नवी दिल्ली : जैश-ए-मोहम्मदच्या (JeM) दहशतवाद्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोभाल यांच्या हत्येचा कट केल्याचं उघड झालंय. त्यामुळे डोभाल यांच्या ऑफिस आणि घराची सुरक्षा वाढवण्यात आलीय. जम्मू काश्मीर पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच जैशच्या एका दहशतवाद्याला स्फोटकांसह पकडलंय. त्याची चौकशी करताना पाकिस्तानच्या या कुरापतींचा खुलासा झालाय (Jaish terrorist reveals Pakistan plan to target NSA Ajit Doval).
पकडण्यात आलेल्या दहशतवाद्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, “पाकिस्तानमधील एका हस्तकाच्या निर्देशावरुन आरोपीने राजधानी दिल्लीतील सरदार पटेल भवनासह अतिमहत्त्वाच्या ठिकाणांची रेकी केली होती.” 2016 चं उरी येथील सर्जिकल स्ट्राईक आणि 2019 च्या बालाकोट हल्ल्यानंतर डोभाल पाकिस्तानमधून चालणाऱ्या दहशतवादी गटांच्या हिटलिस्टवर आलेत. डोभाल भारतातील सर्वात सुरक्षित व्यक्तींपैकी एक आहेत. त्याची सुरक्षा व्यवस्था त्या मोजक्या लोकांपैकी आहे ज्यांना 24 तास पूर्ण सुरक्षा पुरवली जाते. NSA ने या धोक्याबाबत सुरक्षा दलांना आणि गृह मंत्रालयाला माहिती दिली आहे.
शोपिया भागात असलेल्या जैशचा मोरक्या हिदायत उल्लाह मलिकला 6 फेब्रुवारी रोजी अनंतनागमधून अटक करण्यात आले होते. त्याच्या चौकशीत त्याने डोभाल यांच्या कार्यालयाचा एक व्हिडीओ तयार केल्याचंही कबुल केलंय. मलिकविरोधात गंग्याल पोलीस स्टेशनमध्ये UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. मलिक जैशच्या लश्कर-ए-मुस्तफा नावाच्या उपशाखेचा प्रमुख आहे. त्याला अनंतनागमध्ये स्फोटकांसोबत पकडण्यात आलं होतं.
2019 मध्ये डोभाल यांच्या ऑफिसचा व्हिडीओ
अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याने सांगितलं, “24 मे 2019 रोजी मी श्रीनगरहून जम्मू कश्मीरसाठी इंडिगो विमानाने प्रवास केला. मला NSA ऑफिस आणि तिथं तैनात CISF च्या सुरक्षेचा व्हिडीओ काढायचा होता. तसेच हा व्हिडीओ पाकिस्तानमधील हस्तकांना पाठवायचा होता. त्यानंतर मी बसने काश्मीरला परत आलो.” जम्मू काश्मीर पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपी मलिकने सांगितलं की त्याने 2019 मध्ये उन्हाळ्यात समीर अहमद डारसोबत सांबा सेक्टरची देखील रेकी केली होती. डारला पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यात सहभागी असल्याच्या आरोपाखाली आधीच 21 जानेवारी 2020 रोजी अटक करण्यात आलं होतं.
मलिकने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या अनेक मोरक्यांचे फोन नंबर आणि कोड नेम सांगितले आहेत. जम्मू काश्मीर पोलिसांनी ही माहिती सुरक्षा दलाला दिली आहे. यातील दोन जणांचा शोपियां आणि सोपोर येथे झालेल्या सुरक्षा दलाच्या कारवाईत खात्मा करण्यात आलाय.
हेही वाचा :
चीनचं भारताच्या 43 हजार चौरस किमीपेक्षा अधिक भागावर अतिक्रमण : राजनाथ सिंह
पाकिस्तानमध्ये 18 वर्ष कारावास, 15 दिवसांपूर्वी मायदेशी परतलेल्या महिलेचा औरंगाबादेत मृत्यू
मूळचा माढ्याचा, पाकिस्तानमध्ये कसा पोहोचला?, 7 वर्षानंतर परतला; पण या काळात काय काय घडलं?
व्हिडीओ पाहा :
Jaish terrorist reveals Pakistan plan to target NSA Ajit Doval