के. कविता यांना तिहार जेलमधून आले पत्र, ‘पिक्चर अभी बाकी है…’, सर्व कर्म परत येत आहेत
तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची मुलगी के कविता यांना ईडीने दिल्ली येथील दारू घोटाळा प्रकरणी ताब्यात घेतले आहे. न्यायालयाने कविता यांना 7 दिवसांची कोठडी सुनावली आहे. अशातच के. कविता यांना दिल्लीच्या तिहार जेलमधून एक पत्र आले आहे.
नवी दिल्ली | 19 मार्च 2024 : बीआरएस पक्षाचे नेते आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची मुलगी के. कविता ही सध्या ईडी कोठडीत आहे. दिल्ली सरकारच्या दारू धोरणामध्ये झालेल्या घोटाळ्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. हे धोरण अंमलात आणण्यासाठी 100 कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप के. कविता यांच्यावर आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असतानाच के. कविता यांना दिल्लीच्या तिहार जेलमधून एक पत्र पाठविण्यात आले आहे. या पत्रात के. कविता यांना ‘पिक्चर अभी बाकी है’, असा इशारा देण्यात आलाय. तिहार जेलमध्ये याच प्रकरणात सजा भोगत असलेल्या सुकेश चंद्रशेखर याने हे पत्र लिहिले आहे.
सुकेश चंद्रशेखर याने या पत्रात के. कविता यांचे स्वागत आहे, असे म्हटले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबद्दलची अधिक माहिती आपल्याकडे आहे असा दावाही त्यांनी या पत्रात केला आहे. कविता यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात सुकेश यांनी, ज्यांनी स्वतःवरील आरोप खोटे ठरवले. आम्हाला राजकीय बळी ठरवले अशा लोकांना त्यांच्या कर्माचे फळ मिळत आहे. आता सत्याच्या सामर्थ्याला सामोरे जावेच लागेल. तुझी सर्व कर्म तुझ्याकडे परत येत आहेत, असा इशारा या पत्रातून देण्यात आला आहे.
सुकेश याने बीआरएस नेत्या कविता यांना लिहिलेल्या पत्रात, ‘प्रिय के. कविता, सत्याचा विजय झाला. खोटे खटले म्हणण्याचे नाटक, खोटे आरोप आणि राजकीय जादूटोणा फसला. पिक्चर अभी बाकी है. आता तुम्हाला सत्याच्या शक्तीला सामोरे जावे लागेल. तुम्ही अस्पृश्य आहात, अजिंक्य आहात, असे तुम्हाला नेहमी वाटायचे. पण, तुम्ही या नव्या भारतात विसरलात की आता कायदा पूर्वीपेक्षा मजबूत आणि शक्तिशाली झाला आहे असा टोलाही लगावला आहे.
सुकेश यांनी या पत्रामध्ये एक महत्वाचा उल्लेख केलाय. ‘मी माझ्या प्रेस रिलीजमध्ये दोन गोष्टी सांगितल्या होत्या. विधानसभा निवडणुकीत तेलंगणात बीआरएस सत्तेतून बाहेर पडेल. असे मी गेल्या वर्षी म्हटले होते. त्याप्रमाणेच घडले आहे. आणि दुसरे म्हणजे, तुमच्या अटकेची आणि तिहार जेलचा भाग बनण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे या दोन्ही घटना घडल्याचे दिसत आहे असे सुकेश यांनी म्हटले आहे.