निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच ‘आप’ची मोठी घोषणा; गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर; जाणून घ्या कोण आहे दावेदार?
'आप'ने इसुदान गढवी हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून जाहीर केले असले तरी लाखो लोकांनी त्यांच्या नावाला पसंदी दिली आहे.
नवी दिल्लीः आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमध्ये आप पक्षाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केला आहे. केजरीवाल यांनी इसुदान गढवी यांना मुख्यमंत्री म्हणून घोषित केले आहे. केजरीवाल यांनी 29 ऑक्टोबर रोजी सूरत येथे पत्रकार परिषद घेऊन त्या पत्रकार परिषदेतच नागरिकांना तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून कोणी पाहिजे असा सवाल केला होता.
गुजरात निवडणूक जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री पदाची जोरदार चर्चा सुरू होती. पाटीदार नेते गोपाल इटालिया, काँग्रेस सोडून आम आदमी पार्टीत दाखल झालेले अल्पेश कथेरिया, गुजरातमध्ये आम आदमी पार्टीच्या मुख्यमंत्रिपदासाठी इंद्रनील राज्यगुरू, मनोज सुर्थिया यांच्याही नावाची जोरदार चर्चा सुरू होती, मात्र अरविंद केजरीवाल यांनी जनतेने मागितलेला कौल मान्य करत त्या आधारे माजी पत्रकार इशुदान गढवी यांच्या नावाची घोषणा केली आहे.
इशुदान गढवी हे सध्या आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयुक्त सरचिटणीस आहेत. त्यांच्याविषयी बोलताना अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की, गुजरातमधील 16 लाख 48 हजार 500 लोकांनी आपले मत नोंदवले आहे.
त्यामुळे गुजरातमधील त्याच 16 लाखांहून अधिक लोकांच्या मताच्या आधार घेत मुख्यमंत्री पदाचा चेहरा निवडला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. इशुदान गढवी यांना लोकमताच्या आधारे त्यांची निवड केली आहे.
त्यामुळे आमच्या पक्षाचा मुख्यमंत्री पदाच चेहरा म्हणून इशुदान गढवीच असेल असंही त्यांनी जाहीर केले आहे. यावेळी त्यांनी गुजरात बदलाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचाचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अरविंद केजरीवाल यांनी 29 ऑक्टोबर रोजी सुरत येथे पत्रकार परिषद घेऊन लोकांना मुख्यमंत्री म्हणून कोणाला पाहायचे आहे, असे विचारले होते.
त्यांनी लोकांचे मत जाणून घेण्यासाठी एक नंबर देखील जारी केला होता. त्यावर लोकांनी 3 नोव्हेंबरच्या संध्याकाळपर्यंत कॉल आणि व्हॉट्सअॅपद्वारे आपले मत नोंदवले होते.
गुजरातमध्ये दोन टप्प्यात विधानसभा निवडणुका होणार असून पहिल्या टप्प्यात 1 डिसेंबरला 89 जागांसाठी मतदान होणार आहे.
तर दुसऱ्या टप्प्यात 5 डिसेंबर रोजी 93 जागांसाठी मतदान होणार आहे. तर हिमाचल प्रदेशसह गुजरात निवडणुकीचे निकाल 8 डिसेंबर रोजी जाहीर होणार असून आता या निवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.