Coronavirus: इन्फोसिस कंपनीचा मोठा निर्णय; कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यांना 21 दिवसांची भरपगारी सुट्टी
इन्फोसिस कंपनीने पुणे आणि बंगळुरू येथे आपल्या कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कोव्हिड सेंटरचीही उभारणी केली होती. | Infosys
मुंबई: देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर इन्फोसिस (Infosys) कंपनीने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार कंपनीतील कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या कर्मचाऱ्यांना 21 दिवसांची भरपगारी रजा देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. (India top IT companies expands covid care facilities to employees Infosys giving paid leaves)
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतातील रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर देशातील आघाडीच्या आयटी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पावले उचलायला सुरुवात केली होती. विप्रो आणि अन्य काही आयटी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस मोफत देण्याचा निर्णय घेतला होता.
तर इन्फोसिस कंपनीने पुणे आणि बंगळुरू येथे आपल्या कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कोव्हिड सेंटरचीही उभारणी केली होती. कर्मचाऱ्यांवरील उपचाराचा खर्च मेडिक्लेम पॉलिसीतून भागवला जात आहे.
आपातकालीन आरोग्य सुविधांची व्यवस्था
कोरोनाचा प्रकोप वाढत असल्याने इन्फोसिस कंपनीकडून कर्मचाऱ्यांना अनेक आरोग्य सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. त्यासाठी कंपनीने कोरोना चाचण्या करणाऱ्या कंपन्यांशी करार केला आहे. तसेच एखाद्या कर्मचाऱ्याची प्रकृती बिघडल्यास त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका पुरवणाऱ्या कंपन्यांशीही करार करण्यात आला आहे.
विप्रोची लसीकरण मोहीम
विप्रो कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण मोहीम सुरु केली होती. याशिवाय कर्मचाऱ्यांना डॉक्टर्स, कोरोनाच्या काळात घ्यायवयाची काळजी आणि इतर सुविधा पुरवण्यासाठी एक खास व्हर्च्युअल व्यासपीठ तयार करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या:
मोठी बातमी! SBI, Infosys सह ‘या’ कंपन्या कर्मचार्यांच्या कोविड लसीकरणाचा खर्च उचलणार
(India top IT companies expands covid care facilities to employees Infosys giving paid leaves)