ISKCON चा मनेका गांधी यांच्यावर 100 कोटीचा अब्रुनुकसानीचा दावा
भाजपा खासदार मनेका गांधी यांनी गायींना खाटीकांना विकले जात असल्याचा गंभीर आरोप इस्कॉनवर केल्यानंतर आता इस्कॉन संस्थेने त्यांच्या 100 कोटीचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.
नवी दिल्ली | 29 सप्टेंबर 2023 : भारतीय जनता पक्षाच्या खासदार मनेका गांधी यांनी अलिकडेच इंटरनॅशनल सोसायटी फॉर कॉन्शसनेस ( ISKCON ) वर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणातील मनेका गांधी यांचे सर्व आरोप इस्कॉन यांनी फेटाळले आहेत. तसेच मनेका गांधी यांच्यावर 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा इस्कॉनने दाखल केला आहे. इस्कॉन कोलकाताचे उपाध्यक्ष राधारमण दास यांनी या आरोपांनी इस्कॉनचे भक्त, समर्थक दुखावले आहेत. इस्कॉनच्या विरोधातील या आरोपाला आता कायदेशीर उत्तर दिले जाईल असेही त्यांनी सांगितले.
अलिकडेच मनेका गांधी यांचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. त्यात त्यांनी इस्कॉनवर खाटीकांना गायी विकल्याचा गंभीर आरोप केला होता. तसेच इस्कॉनवर देशातील धोकेबाज संस्था असल्याचा आरोपही केला होता. मनेका यांनी म्हटले होते की इस्कॉन गोशाळा स्थापन करण्यासाठी सरकारकडून मोठ्या जमीनी घेते आणि प्रचंड लाभ कमविते. त्यांनी आपण अलिकडेच आंध्रप्रदेशातील इस्कॉनच्या अनंतपूर गोशाळेला भेट दिली. तेथे एकही गाय चांगल्या स्थितीत नव्हती. त्या म्हणाल्या की गोशाळेच एकही वासरु नव्हते. याचा अर्थ त्याला विकले असू शकते. इस्कॉन आपल्या गायी खाटीकांना विकत आहे. हे लोक रस्त्यावर हरे राम हरे कृष्णाचा जप करीत फिरतात आणि सांगतात आमचे जीवन दूधावर अवलंबून आहे असाही आरोप त्यांनी केला होता.
मनेका यांचे आरोप निराधार
इस्कॉनने मनेका गांधी यांच्या आरोपांना खोटा आणि निराधार म्हटले आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार असलेल्या व्यक्तींच्या आरोपामुळे आम्ही हैराण आहोत असे संस्थेने म्हटले आहे. इस्कॉनचे राष्ट्रीय प्रवक्ता युधिष्ठीर गोविंदा दास यांनी इस्कॉनने जगात अनेक ठिकाणी गायीसाठी गोशाळा उभारल्या आहेत. जेथे गोमांस मुख्य आहार आहे अशा ठिकाणी आम्ही गोशाळा उभारल्या आहोत. सध्या इस्कॉनच्या गोशाळेत निराधार आणि सोडून दिलेल्या गायी पाळल्या जातात. त्यातील काही जखमी असतात. काही कत्तलीपासून वाचवल्यानंतर आमच्याकडे येतात असेही त्यांनी सांगितले.