Inflation : महागाईला लावणार चाप! स्वस्त होतील भाजीपाला, तांदळासह डाळी
Inflation : खाद्यपदार्थांच्या किंमतीत जोरदार तेजी आली आहे. खास करुन तांदळासह डाळी आणि भाजीपाला महागला आहे. तांदळाने तर गेल्या 14 वर्षांतील सर्व रेकॉर्ड तोडले आहे. जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने खास योजना आखली आहे.
नवी दिल्ली | 23 ऑगस्ट 2023 : पावसाने उत्तर भारतासह अनेक भागात हाहाकार माजवला. तर काही भागात पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे देशातील अनेक भागात खाण्या-पिण्याच्या वस्तू महागल्या आहेत. तांदळासह गहू, डाळी आणि भाजीपाल्याच्या किंमती (Food Items Price Hike) भडकल्या आहेत. 20 ते 30 किलो असणारे टोमॅटो जुलै महिना उगवताच 250 रुपयांच्या पण पुढे गेले. इतर ही अनेक भाज्या महागल्या. त्याचा परिणाम दिसून आला. जुलै महिन्यात किरकोळ महागाई दर (Inflation Rate) 7.44 टक्क्यांवर पोहचला. जून महिन्यात हा दर 4.81 टक्क्यांवर होता. गव्हासोबत तांदळाने पण या काळात महागाईची वाट धरली. तांदळाने तर गेल्या 14 वर्षांतील सर्व रेकॉर्ड तोडले आहे. महागाईला लगाम घालण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारने खास उपाय योजना आखली आहे. काय आहे ही योजना..
टोमॅटोची इतकी दरवाढ
पावसाच्या आगमानाने, टोमॅटोच्या किंमती आकाशाला भिडल्या. टोमॅटोच्या किंमतीत 363.8 टक्क्यांची वाढ झाली. काही शहरात तर या किंमती 350 रुपये किलोवर पोहचल्या. केंद्र सरकारने हस्तक्षेप केला. टोमॅटोच्या किंमती नियंत्रीत ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या सहकारी संस्थांनी टोमॅटोची विक्री सुरु केली. त्यानंतर नेपाळमधून टोमॅटोच्या आयातीवरील शुल्क हटविण्यात आले. सरकारच्या या प्रयत्नाचा फरक लागलीच दिसला. टोमॅटो 40 रुपये किलोपर्यंत घसरला. किरकोळ बाजारात टोमॅटोच्या किंमती 60 ते 80 रुपये दरम्यान आल्या.
वाढत्या किंमतींना लागेल ब्रेक
गव्हाच्या किंमतीत पण 2.2 टक्क्यांची वाढ झाली. त्याचा परिणाम पॅकबंद पीठांच्या किंमतीवर दिसून आला. मेट्रोसह अनेक निम शहरात पॅकबंद पीठाचा ग्राहक वापर करतात. त्यांना त्याची झळ बसली. गव्हाच्या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकार रशियाकडून गव्हाची खरेदी करण्याचा विचार करत आहे. रशिया भारताला 80 ते 90 लाख टन गव्हाची निर्यात करु शकतो. गव्हाच्या आयतीमुळे किंमतींना ब्रेक लागेल.
तांदळाने केला विक्रम
तांदळाच्या किंमतींनी भरारी घेतली. गेल्या 14 वर्षांतील सर्व रेकॉर्ड त्याने तोडले. केंद्र सरकार यावर पण तोडगा काढणार आहे. टोमॅटो नंतर कांद्याने महागाईची वाट धरली आहे. केंद्र सरकारने आताच कांद्याच्या निर्यातीवर शुल्क लावले आहे. त्यामुळे कांद्याचा मोठा साठा कायम राहील, असा सरकारचा प्रयत्न आहे. सध्या अनेक शहरात कांदा 35 ते 40 रुपयांच्या घरात आहे. सप्टेंबरपर्यंत हा भाव दुप्पट होण्याची भीती आहे.
40 टक्के आयात शुल्क
कांद्याच्या किंमती ग्राहकांना रडवू नये यासाठी केंद्र सरकार सतर्क झाले आहे. कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के आयात शुल्क सुरु केले आहे. तर बफर स्टॉकमधून 3 लाख टन बाजारात उतरवला आहे. तर देशातील काही शहरात केंद्र सरकारच्या सहकारी संस्था 25 रुपये किलो दराने कांद्याची विक्री करत आहे. साखरेच्या निर्यातीवर पण बंदी लागू करण्यात आली आहे. केंद्राने डाळी आणि इतर पदार्थांच्या आयातीला मंजूरी देण्यात आली आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात महागाईला चाप बसू शकतो.