प्रतिक्षा संपली… जयपूर साहित्य महोत्सव 2025च्या प्रमुख वक्त्यांची नावे जाहीर; तुमचा आवडता लेखकही यात!
जयपूर साहित्य महोत्सव 2025, 30 जानेवारी ते 3 फेब्रुवारी दरम्यान जयपूरच्या क्लार्क्स आमेर हॉटेलमध्ये पार पडणार आहे. या महोत्सवात अँड्रे असीमन, अनिरुद्ध कानीसेटी, इरा मुखर्जी आदी जगप्रसिद्ध लेखक सहभागी होणार आहेत. विविध भारतीय भाषांमध्ये सत्रे आयोजित करण्यात येतील आणि जयपूर बुकमार्क हे बी2बी नेटवर्किंग प्लॅटफॉर्म देखील असेल.
ज्या फेस्टिव्हलची सर्वांना प्रतिक्षा असते तो जयपूर लिटरेचर फेस्टिव्हल पार पडणार आहे. भारतातील प्रमुख महोत्सव क्युरेटर आणि प्रोडक्शन हाऊस असलेल्या टीमवर्क आर्ट्सने 18व्या जयपूर साहित्य महोत्सवाच्या उद्घाटनातील पहिल्या सत्रातील वक्ते जाहीर केले आहेत. 30 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 2025 दरम्यान जयपूरमधील क्लार्क्स आमेर हॉटेलमध्ये हा महोत्सव पार पडणार आहे. जगभरात “पृथ्वीवरील सर्वात महान साहित्यिक शो” म्हणून ओळखला जाणारा हा महोत्सव, एकदा पुन्हा लेखक, विचारवंत आणि वाचकांना एकत्र आणून साहित्याच्या परिवर्तनात्मक शक्तीला आणि त्याच्या अद्वितीय क्षमतेला कनेक्ट करणाऱ्या विषयांवर चर्चा घडवून आणणार आहे. त्यामुळे या साहित्यिक जत्रेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
2025च्या या संस्करणात काय नाहीये? या संस्करणात कथा, संवाद आणि सादरीकरणांमध्ये असंख्य ऐतिहासिक, साहित्यिक, सांस्कृतिक, आणि पर्यावरणीय दृष्टीकोनांची सांगड घालली जाईल. या महोत्सवात, भारताच्या समृद्ध साहित्यिक परंपरेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनेक भाषांमध्ये सत्रे होणार आहेत. यात हिंदी, बंगाली, राजस्थानी, कन्नड, तामिळ, तेलुगू, ओडिया, संस्कृत, आसामी, मलयालम, मराठी, पंजाबी आणि उर्दू आदी भाषांचा समावेश आहे.
महोत्सवातील ‘प्रथम वक्ते’
यंदाच्या महोत्सवात महान साहित्यिकांचा समावेश होणार आहे. यात अँड्रे असीमन, अनिरुद्ध कानीसेटी, अन्ना फंडर, अश्वनी कुमार, कावेरी माधवन, क्लॉडिया डी राम, डेव्हिड निकोल्स, फियोना कार्नार्वॉन, इरा मुखोटी, आयरेनोसन ओकोजी, जेनी एर्पनबेक, जॉन व्हायंट, कालोल भट्टाचार्य, मैथ्री विक्रमसिंह, मानव कौल, मिरियम मार्गोलिज, नसीम निकोलस तालेब, नथान थ्राल, प्रयाग अकबर, प्रियंका मट्टू, स्टीफन ग्रीनब्लाट, टीना ब्राउन, वी. व्ही. गणेशानंथन, वेन्की रामकृष्णन आणि यारोसलाव ट्रॉफिमोव यांचा समावेश आहे. हे सर्व साहित्यिक वेगवेगळ्या परिसंवादात भाग घेऊन अनमोल मार्गदर्शन करणार आहेत.
या महोत्सवात प्रसिद्ध इतिहासकार अनिरुद्ध कानीसेटी देखील असणार आहेत. त्यांचे “द एज ऑफ रॅथ: ए हिस्ट्री ऑफ दिल्ली सुलतानट” हे पुस्तक मध्ययुगीन भारतावरील सुल्तानाचा प्रभाव अधोरेखित करते. ब्रिटिश कादंबरीकार डेव्हिड निकोल्स देखील उपस्थित असणार आहेत. आपल्याच प्रेमकथेवर आधारीत ‘वन डे’ या प्रसिद्ध कादंबरीचे ते लेखक आहे. या कादंबरीवर हॉलीवूड चित्रपट आणि नेटफ्लिक्स सीरीज तयार झाली आहे.
या महोत्सवातील इरा मुखोटी यांची उपस्थितीही महत्त्वाची आहे. भारताच्या मुघल साम्राज्यातील शक्तिशाली महिलांच्या अज्ञात कथा “डॉटर ऑफ द सन” मध्ये इरा यांनी सांगितलेल्या आहेत. “द लायन अँड द लिली: द रायझ अँड फॉल ऑफ आवध” मध्ये आवधच्या उदय आणि अस्ताची गोष्ट त्यांनी मांडली आहे. त्यामुळे या महोत्सवात त्या काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महोत्सवाचे मुख्य आकर्षण
जयपूर बुकमार्क (JBM) : हे महोत्सवाचे बी2बी नेटवर्किंग प्लॅटफॉर्म आहे. या ठिकाणी प्रकाशक, लेखक, साहित्यिक एजंट्स आणि उद्योग नेत्यांमध्ये नवकल्पना, सहकार्य आणि नवे संधी तयार होतात.
हेरीटेज इव्हिनिंग्स आणि जयपूर म्युझिक स्टेज : जयपूर साहित्य महोत्सव फक्त साहित्यावरच लक्ष केंद्रित करत नाही, तर राजस्थानच्या ऐतिहासिक परंपराही साजऱ्या करतो. जयपूर म्युझिक स्टेजवर भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कलाकारांची संगीत रजनी रंगणार आहे.
जागतिक आवाजांचा मंच: हा महोत्सव एक जागतिक साहित्यिक गॅदरिंग आहे. तो विचारप्रवर्तक आवाजांना एकत्र आणतो, जे समाजाच्या सुसंस्कृत विचारांना आव्हान देतात, नवकल्पनांना प्रेरणा देतात आणि विविधतेचा उत्सव साजरा करतात.
हा साहित्यिक शक्तीचा उत्सव
यावेळी प्रसिद्ध लेखिका आणइ महोत्सवाच्या सह निर्देशिका नमिता गोखले यांनी माध्यमांशी संवाद साधला. जयपूर साहित्य महोत्सव नेहमीच कथा, कल्पना आणि संस्कृतींच्या अद्वितीय संगमा मंच राहिला आहे. या 18व्या साहित्य महोत्सवाच्या तयारीत असून साहित्यिक शक्तीचा आम्ही उत्सव साजरा करत आहोत. ही शक्ती प्रेरणा देण्याची, आव्हान करण्याची आणि एकत्र आणण्याची क्षमता ठेवते. यावर्षी, आम्ही लेखक, कवी आणि विचारवंतांचं स्वागत करतो. आमच्या प्रेक्षकांना अविस्मरणीय परिसंवादात सामील करून एकत्र वाचनाच्या प्रेरणेला हे साहित्यिक प्रोत्साहन देतील, अशी आशा आहे, असं नमिता गोखले म्हणाल्या.
साहित्याचा कार्निव्हल
जयपूर साहित्य महोत्सव नेहमीच लेखनाच्या शब्दाचा उत्सव आणि विविध आवाजांचा संगम असतो. यंदा आम्ही पुन्हा गुलाबी शहरात एकत्र येताना, जगभरातील लेखक, विचारवंतांचं स्वागत करण्यासाठी उत्सुक आहोत. विचारांची रुची वाढवणारं हे ठिकाण आहे. याच ठिकाणी विविध संस्कृती एकत्र येतात आणि संवाद फुलतो. हा खऱ्या अर्थाने साहित्याचा कार्निव्हल आहे, असं प्रसिद्ध इतिहासकार, लेखक आणि महोत्सवाचे सह निर्देशक विल्यम डॅलरायंपल यांनी म्हटलं.
जयपूर महोत्सव हा साहित्याचा ब्रँड
टीमवर्क आर्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक संजय के रॉय यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जयपूर साहित्य महोत्सव हा नुसता साहित्याचा महोत्सव नाही, तर हा एक ब्रँड बनला आहे. हा ब्रँड संस्कृती, सर्जनशीलता आणि सहकार्याशी संबंधित आहे. यावर्षी, आम्ही त्याचा प्रभाव वाढवण्याचा उद्देश ठेवला आहे. फक्त साहित्याचा उत्सव म्हणूनच नाही, तर कथा सांगण्याचं एक शक्तिशाली व्यासपीठ म्हणून ते जगभरातील प्रेक्षकांशी जोडले जाऊ शकते. हा महोत्सव भागीदार, प्रायोजक आणि हितधारकांना विविध आणि सक्रिय प्रेक्षकांशी संवाद साधण्याची अभूतपूर्व संधी देत आहे. त्यामुळे अर्थपूर्ण संवाद तयार होतात आणि जागतिक दृश्यता मिळते. हा फक्त एक कार्यक्रम नाही – हे एक आंदोलन आहे जे संस्कृतींना जोडते आणि नवकल्पनांना प्रेरणा देते, असं संजय के रॉय म्हणाले.
जयपूर साहित्य महोत्सवाबाबत
या महोत्सवाची सुरुवात 17 वर्षांपूर्वी झाली होती आणि यंदा 18 व्या वर्षात त्याचं पदार्पण होत आहे. साहित्यिकांचा हा ऐतिहासिक मंच झाला आहे. या महामेळाव्यात फक्त देशातीलच नव्हे तर विदेशातील या महोत्सवात एकाच मंचावर लेखक, विचारवंत, मानवतावादी, राजकारणी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर एकत्र येतात.
टीमवर्क आर्ट्स या महोत्सवाच्या आयोजनासाठी प्रसिद्ध आहे. गेल्या 30 वर्षापासून टीमवर्क आर्ट्स साहित्यिक, कला आणि सामाजिक उपक्रमांमध्ये कार्यरत आहे. टीमवर्क आर्ट्सने एकाच मंचावर भारताच्या आणि जगभरातील कलाकार, लेखक, आणि बदल घडवणारे व्यक्ती एकत्र आणले आहेत. टीव्ही9 नेटवर्क आणि न्यूज9 जयपूर साहित्य महोत्सव 2025 चे भागीदार आहेत ही अत्यंत गौरवाची बाब आहे.