जजचा फोन आला, पोलीस दलात खळबळ, पथक लागलं कामाला, नेमकं घडलं काय ?
जज साहेबांनी पोलिसांनी फोन केला, त्यानंतर पोलिसांनी फिर्याद नोंदविली, पथकं नेमण्यात आली, सीसीटीव्ही तपासण्यात आले, नेमकं झालं तरी काय ?
जयपूर | 28 ऑगस्ट 2023 : राजस्थानातील राजधानी जयपूर येथून एक अजब बातमी आली आहे. जयपूर येथे एका न्यायाधीशाच्या मुलाचे महागडे बूट मंदिराच्या दारातून चोरीला गेल्याने जजसाहेबांनी थेट पोलिसात तक्रार दाखल केल्याने अख्खं पोलिस दल कामाला लागले आहे. या प्रकरणानंतर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करीत तपास सुर केला आहे. पोलिसांनी मंदिराचे सीसीटीव्ही फूटेज तपासून पुरावे गोळा करायला सुरुवात केली आहे. काही जणांना संशयावरुन ताब्यात घेतल्याचेही सांगण्यात येत आहे.
राजस्थानातील अलवर येथील पोक्सो कोर्टात जज म्हणून जोगेंद्र कुमार अग्रवाल काम पाहात आहेत. ते आपल्या कुटुंबियासमवेत जयपूर येथील बडी चौपड परिसरातील ब्रिज निधी मंदिरात दर्शनासाठी गेले होते. जेव्हा त्यांचा परिवार मंदिराच्या आतील भागात गेले. तेव्हा त्यांच्या परिवाराने चपला बाहेर काढल्या. त्यात त्यांच्या मुलाने त्याचे महागडे बुटही मंदिराच्या बाहेर काढले. त्यानंतर त्यांनी मंदिरात देवाचे दर्शन घेतले. त्यानंतर ते आरामात बाहेर आले तर त्यांच्या मुलाचे महागडे बुट नाहीसे झाले होते. त्यानंतर जज साहेबांनी थेट पोलिस स्टेशनात फिर्याद दाखल केली.
10 हजार रुपयांचे बुट
जज साहेबांच्या मुलांचे बुटाची किंमतच 10 हजार रुपये असल्याचे उघडकीस आले आहे. जज जोगेंद्र कुमार अग्रवाल हे त्यांच्या मुलाचे महागडे बुट चोरीला गेल्याने चांगलेच वैतागले. त्यांनी पत्राद्वारे माणक चौक पोलिस स्टेशनला यासंबंधित तक्रार दाखल केली. जज साहेबांनी प्रत्यक्षात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी रितसर गुन्हा दाखल करीत लागलीच पथक स्थापन करीत तपास सुरु केला. हेड कॉन्स्टेबल मनीराम या प्रकरणाचा तपास करीत आहेत.