पुलवामात पुन्हा दहशतवादी सक्रिय, हल्ल्यात पोलीस कर्मचारी शहीद, एक जवानही गंभीर

| Updated on: Oct 02, 2022 | 4:28 PM

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला आहे. त्यामध्ये एक पोलीस शहीद झाला आहे.

पुलवामात पुन्हा दहशतवादी सक्रिय, हल्ल्यात पोलीस कर्मचारी शहीद, एक जवानही गंभीर
Follow us on

जम्मू-काश्मीर: जम्मू काश्मीर (Jammu kashmir) खोऱ्यात पुन्हा एकदा दहशदवादी कारवाया वाढल्या असून या परिसरातील पिंगलाना, पुलवामामध्ये दहशतवाद्यांकडून हल्ला (terrorists Attack) करण्यात आला आहे. या हल्ल्यात एक पोलीस शहीद (Police Martyr) झाला असून सीआरपीएफचा एक जवानाही गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला आहे. त्यामध्ये एक पोलीस शहीद झाला आहे. तर एक सीआरपीएफ जवान जखमी झाला असून दहशतवादी हल्ला झालेल्या परिरात शोध मोहीम सुरु करण्यात आली आहे.

 

या हल्ल्याबाबत माहिती देताना जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले की, रविवारी पुलवामाच्या पिंगलना येथे दहशतवाद्यांकडून सीआरपीएफ आणि पोलिसांच्या संयुक्त तळावर गोळीबार केला गेला.

या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला असून सुरक्षा दलांकडून परिसराला वेढा घालण्यात आला आहे. सुरक्षा दलाकडून शोध मोहीमही सुरु करण्यात आली आहे.

जम्मू-काश्मीर परिसरात रविवारी झालेला हा दुसरा दहशतवादी हल्ला आहे. आजच दहशतवाद्यांनी या भागात आपल्या कारवाया सुरु करण्यात आल्यामुळे वातावरणात ताण तणाव पसरला आहे.

काही तासांपूर्वी शोपियानमध्ये सुरक्षा दलांची आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. त्यामध्ये एक दहशतवादी मारला गेला आहे.

ही चकमक शोपियानच्या बास्कुचनमध्ये झाली होती. सुरक्षा दलाकडून ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव नसीर अहमद भट्ट असे असून तो नौपोरा बास्कुचन येथील रहिवासी असल्याचेही सांगण्यात आले आहे.

तो लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित होता अशी माहिती देण्यात आली आहे. जम्मू-काश्मीर पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, मारल्या गेलेल्या दहशतवाद्याकडून दारूगोळा, पिस्तूल, आणि एके रायफल्ससह अनेक शस्त्रेही जप्त केली गेली आहेत.

तो अनेक दहशतवादी गुन्ह्यांमध्ये सामील असल्याचे सांगण्यात आले असून तो मागे एकदा एका चकमकीतून निसटला होता.

ओमर अब्दुल्ला यांनी या दहशतवादी हल्ल्याबद्दल ट्विट केले आहे. त्यांनी त्यामध्ये म्हटले आहे की, या हल्ल्याचा मी निषेध करतो. आज कर्तव्य बजावताना ज्यांनी आपले प्राणांचे बलिदान दिले आहे, त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या मनात संवेदना आहे. तर जखमी सीआरपीएफ जवानांप्रतीही संवेदना व्यक्त करत असल्याचे त्यांनी सांगितले.

यापूर्वी 30 सप्टेंबर रोजी बारामुल्ला येथे सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले होते.
काश्मीर झोनचे एडीजीपी विजय कुमार यांनी सांगितले होते की, दोन्ही स्थानिक दहशतवादी प्रतिबंधित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदशी संबंधित होते.