ईडीचे संचालक संजय मिश्र अखेर निवृत्त, राहुल नवीन यांची हंगामी संचालक म्हणून निवड

| Updated on: Sep 16, 2023 | 7:57 PM

संजय मिश्र तब्बल चार वर्षे दहा महिने या पदावर कार्यरत होते. संजय मिश्र गेल्यावर्षी 18 नोव्हेंबरला निवृत्त होणार होते. त्यांच्या जागी आता बिहारचे आयआरएस अधिकारी राहुल नवीन हे हंगामी संचालक म्हणून ईडीचा कारभार पाहणार आहेत.

ईडीचे संचालक संजय मिश्र अखेर निवृत्त, राहुल नवीन यांची हंगामी संचालक म्हणून निवड
rahul navin
Image Credit source: socialmedia
Follow us on

नवी दिल्ली | 16 सप्टेंबर 2023 : सक्तवसुली संचनालयाचे संचालक संजय कुमार मिश्र यांचा कार्यकाळ शुक्रवारी संपल्याने त्यांच्या जागी आता राहुल नवीन यांना हंगामी संचालक म्हणून नेमण्यात आले आहे. मूळचे बिहारचे असलेले राहुल 1993 बॅचचे ( IRS ) भारतीय महसुल सेवा अधिकारी आहेत. मुळचे शांत स्वभावाचे असलेले राहुल यांनी ईडीतच अनेक पदांवर काम केले आहे. संजय कुमार मिश्र यांना तिसऱ्यांदा या पदावर मुदतवाढ दिल्याने वाद निर्माण झाला होता. त्याची तिसरी मुदतवाढ 15 सप्टेंबरला संपल्यानंतर त्यांच्या जागी हंगामी संचालक म्हणून राहुल नवीन यांची निवड झाली आहे.

केंद्र सरकारने 26 जुलै रोजी संजय कुमार मिश्र यांचा कार्यकाळ वाढविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. फायनान्सियल एक्शन टास्क फोर्सचा रिव्हयू सुरु असल्याने त्यांना 15 ऑक्टोबरपर्यंत पदावर राहू द्यावे असे सरकारचे म्हणणे होते. संजय मिश्र यांच्या जागी कोणा अधिकाऱ्याची निवडच अजून झाली नसल्याचे सरकारने कोर्टाला सांगितले होते. ते अनेक मनी लॉड्रींग प्रकरणाचा तपास करीत असल्याने आम्हाला नवीन नियुक्ती करीता आणखी कालावधी हवा असे सरकारने कोर्टाला म्हटले होते.

सक्तवसुली संचनालय ( ईडी ) या पदावर संजय कुमार मिश्र यांच्या काळात विरोधी पक्षातील अनेक राजकारण्यांवर ई़़डीने कारवाईचा आसुड ओढला आहे. त्यांना तीन वेळा मुदतवाढ दिली होती. त्यासाठी कायद्यातही बदल करण्यात आला होता. संजय मिश्र तब्बल चार वर्षे दहा महिने या पदावर कार्यरत होते. संजय मिश्र गेल्यावर्षी 18 नोव्हेंबरला निवृत्त होणार होते. केंद्र सरकारने अध्यादेशाद्वारे त्यांचा कार्यकाळ तिसऱ्यांदा वाढवला होता. कोर्टाने दुसऱ्यांदा संजय मिश्र यांचा कार्यकाळ वाढवू नये असा सल्ला दिला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही मिश्र 31 जुलैपर्यंत पदावर होते. याच दरम्यान सरकारने नव्या संचालकांची नियुक्ती करणे अपेक्षित होते.

सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे

सरकारच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नागरिक आणि देशाच्या हितासाठी मिश्र यांचा कार्यकाळ आम्ही तूर्त 15 सप्टेंबरपर्यंत वाढवित असलो तरी 15 सप्टेंबरच्या रात्रीनंतर मिश्र पदावर राहाता कामा नयेत असे आदेश दिले. न्या. बी.आर.गवई, न्या. विक्रम नाथ आणि न्या. संजय करोल यांच्या खंडपीठाने सरकारला संजय मिश्र यांच्याशिवाय संपूर्ण डीपार्टमेंट अकार्यक्षम लोकांनी भरलेले आहे असे चित्र आमच्या समोर कृपया उभे करु नका अस सरकारला बजावले होते.

हे नेते चौकशीच्या फेऱ्यात अडकले

ईडीने आतापर्यंत कॉंग्रेस नेत्या सोनिया आणि राहुल गांधी, रॉबर्ट वाड्रा, आपचे मनिष सिसोदिया, खासदार संजय राऊत, माजी केंद्रीय गृहमंत्री पी.चिदंबरम, झारखंडचे हेमंत सोरेन, कर्नाटकचे डीके शिवकुमार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि सेंथिल बालाजी आदींना नोटीसी बजावत काहींना तुरुंगवास घडविला आहे.