सार्वजनिक ठिकाणी जोडीदाराचं चुंबन घेणं योग्य की अयोग्य? PDAबद्दल भारतीयांचं काय मत?
अयोध्येतील शरयू नदीत स्नान करताना पतीने पत्नीचे चुंबन घेतल्याची घटना गेल्या महिन्यात घडली होती. या घटनेवरून बराच वाद झाला, तेथे स्नान करणाऱ्या इतर भाविकांनी त्या दांपत्यातील पुरुषाला मारहाणही केली. दरम्यान हे कृत्य बरोबर की चूक, असा प्रश्न विचारला जात आहे.
गेल्या महिन्यात अयोध्येतील शरयू नदीत (Sharayu River) स्नान करताना पतीने पत्नीचे चुंबन घेतल्याच्या घटनेवरून मोठा वाद निर्माण झाला. ट्विटरवर टाकण्यात आलेल्या या व्हिडिओनुसार (Video), एक दांपत्य नदीत अंघोळ करत होते. त्यावेळी पतीने पत्नीचे चुंबन घेतले, ते अतिशय जवळ होते. मात्र हा प्रकार तेथे उपस्थित असणाऱ्या इतर भाविकांना फारसा रुचला नाही. त्यांनी त्या दोघांना हटकले आणि बाजूला केले. या प्रकाराबद्दल निषेध नोंदवत त्यांनी त्या पुरुषाला मारहाणही केली. सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला असून त्यानिमित्ताने वादही सुरू आहे. सार्वजनिक ठिकाणी असे वर्तन करणे योग्य आहे का, असा प्रश्नही विचारला जात आहे. याच पार्श्वभूमीवर टाइम्स ऑफ इंडियाने देशभरातील जनतेला हा प्रश्न विचारत, एक व्हिडिओ तयार केला आहे. सार्वजनिक ठिकाणी आपल्या जोडीदाराच्या जवळ जाणे, त्याचे चुंबन घेणे, पीडीए (Public Display of Affection) कितपत योग्य असा प्रश्न लोकांना विचारला असून अनेकांनी त्यावर आपली मतं नोंदवली आहेत.
‘ही खूप नॉर्मल गोष्ट’
दिल्लीत राहणाऱ्या निधी गंभीर यांना हे फारसं चुकीचं वाटत नाही. सार्वजनिक ठिकाणी चुंबन घेणे, ही खूप नॉर्मल गोष्ट आहे. जर हे आजूबाजूच्या लोकांना पसंत नसेल तर त्यांचे विचार किती नीच मनोवृत्तीचे आहेत, हेच त्यांच्या वागण्यावरून दिसून येते, असे मत निधी यांनी नोंदवलं. शरयू नदीत जे (चुंबन) घडलं, ते जर दोघांच्याही (पती व पत्नी) संमतीने झालं असेल तर ते कोणीही थांबवू नये.
‘या सर्व गोष्टी करण्यासाठी ही जागा नाही’
दिल्लीतच राहणारे सुनील अगरवाल यांच्या मतानुसार, या सर्व गोष्टी करण्यासाठी पार्क, चित्रपटगृहे अशी ठिकाणे आहेत ना! तेथे त्यावर कोणी आक्षेप घेणार नाही. पण एखाद्या धार्मिक स्थळी असं वागणं बरोबर नाही, लोकं भडकतील असे ते म्हणाले. आदिती यांनी अगरवाल यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला. एखाद्या पवित्र,धार्मिक जागी जाऊन पीडीए (करणं) योग्य नाही, मला ते पटत नाही. त्यामुळे आपल्या पुढल्या पिढीवर वाईट परिणाम होईल, असे मत आदितीने व्यक्त केलं. एकमेकांच्या जवळ यायचंच असेल तर इतरही सार्वजनिक ठिकाणं आहेत की, तिथे जावं. धार्मिक स्थळी जिथे जाऊन आपण पूजा करतो, त्या जागी हे असलं वागणं मला योग्य वाटत नाही, असं ती म्हणाली.
‘ते व्यक्तीसापेक्ष’
थोडक्यात देवाच्या दारी किंवा धार्मिक स्थळी एकमेकांच्या जवळ येणं, पीडीए याला बऱ्याच जणांनी विरोध दर्शवला. पण मग हेच वागणं इतर (सार्वजनिक) ठिकाणी योग्य आहे का, स्वीकारार्ह आहे का? असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला. पीडीएमध्ये काही लिमिट किंवा मर्यादा असू नयेत असं मला वाटतं, पण आपला समाज तसा विचार करत नाही, असे सुनील अगरवाल म्हणाले. पीडीएची मर्यादा काय हे मी खरंच सांगू शकत नाही, ते व्यक्तीसापेक्ष आहे, असंही अगरवाल यांनी सांगितलं.
‘जोडीदाराबद्दल वाटणारं प्रेम व्यक्त करण्याच चूक काय?’
भारतात पीडीएबद्दल किंवा एकमेकांच्या जवळ येण्याबद्दल खूप मतप्रवाह आहेत, पण बऱ्याच जणांना हे वागणं म्हणजे लज्जास्पद, निंदनीय वाटतं. त्यामुळे लोकांना राग येऊ शकतो. पण म्हणून तो राग हिंसक पद्धतीने व्यक्त करणंही तितकंच चुकीचं आहे ना, असं परखड मत गुरगावमधील सोमाा सेनगुप्ता यांनी व्यक्त केलं. तर ग्रेटर नॉएडामधल्या शिवांगी सोनी हिला पब्लिक डिस्प्ले ऑफ अफेक्शन म्हणजेच सार्वजनिक जागी आपल्या जोडीदाराबद्दल वाटणारं प्रेम व्यक्त करणं, चुकीचं वाटत नाही. आपल्या देशात लोकशाही आहे आणि आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्यही आहे, त्यावर गदा येऊ शकत नाही. पण म्हणून सार्वजनिक ठिकाणी आपल्या वागण्यामुळे इतरांना त्रास होत असेल किंवा त्यांना ते पटत नसेल, तर आपण त्या गोष्टीचे भान राखले पाहिजे, असंही शिवांगी म्हणाली.
‘…तर सरकारनं विधेयक आणावं’
सार्वजनिक ठिकाणी प्रेमाचे प्रदर्शन करणे कितपत योग्य ? मुळात काय योग्य-काय अयोग्य, यामध्ये अतिशय कमी अंतर आहे. या मुद्यावरून समाजात (विचारांचे) दोन भाग पडतील. पीडीएचा हा मुद्दा जर खरंच एवढा महत्त्वाचा असेल तर सरकारने त्यावर चर्चा करून विधेयक आणावं, असा विचार कलकत्ता येथील स्वराज सेकसारिया यांनी मांडला.
‘हा व्यक्तीसापेक्ष मुद्दा’
दिल्लीत राहणारे शंकर कल्याण म्हणाले, पब्लिक डिस्प्ले ऑफ अफेक्शन योग्य की अयोग्य हा व्यक्तीसापेक्ष मुद्दा आहे. काही देशांमध्ये ते नॉर्मल मानले जाते, पण भारतात लोकांचे विचारप्रवाह वेगळे आहेत. सार्वजनिक ठिकाणी जवळ येणं, चुंबन घेणं, प्रेम व्यक्त करणं, लोकांना अजूनही योग्य वाटत नाही. मला स्वत:ला त्यात काही अयोग्य किंवा चुकीचे वाटत नाही, पण हे माझं मत आहे. एखाद्याने जोडीदाराचा हात जरी पकडला असेल तरी त्याच्या समोरच्या व्यक्तीला हे (वर्तन) लज्जास्पद किंवा चुकीचं वाटू शकतं, तो त्याचा विचार आहे, असं त्यांनी सांगितलं.
‘हे मॉरल पोलिसिंग कधी थांबणार?’
पण मग एवढे वेगवेगळे विचार असणाऱ्या देशात, पीडीए योग्य की अयोग्य कोण ठरवणार? त्याची मर्यादा काय हे कोण सांगणार? मुळात दोन (प्रौढ ) व्यक्तींनी, सार्वजनिक (परस्परसंमतीने) एकमेकांच्या जवळ जावं की नाही, प्रेम व्यक्त करावं की नाही हे मुद्दे खरोखरच रान पेटवण्याच्या योग्यतेचे आहेत का हे कसं ठरणार? हे मॉरल पोलिसिंग कधी थांबणार? हे सगळे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत.