जम्मू आणि काश्मीर विधानसभेत कलम 370 वरून जोरदार धुमश्चक्री, कायदेमंडळ झाले कुस्तीचा आखाडा, सत्ताधारी आणि विरोधक आमदार भिडले
Jammu and Kashmir Legislative Assembly Article 370 : जम्मू आणि काश्मीर विधानसभेत गेल्या दोन दिवसांपासून ओमर सरकार आणि विरोधकात अनेक मुद्दांवर खटके उडत आहेत. त्यातच आता कलम 370 वरून विधानसभा हा जणू कुस्तीचा आखाडा होतो की काय, अशी परिस्थिती झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधक आमदारांमध्ये धक्का बुक्की झाली.
जम्मू आणि काश्मीरमध्ये ओमर अब्दुल्ला सरकार सत्तेत आले आहे. कलम 370 वरून निवडणुकीतच वातावरण तापले होते. गेल्या दोन दिवसांपासून या मुद्दावर मोठा वाद सुरू आहे. आज या धुसफुसीचे रुपांतर धक्काबुक्की आणि हाणामारीपर्यंत गेले. सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले. कलम 370 वरून धुमश्चक्री उडाली. हे कलम परत घेण्यासाठी वाद उफाळून आला आहे. गुरूवारी दोन्ही गटातील आमदार एकमेकांना भिडले.
विधानसभेत तुफान राडा
जम्मू आणि काश्मीर विधानसभेत गुरुवारी तुफान राडा झाला. कलम 370 वर आमदारांमध्ये झटापट झाली. यावेळी कलम 370 रद्द करण्याची मागणी करणारे पोस्टर फाडण्यात आले. या गोंधळामुळे विधानसभेचे कामकाज 20 मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले होते. पण दोन्ही बाजुचे आमदारांची आक्रमकता पाहता आज विधानसभेच्या कामकाजाला फटका बसण्याची शक्यता आहे. सकाळीच विधानसभेत मोठा हंगामा झाला. त्यानंतर दोन्ही गटाचे आमदार आमने-सामने आल्याने वातावरण तणावपूर्ण झाले. घोषणाबाजीने सभागृह दणाणून गेले.
कलम 370 वरून मोठा गदारोळ
आमदार शेख खुर्शीद आज सकाळीच कलम 370 पुन्हा बहाल करण्यात यावे अशी मागणी करणारे पोस्टर घेऊन सभागृहात आले. हे पोस्टर पाहताच भाजप आमदार भडकले. त्यांनी हे पोस्टर हिसकवण्याचा आणि फाडण्याचा प्रयत्न केला. त्यात दोन्ही गटात झटापट झाली. भाजप आमदारांनी शेख खुर्शीद यांच्या हातातून पोस्टर हिसकावलेच आणि ते फाडले सुद्धा. त्यानंतर मग सभागृहात तुफान गदारोळ झाला.
#WATCH | A ruckus breaks out at J&K Assembly in Srinagar after Engineer Rashid’s brother & MLA Khurshid Ahmad Sheikh displayed a banner on Article 370. LoP Sunil Sharma objected to this. House adjourned briefly. pic.twitter.com/iKw8dQnRX1
— ANI (@ANI) November 7, 2024
भाजपचा नॅशनल कॉन्फरन्सवर जोरदार प्रहार
कलम 370 आता इतिहास जमा झाल्याचे भारतीय जनता पक्षाचे नेते रविंद्र रैना म्हणाले. ओमर अब्दुल्ला सरकार पाकिस्तानच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप यावेळी भाजपाने केला. कलम 370 ने जम्मू आणि काश्मीरमधे दहशतवाद, अलिप्ततावाद आणि पाकिस्तानी विचारांना खतपाणी घातल्याचा आरोप रैना यांनी केला. हे कलम हटवण्याचा प्रस्ताव असंवैधानिक असल्याचे ते म्हणाले. नॅशनल काँन्फरन्स आणि काँग्रेस हे जम्मू आणि काश्मीर खोऱ्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.