दहशतवाद्यांच्या कुरापती पुन्हा वाढल्या, ड्रोनच्या साहाय्याने शस्रत्रांचा पुरवठा, दोघांना घेतेले ताब्यात
जम्मू-काश्मीर पोलिसांनी आरएस पुरा सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेजवळ ड्रोनद्वारे टाकलेल्या शस्त्रात्रं जप्त केली आहेत.
नवी दिल्लीः जम्मू काश्मिरमधील वेगवेगळ्या परिसरात दहशतवाद्यांच्या कुरापती वाढल्या आहेत. जम्मू-काश्मीर पोलिसांनी आरएस पुरा सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेजवळ ड्रोनद्वारे टाकलेल्या शस्त्रात्रं जप्त केली आहेत. त्यामुळे याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. या घटनेची एका पोलीस अधिकाऱ्याने रविवारी ही माहिती दिली असून या परिसरात शोध मोहीम राबण्यात आली आहे.
अतिरिक्त पोलीस महासंचालक मुकेश सिंह यांनी सांगितले की, रविवारी पहाटे बासपूर बंगला परिसरात ड्रोनच्या हालचालीची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर परिसरातील सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क करण्यात आले होते.
त्यानंतर या प्रकरणी कारवाई करण्यात आली असून चंद्र बोस आणि समशेर सिंग या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चार पिस्तूल, 8 मॅगझिन आणि 47 जीवंत काडतुसे जप्त केल्याचे सांगण्यात आले आहे.
या कारवाईबरोबरच आज याच परिसरातून पोलिसांनी लष्कर-ए-तैयबाच्या एका दहशतवाद्याला अटक केली आहे. रविवारी आदिल गनी दार या दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे.
शोपियानमधील मोहंदपोरा येथून अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. भारतीय लष्कर आणि पोलिसांनी केलेल्या कारवाईत दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळाही जप्त केला गेला आहे.
भारतीय लष्कर जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी मोहीम राबवत असून या मोहिमेअंतर्गत लष्कराकडून गुरुवारीही बारामुल्ला येथून एका दहशतवाद्यालाही अटक केली गेली आहे.
जम्मू काश्मीरमध्ये आता संयुक्त कारवाई राबवण्यात येत असून दहशतवाद्यांविरोधात जोरदार मोहीम राबवण्यात येत आहे. ज्या दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती.
त्यातील एक दहशतवादी फरार असून त्याचा शोध घेणं सुरू आहे. यादरम्यान लष्कराने सर्च पार्टीवर हल्ला करणाऱ्या एका दहशतवाद्याचा खात्मा केला असून या घटनेत लष्कराचा एक जवानही जखमी झाला होता, त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला असल्याचे भारतीय लष्कराने सांगितले.