जम्मू काश्मिरात (Jammu Kashmir Terrorist Attack) एका शिक्षिकेची गोळ्या (Teacher Murder) झाडून हत्या करण्यात आली. अतिरेक्यांनी गोळ्या झाडत शिक्षिकेच्या केलेल्या हत्येनं जम्मू काश्मीर हादरुन गेलं आहे. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या शिक्षिकेला रुग्णालयात उपचारासाठी देण्यात येत होतं. मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी या महिलेला मृत घोषित केल्यानंतर एकच खळबळ उडाली. काश्मीर झोनच्या पोलिसांनी याबाबतची माहिती दिली. रजनी असं हत्या करण्यात आलेल्या शिक्षिकेचं नाव आहे. काही दिवसांपूर्वीच एका गायिकेची हत्या करण्यात आल्यानं जम्मू काश्मीर हादरुन गेलं होतं. ही घटना ताजी असतानाचा आता एका शिक्षिकेच्या हत्येनं जम्मू काश्मिरात खळबळ माजली आहे. हत्या करण्यात आलेली महिला काश्मिरी पंडीत होती. रजनी नावाची शिक्षिका शाळेत असतानाच दहशतवादी कुलगामच्या गोपारपुरा येथील हायस्कूलमध्ये घुसले आणि त्यांनी या शिक्षिकेवर निर्दयीपणे गोळ्या झाडल्या.
काश्मीर झोनच्या पोलिसांच्या ट्वीट करत अतिरेक्यांनी घडवून आणलेल्या हत्याकांडाची माहिती दिली आहे. अतिरेक्यांनी महिला शिक्षिकेवर गोळ्या झाडल्या. महिलेला गोळी लागल्यानंतर तिला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. पण तिथं महिलेला मृत घोषित केलं गेलं. या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे. सुरक्षाबदलाच्या जवानांकडून आता जागोजागी तपासणी करण्यात येत असून हल्लेखोरांचा शोध घेतला जातोय.
दरम्यान, जम्मू काश्मिरातील अवंतीपुरामध्ये दोघा अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला होता. अवंतीपुरामध्ये झालेल्या चमकीत दोघा अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षाबलाच्या जवानांना यश आलं होतं. काश्मीर झोन पोलिसांनी या कारवाईबाबतची माहिती दिली आहे. यानंतर अतिरेक्यांकडे असलेली हत्यारं देखील हस्तगत करण्यात आली आहे. चकमकीनंतर पोलिसांकडून सर्च ऑपरेशन केलं जात असल्याची माहिती देण्यात आली होती.
अवंतीपुरामध्ये अतिरेक्यांनी सुरक्षाबलाच्या जवानांवर गोळीबार केला होता. त्यानंतर सुरक्षाबलाच्या जवानांनी प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारा दोघे अतिरेकी ठार झाले. खात्मा करण्यात आलेल्या अतिरेक्यांमध्ये शाहिद राथर आणि उमर युसूफ यांचा समावेश आहे. दरम्यान, आता शिक्षिकेवर करण्यात आलेल्या गोळीबाराच्या घटनेनं पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.