Karnataka Election : कर्नाटक निवडणूकांआधीच भाजपाला झटका, पक्षाच्या दिग्गज नेत्याने केली राजकारणातून निवृत्तीची घोषणा
कर्नाटक विधानसभा निवडणूकांची भाजपाची पहिली यादी येण्याआधीच भाजपाच्या दिग्गज नेत्याने आपली निवृत्ती जाहीर करून भाजपाला धक्का दिला आहे.
बंगळुरू : कर्नाटक विधानसभेची निवडणूक तोंडावर आली असताना भारतीय जनता पार्टीचे कर्नाटकचे दिग्गज नेता केएस ईश्वरप्पा यांनी राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा केली आहे. ईश्वरप्पा यांनी मंगळवारी आपण आता कोणत्याही निवडणूकीला उभा राहणार नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र लिहून आपण राजकारणातून आता बाजूला होत आहोत. पार्टीने मला ४० वर्षांत अनेक जबाबदाऱ्या दिल्या. अगदी बूथ इनचार्ज ते प्रदेश अध्यक्ष पर्यंतचा हा प्रवास आपण केला आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री बनन्याचे भाग्य मला लाभले असे म्हटले आहे.
सर्वस्वी आपला निर्णय
भाजपाच्या दिग्गज नेते ईश्वरप्पा यांनी 10 मे रोजी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणूका न लढण्याचा निर्णय देखील त्यांनी पक्षाला कळविला आहे. कन्नड भाषेत लिहिलेल्या छोटेखानी पत्रात माजी उपमुख्यमंत्री राहिलेल्या ईश्वरप्पा यांनी म्हटले आहे हा निर्णय सर्वस्वी आपला आहे. ईश्वरप्पा त्यांच्या वक्तव्यावरून आणि त्यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे कायम वादग्रस्त राहीले आहेत.
75 वर्षांचे होणार आहेत ईश्वरप्पा
ईश्वरप्पा जून महिन्यात 75 वर्षांचे होणार आहेत. भाजपामध्ये निवडणूका लढण्याचे आणि सरकारी पद धारण करण्याचे त्यांचे वय उलटले आहे. अर्थात काही अपवाद राहीले आहेत. भाजपाने कर्नाटक विधान सभेसाठीच्या 224 जागांसाठी आपली उमेदवारांची पहिली यादी अजून जाहीर केलेली नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी कर्नाटक विधानसभेसाठीची उमेदवारांची पहिली यादी मंगळवारी किंवा बुधवारी जाहीर होईल. या यादीला अंतिमस्वरूप देण्याबाबत काही अडचण नसल्याचेही त्यांनी म्हटले होते.
कर्नाटक विधान सभेच्या निवडणूकांसाठीची अधिसूचना येत्या 13 एप्रिल रोजी होईल. नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल आहे. भाजपा पूर्ण बहुमताने पुन्हा सत्तेत येण्याचा दावा करीत आहे. पार्टीने 224 जागांपैकी 150 जागा जिंकण्याचे लक्ष ठेवले आहे.