H3N2 व्हायरस कोविडसारखा पसरतोय का? जाणून घ्या काय सांगताहेत तज्ज्ञ
एच3एन2 संक्रमित लोकांमध्ये कोविडसारखी लक्षणं दिसत आहेत. रुग्णांना अंगदुखी, डोकेदुखी आणि घसा खवखवण्यासारखी समस्या जाणवत आहे.
मुंबई : देशातील कोरोनाचं संकट आता जवळपास संपुष्टात आलं आहे. मात्र असं असताना गेल्या काही दिवसात सर्दी खोकला आणि तापाचे रुग्ण वेगाने वाढत आहे. वातावरण बदलामुळे असं होत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. पण इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या मते हा एक प्रकारचा इन्फ्लूएंजा व्हायरल आहे. आयसीएमआरच्या मते मागच्या दोन तीन महिन्यात ए सबटाइप एच3एन2 मुळे ताप आणि सर्दी खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत. इंस्टिट्यूट ऑफ इंटरनल मेडिसिन एज्युकेशनचे अध्यक्ष रणदीप गुलेरिया यांच्या मते, या काळातच एच1एन1 चा म्युटेशन एच3एन2 व्हायरस पसरतो. त्यामुळे गेल्या काही दिवसात रुग्णसंख्या वाढत आहे. हा व्हायरस कोरोनासारखाच पसरतो. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे.
या व्हायरसची लक्षणं कोरोनासारखीच असल्याचं काही तज्ज्ञांचं मत आहे.मात्र कोरोनासारखा फुफ्फुसांवर कोणातीही गंभीर परिणाम करत नाही. पण असं असलं तरी काळजी घेणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. दिल्लीचे वरिष्ठ फिजिशियन डॉ. अजय कुमार यांनी सांगितलं की, वातावरणातील बदलामुळे इन्फ्लूएंजाचे रुग्ण वाढत आहेत. तसेच यावेळी एच3एन2 व्हायरस सक्रिय झाल्याचं दिसू आलं आहे. त्यामुळे रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.
लहान मुलांपासून मोठ्या व्यक्ती या व्हायरसमुळे प्रभावित आहेत. मात्र यामुळे घाबरण्याचं काही एक कारण नाही. फक्त बाहेर पडताना मास्क लावून जा. जर एखाद्या व्यक्तीला सर्दी खोकला किंवा तापाची लक्षणं दिसत असतील तर त्यांच्यापासून दूर राहा.
तापाचे रुग्ण वाढत आहेत
केंद्र आरोग्य मंत्रालयाने सोमवारी तज्ज्ञांसोबत एच3एन2 इन्फ्लूएंजा प्रकरणी एका बैठकीचं आयोजन केलं होतं. यात तज्ज्ञांनी सांगितलं की, कोरोनाचे रुग्ण कमी होत आहेत. पण तापाचे रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. रोगप्रतिकारशक्ति कमी असलेली लोकं यामुळे प्रभावित होत आहेत. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी मास्क लावून जा, असं मत तज्ञ्जांनी व्यक्त केला आहे.
रुग्णांमध्ये कशी लक्षणं आहेत
डॉ. अजय कुमार यांनी सांगितलं की, एच3एन2 संक्रमित रुग्णांमधये फ्लूसारखी लक्षणे दिसून येतात. अंगदुखी, डोकेदुखी, घसा खवखवणे यासारखी लक्षणं जाणवतात. यावेळी फ्लू असलेल्या रुग्णांना दीर्घकाळ त्रास सहन करावा लागत आहे. याचं संक्रमण वेगाने होत असल्याचं दिसून आलं आहे.