Karnataka Halal Meat Row: ‘हलाल’ मटण म्हणजे ‘आर्थिक जिहाद’च, भाजप नेत्याचं वक्तव्य, हिजाबनंतर कर्नाटकात आता नवा वाद
कर्नाटकात उगाडी सणानंतर मागील काही दिवसांपासून मांसाहार करणाऱ्या हिंदुंना हलाल मटण न खाण्याचं आवाहन केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर रवी यांनी हे वक्तव्य केलंय.
नवी दिल्ली : कर्नाटकात (Karnataka) हिजाब वादानंतर आता हलाल विवादाने डोकं वर काढलं आहे. हलाल मटणावरुन (Halal Meat) कर्नाटकच्या राजकारणात मोठी खळबळ माजलीय. भाजपचे महासचिव सीटी रवी (CT Ravi) यांनी याबाबत एक वक्तव्य केल्यानं हा मुद्दा प्रकर्षाने चर्चिला जातोय. सीटी रवी यांनी हलाल मटण म्हणजे आर्थिक जिहाद (Economic jihad) असल्याचं म्हटलंय. हिंदुंही हलाल मटणाचा वापर करु नये असं आवाहनही रवी यांनी केलंय. कर्नाटकात उगाडी सणानंतर मागील काही दिवसांपासून मांसाहार करणाऱ्या हिंदुंना हलाल मटण न खाण्याचं आवाहन केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर रवी यांनी हे वक्तव्य केलंय.
महत्वाची बाब हिंदू समाजातील एक वर्ग असाही आहे जो देवाला मांस अर्पण करुन नव्या वर्षाचं स्वागत करतो. मात्र, या परंपरेला फाटा देत सीटी रवी यांनी हे मोठं वक्तव्य केलंय. हलाल मटण म्हणजे आर्थिक जिहाद असल्याचं रवी यांनी म्हटलंय. याचा अर्थ मुस्लिमांनी इतर कुणाशीही व्यवहार करु नये. हलाल मांस खावं असं ते सांगतात तेव्हा ते खाऊ नका असं आपण का म्हणू शकत नाहीत? असा सवालही रवी यांनी केलाय.
‘हलालचा वापर ही गुप्त रणनिती’
हलालचा वापर ही गुप्त रणनिती असल्याचंही सीटी रवी यांनी म्हटलंय. ते म्हणतात की त्यांच्या देवाला अर्पण केलेलं हलाल मांस मुस्लिमांना प्रिय आहे. मात्र, आमच्यासाठी ते कुणाचं तरी उरलेलं आहे. अशा प्रकारच्या गोष्टी फक्त मुस्लिमांकडूनच विकत घाव्यात अशी व्यवस्था बनवली गेलीय. जेव्हा मुस्लिम हिंदूंकडून मांस विकत घ्यायला तयार नसतात, तेव्हा हिंदूंनी त्यांच्याकडून मांस विकत घेण्याची सक्ती का केली जातेय? असा सवालही रवी यांनी विचारलाय.
तुम्हाला हे राज्य कुठे घेऊन जायचं आहे? – एचडी कुमारस्वामी
मुस्लिम नॉन हलाल मांस खायला तयार असतील तर मग हिंदूही हलाल मांस खातील. हे सगळं कधीच एकतर्फी नसतं, असं रवी म्हणाले. दरम्यान, रवी यांच्या या वक्तव्यानंतर आता खळबळ उडाली आहे. हे एकप्रकारे द्वेषाचं राजकारण असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. तुम्हाला हे राज्य कुठे घेऊन जायचं आहे? असा सवाल माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी विचारलाय. तसंच मी हिंदू तरुणांना हात जोडून विनंती करतो की राज्यातील वातावरण खराब करु नका, असं आवाहनही एचडी कुमारस्वामी यांनी केलंय.
इतर बातम्या :