बिहारमध्येही पुतण्यावर काका भारी, पासवानांच्या पक्षात फूट, कुटुंबही विस्कटलं; वाचा सविस्तर

| Updated on: Jun 14, 2021 | 12:25 PM

गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेश राजकीय बातम्यांमुळे चर्चेत असतानाच काल अचानक बिहारही चर्चेत आला आहे. त्याला कारण आहे रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीत पडलेली फूट.

बिहारमध्येही पुतण्यावर काका भारी, पासवानांच्या पक्षात फूट, कुटुंबही विस्कटलं; वाचा सविस्तर
chirag paswan
Follow us on

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेश राजकीय बातम्यांमुळे चर्चेत असतानाच काल अचानक बिहारही चर्चेत आला आहे. त्याला कारण आहे रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीत पडलेली फूट. महाराष्ट्रात काका पुतण्याच्या राजकारणाची नेहमीच चर्चा होते. आता ती बिहारमध्येही घडताना दिसते आहे. कारण पुतण्याला मात देत इथेही काकानं सध्या तरी बाजी मारलेली आहे. (Internal conflict between chirag paswan and pashupati paras, read why rebale in LJP?)

बिहारमध्ये नेमकं काय घडलं आहे?

रामविलास पासवान यांचा पक्ष आहे लोकजनशक्ती पार्टी. त्यांच्या निधनानंतर पासवानांचा मुलगा चिराग पासवान हेच पार्टीचे सर्वेसर्वा आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लोजपा एनडीएतून बाहेर पडला. तो निर्णय पूर्णपणे चिराग पासवान यांचा होता. लोजपाला फारसं यश मिळालं नाही. लोकसभेत लोजपाचे चिराग पासवानसह 6 खासदार आहेत. त्यातल्या पाच जणांनी आता वेगळी चूल मांडत चिराग पासवान यांना एकटं पाडलं आहे. विशेष म्हणजे लोजपातल्या ह्या बंडाचं नेतृत्व दुसरं तिसरं कुणी केलं नसून ते आहेत रामविलास पासवान यांचे लहान भाऊ आणि चिराग पासवान यांचे काका पशुपती पारस.

कोण आहेत पशुपती पारस?

पशुपती पारस हे चिराग पासवान यांचे सख्खे काका आहेत. ते हाजीपूरमधून लोकसभेवर खासदार आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीच्या वेळेस एनडीएतून बाहेर पडायला पशुपती पारस यांचा विरोध होता. पण चिराग पासवानांनी त्यांचं ऐकलं नाही. शेवटी नितीशकुमार यांनी पशुपती पारस यांनाच हाताशी धरून लोजपात फूट पाडली आणि त्यातले पाच खासदार आता जेडीयूत जाताना दिसत आहेत. विशेष म्हणजे पशुपती पारस यांनी नितीशकुमार हे विकासपुरुष असल्याचं म्हटलं आहे. कुठल्याही सभागृहाचे सदस्य नसतानाही नितीशकुमार यांनीच पहिल्यांदा पशुपती पारस यांना मंत्री केलं होतं आणि नंतर आमदारही. त्यामुळे नितीशकुमार यांनी पशुपती पारस यांच्या माध्यमातून चिराग पासवानला धडा शिकवल्याची चर्चा आहे.

केंद्रात काय परिणाम होणार?

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार किंवा खांदेपालट होईल अशी चर्चा आहे. त्यात जेडीयूला जास्त मंत्रिपदं हवी आहेत. बिहारमध्ये भाजपा आणि नितीशकुमारांच्या जेडीयूने लोकसभेच्या सारख्या जागा लढवल्या. त्यात भाजपचे 16 तर जेडीयूचे 17 खासदार निवडुण आले. पण केंद्रात बिहारचे भाजपकडून 6 मंत्री झाले. आता पाच नवे खासदार जेडीयूला मिळतायत. म्हणजे जेडीयूचं लोकसभेतलं संख्याबळ असेल 21. त्या बळावर नितीशकुमारांनाही पाच ते सहा केंद्रात मंत्रीपदं हवी आहेत. त्यात लोजपातून फुटून जाणाऱ्या दोघा तिघांना तरी मंत्रीपदाची लॉटरी लागू शकते. (Internal conflict between chirag paswan and pashupati paras, read why rebale in LJP?)

 

संबंधित बातम्या:

चिराग पासवान यांना मोठा धक्का, काकासह पाच खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत

हे राम! राम मंदिराच्या भूखंडाचे श्रीखंड, अवघ्या 10 मिनिटात 2 कोटींचा भूखंड 18 कोटीला खरेदी; देशभर खळबळ

पेट्रोल-डिझेलचं ‘शतक’, मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणतात सरकारला अधिकचे पैसे पाहिजे म्हणून जास्तीचा कर

(Internal conflict between chirag paswan and pashupati paras, read why rebale in LJP?)