः सेवा क्षेत्रात चांगली कामगिरी केली असल्याचेही ते म्हणाले.