JEE-Mains | विद्यार्थ्यांच्या विरोधानंतरही जेईई (मेन्स) परीक्षा सुरु, नागपूर खंडपीठाकडूनही दिलासा नाही
जेईई आणि नीटची परीक्षा पुढे ढकलण्यास नागपूर खंडपीठाने नकार दिला आहे. पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना येण्यास अडचणी असल्याने परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली होती.
मुंबई : अनेक राज्यांतील विद्यार्थी, कार्यकर्ते आणि बिगर भाजपशासित सरकारच्या विरोधाला न जुमानता जेईई (मेन्स) (JEE-Mains) परीक्षा आजपासून सुरु होत आहेत. जेईई (मेन्स) परीक्षा 1 सप्टेंबर ते 6 सप्टेंबर या कालावधीत होणार आहेत, तर ‘नीट’ परीक्षा 13 सप्टेंबरला नियोजित आहे. कोरोना प्रादुर्भावातही परीक्षा घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने गेल्या महिन्यातच परवानगी दिली. (JEE Mains NEET Exams begin in spite of Students oppose)
परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) कडून मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांची सुरक्षा डोळ्यासमोर ठेवून ही परीक्षा घेण्यात येत असल्याचे एनटीएचे म्हणणे आहे. मात्र अनेक विद्यार्थ्यांनी या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी उचलून धरली आहे.
दरम्यान, जेईई आणि नीटची परीक्षा पुढे ढकलण्यास नागपूर खंडपीठाने नकार दिला आहे. पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना येण्यास अडचणी असल्याने परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली होती.
केंद्र सरकार आणि संबंधित विभागाने 15 दिवसांत निर्णय घ्यावा, परीक्षा न देता आलेल्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यावं, मात्र आजची परीक्षा होणारच, असे खंडपीठाने स्पष्ट केले.
जेईई (मेन्स) आणि ‘नीट’ परीक्षेशी संबंधित महत्त्वाच्या बाबी
1. मागील आठवड्यात, एनटीएने परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे आणि नियमांची एक विस्तृत यादी जारी केली. यामध्ये फेस मास्क आणि ग्लोव्हजचा वापर अनिवार्य केला आहे. तसेच हात स्वच्छ धुणे, पिण्याच्या वैयक्तिक पाण्याच्या बाटल्या यांचाही समावेश आहे. उमेदवारांनी परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी साबण आणि पाण्याने आपले हात धुणे आवश्यक आहे.
2. एनटीएने म्हटले होते की विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यासाठी थर्मल स्कॅन करणे बंधनकारक आहे. ज्यांच्या शरीराचे तापमान एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त आहे अशा उमेदवारांसाठी वेगळे वर्ग असतील. एनटीएने सेल्फ-डिक्लेरेशनही मागितले आहे. उमेदवारांमध्ये कोविडची लक्षणे नाहीत किंवा ते कोणत्याही संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात नव्हते, हे सांगावे लागेल.
3. एनटीएने असेही म्हटले आहे की सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी परीक्षा केंद्रांची संख्या वाढवली आहे. (JEE Mains NEET Exams begin in spite of Students oppose)
4. कोव्हिड काळात प्रवासादरम्यान होणारी गैरसोय टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचे शहर निवडण्याची परवानगी देण्यात आली आहे, जेणेकरुन त्यांना परीक्षा सहजतेने घेता येईल.
5. सोमवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत 12.75 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी ‘नीट’ची प्रवेशपत्रे डाऊनलोड केली होती. 7.78 लाख विद्यार्थ्यांनी जेईई (संयुक्त प्रवेश परीक्षा) साठी प्रवेशपत्रे डाऊनलोड केली होती. एनटीएच्या मते ‘नीट’साठी नोंदणीकृत विद्यार्थ्यांची एकूण संख्या सुमारे 16 लाख आहे. सुमारे 8.58 लाखांनी जेईईसाठी नोंदणी केली आहे.
6. पश्चिम बंगाल, झारखंड, राजस्थान, छत्तीसगड, पंजाब आणि महाराष्ट्र या सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात धाव घेत परीक्षेला परवानगी देण्याच्या 17 ऑगस्टच्या आदेशावर पुनर्विचार करण्यास सांगितले होते.
I wish best of luck to all students who are going to appear for the JEE tomorrow. I am also glad that over 7,77,465 have downloaded their admit cards. I have spoken to the CMs of most states to ensure that students don’t face problems: Ramesh Pokhriyal, Union Education Minister pic.twitter.com/zTBVEGJCxD
— ANI (@ANI) August 31, 2020
संबंधित बातम्या :
JEE परीक्षेला सुरुवात, पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी
(JEE Mains NEET Exams begin in spite of Students oppose)