IRCTC | रेल्वे प्रवाशांना होळीआधी मोठी भेट, तिकीटांचा रिफंड आता जलदगतीने मिळणार
IRCTC च्या वेबसाईटवर रेल्वेचे तिकीट बुक केल्यानंतर काही वेळा पैसे कापले जातात, परंतू तिकीट बुकींग होत नाही. अशा प्रकरणात रिफंड मिळण्यास बराच उशीर होतो. त्यामुळे प्रवाशांना रिफंड मिळण्यासाठी बरेच दिवस वाट पहावी लागते, ही रिफंड मिळण्याची प्रक्रिया जलद करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे म्हटले जात आहे.
मुंबई | 13 मार्च 2024 : इंडियन रेल्वे कॅटरिंग एण्ड टुरिझम कॉर्पोरेशन ( IRCTC ) द्वारे ऑनलाईन रेल्वे तिकीट बुक करणाऱ्या रेल्वे प्रवाशांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे तिकीट बुक करताना आपल्या बॅंक खात्यातून पैसे तर कापले जातात परंतू बरेचदा तिकीट बुक होत नाहीत. अशा वेळी प्रवाशांना नाहक त्रास होतो. आपले कापलेले पैसे खात्यात कधी जमा होतात याची प्रवाशांना काळजी लागते. अशा प्रवाशांसाठी चांगली बातमी आहे. आता रेल्वेचे तिकीट ऑनलाईन काढणाऱ्यांना त्यांचा रिफंड मिळण्याची प्रक्रिया वेगाने होणार आहे. जर तुम्ही तिकीट बुक केलेले असू दे वा तिकीट रद्द केलेले असू रिफंड झटपट तुमच्या खात्यात जमा होणार आहे.
इंडिया टुडेच्या बातमीनूसार आयआरसीटीसी आणि सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम ( CRIS ) यांच्या प्रयत्नांनी या संदर्भात अपडेट सुरु आहे. या मोहीमेचा उद्देश्य रिफंडचा कालावधी समान करणे आहे. या नव्या घडोमोडींमुळे रिफंडचा वेळ किमान एक तासावर आणण्याची योजना आकारास येत आहे. यासंदर्भात क्रिस कंपनीने अद्यापही काही अधिकृत सांगितलेले नाही. रिफंड मिळण्यास होत असलेला उशीर ही एक मोठी समस्या आहे. जेव्हा रिफंड वेळेवर मिळत नाही तेव्हा प्रवाशांकडून समाजमाध्यमांवर रेल्वे प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली जाते.
परतावा मिळण्यास का होतो उशीर ?
सध्या तिकीटांचा परतावा किंवा रिफंड मिळण्याची प्रक्रिया ही वेळखाऊ आहे. जर कोणतेही तिकीट काढताना तांत्रिक अडचणी, इंटरनेट बंद पडणे वा इतर कारणांनी बुकींग फेल होते. तेव्हा आयआरसीटीसी दुसऱ्या दिवशी किंवा तीन दिवसांत कट झालेले पैसे रिफंड करते. हा रिफंड मिळणे बॅंकांच्या सेवांवर अवलंबून असते. यास अनेक दिवस लागू शकतात.
प्रवाशांचा हक्क
परंतू रेल्वे या प्रक्रियेत बदल करू इच्छीत आहे. रेल्वेने आपल्या टीमला रिफंडची प्रक्रिया अधिक वेगाने करण्याचा पर्याय शोधण्यास सांगितले आहे. या तिकीट प्रणालीती हे परिवर्तन आजच्या डीजिटल युगात गरजेचे आहे. या यंत्रणेत मानवी सहभागा शिवाय जर सिस्टीम चालत असेल तर इतका उशीर होणे योग्य नसल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे. जेव्हा तुम्ही ऑनलाईन तिकीट काढता तेव्हा आयआरसीटीसी सुविधा शुल्क आकारत असते. हे शुल्क परत केले जात नाही, प्रवाशांना ही फि कापूनच रिफंड दिला जातो. त्यामुळे प्रवाशांना रिफंड वेगाने मिळणे हा प्रवाशांचा हक्क असल्याचे म्हटले जात आहे.