YSRCPचे जगनमोहन रेड्डी INDIA आघाडीत सामील होणार? जगनमोहन यांच्या भेटीला अखिलेश आणि राऊत
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तसेच वायएसआरसीपीचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी बुधवारी नवी दिल्लीतील जंतरमंतर येथे आंध्र प्रदेश सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन केले. यावेळी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव तसेच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी त्यांची भेट घेतली आहे.
आंध्रप्रदेशात जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेस पक्षाचे सरकार कोसळले. चंद्राबाबूंचे तेलगू देशमचे ( टीडीपी) सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री चंद्राबाबूं यांनी एनडीए सरकारला पाठिंबा देण्याच्या बदल्यात आंध्राच्या पदरात भरघोस मदत पाडली आहे.आता जगनमोहन रेड्डी यांनी बुधवारी टीडीपी सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन केले. यावेळी विरोधी पक्षातील समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पाठिंबा धरण्याच्या ठिकाणी हजेरी लावल्याने आता शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या नात्याने जगनमोहन रेड्डी आता इंडिया आघाडीत सामील होणार का ? असा सवाल केला जात आहे.
आंध्रप्रदेशात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर नवनिर्वाचित टीडीपी सरकार विरोधात जगनमोहन रेड्डी यांच्या पक्षाने दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलन केले आहे. चंद्रबाबूच्या सरकारवर राज्यात हिंसाचार करणे आणि युवजन श्रमिक रायथु कॉंग्रेस पार्टीच्या ( YSRCP ) कार्यकर्त्यांनी लक्ष्य केल्याचा आरोप केला आहे. या धरणे प्रदर्शनला इंडिया आघाडीने पाठिंबा दिला आहे.या धरणे आंदोलनात विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी भेट देत पाठिंबा दिला आहे.अनेक नेते जगनमोहन यांच्या आंदोलनात पोहचले आणि त्यांनी केंद्र सरकारवर टिका केली आहे.
जगनमोहन रेड्डी यांच्या धरणे आंदोलनाला समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि रामगोपाल यादव, शिवसेनेचे नेते संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदी आणि अरविंद सावंत, टीएमसीचे नजीबुल हक आणि जेएमएमचे विजय हांसदा आणि आम आदमी पार्टीचे नेते राजेंद्रपाल गौतम आणि AIADMK चे नेते थंबी दुराई आदी नेते जगन यांना साथ देण्यासाठी पोहचले होते. यावेळी तामिळनाडूच्या व्हीसीके पार्टीने जगनमोहन यांनी इंडिया आघाडीत सामील होण्याचे आवतन दिले.
YSRCP जवळ आहेत 15 खासदार
जगनमोहन रेड्डी यांनी एनडीए आठवण करुन दिली की आमच्याकडे 15 खासदार आहेत हे ध्यानी असू द्या असे म्हटले आहे. राज्यसभेत वायएसआरसीपीचे 11 खासदार असून लोकसभेत 4 खासदार आहेत. तर लोकसभेत टीडीपीच्या खासदारांचे संख्या 16 आहे. त्यामुळे आमची आणि टीडीपीची ताकद बरोबरीची असल्याचेही जगमोहन रेड्डी यांनी केंद्र सरकारला ठणकावून सांगितले आहे. ‘आज टीडीपीची सत्ता आहे. उद्या आम्ही सत्तेत येऊ शकतो. परंतू आम्ही कधी अशा प्रकारच्या वागणूकीचे समर्थन केले नाही. आम्ही कधीच हल्ले करणाऱ्यांना, संपत्तीची नासधुस करणाऱ्यांना पाठीशी घातले नाही. परंतू टीडीपीचे सरकार सत्तेत आल्यानंतर आज आंध्रप्रदेशची स्थिती एकदम वाईट झाली असल्याचे जगनमोहन रेड्डी यांनी म्हटले आहे.
विरोधकांना लक्ष्य करणे योग्य नाही
राज्यात लोकशाही शिल्लक राहीलेली नाही. सत्ता स्थापनेनंतर 45 दिवसात 30 हून अधिक लोकांची हत्या झाली आहे. अनेक संपत्तीची नासधूस करण्यात आली आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा मुलगा नारा लोकेश यांनी संपूर्ण राज्यात विरोधी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची नावे प्रदर्शित केली आहेत आणि त्यांच्याविरोधात ते कारवाई करीत आहेत. यासारखी होर्डिंग संपूर्ण राज्यात लागली आहेत. सत्तेत आल्यानंतर विरोधकांना असे लक्ष्य करणे योग्य नाही. विरोधी पक्षांचा आवाज देखील ऐकायला हवा, ही लोकशाही आहे असे समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.