‘भारत जोडो’ सुरूच राहणार…; ट्विटर हँडल ब्लॉक करण्याच्या आदेशाला स्थगिती…
7 नोव्हेंबर रोजी बेंगळुरूमधील एका विशेष न्यायालयाने काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचे ट्विटर हँडल ब्लॉक करण्याचे आदेश दिले होते.
नवी दिल्लीः सध्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. तर दुसरीकडे काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरुन नवाच वाद उफाळून आला आहे. कॉपीराइटप्रकरणी बेंगळुरू न्यायालयाने भारत जोडो यात्रेचं ट्विटर हँडल ब्लॉक करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यावर आज पुन्हा निर्णय होऊन या आदेशाला स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे कर्नाटक उच्च न्यायालयाकडून काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे.
काँग्रेसचे ट्विटर हँडल आणि ‘भारत जोडो यात्रा’ ब्लॉक करण्याच्या बेंगळुरू न्यायालयाच्या आदेशाला न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
7 नोव्हेंबर रोजी बेंगळुरूमधील एका विशेष न्यायालयाने काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचे ट्विटर हँडल ब्लॉक करण्याचे आदेश दिले होते.
कॉपीराइटच्या मुद्द्यावरून हा निर्णय देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात आम्ही विचार करत असल्याचे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी सांगितले आहे.
ट्विटर, फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्राम यांसारख्या सर्व अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार उद्यापर्यंत सर्व कॉपीराइट सामग्री काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. ‘केजीएफ चाफ्टर 2’ या चित्रपटाच्या साउंडट्रॅकचा कॉपीराइटविषयी खटला दाखल करण्यात आला होता.
बेंगळुरू न्यायालयाच्या आदेशामध्ये म्हटले होते की, फिर्यादीने विशेषत: सीडी सादर केली होती. त्यामध्ये त्यांच्या कॉपीराइट केलेल्या कामाची मूळ आवृत्ती आणि बेकायदेशीरपणे तयार केलेल्या दोन्ही प्रकारच्या फाइल्स सादर करण्यात आल्या होत्या.
सध्या न्यायालयासमोर उपलब्ध असलेल्या सामग्रीनुसार जर ते कॉपीराइटचे उल्लंघन केले असल्यास सिनेमॅटोग्राफी चित्रपट, गाणी, संगीत अल्बमचा व्यवसाय करणाऱ्या फिर्यादीचे कधीही भरून न येणारे नुकसान होणार असल्याचे म्हटले आहे. आणि या प्रकारामुळे पायरसीला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळणार असल्याची शक्यताही वर्तवण्यात आली होती.
बेंगळुरू न्यायालयाने आदेश दिल्यानंतर काँग्रेसने ट्विटर हँडलवरुन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यासंदर्भात आम्ही माहिती घेत असून त्याविषयी कायदेशीर माहितीही घेत असल्याचे काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले आहे.