थोडी तरी माणुसकी दाखवा; कर्ज फेडलं नाही म्हणून गर्भवतीवरच अत्याचार; पोटातील बाळही गेलं….
कर्नाटकात एका दलित कुटुंबाने कर्ज फेडले नाही म्हणून त्याच घरातील गर्भवती महिलेवर अत्याचार केला गेला. या प्रकरणात पोटातील बाळाचा मृत्यू झाला आहे.
चिक्कमंगळुरूः कर्नाटकातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चिक्कमंगळुरूमध्ये भाजपच्या एका समर्थकाने दलित समाजातील (Dalit Community) अनेक लोकांना बंदिस्त करुन ठेवले होते. ज्या आरोपींनी मागासवर्गीय लोकांना कोंडून ठेवले होते, त्याचे नाव जगदीश गौडा असल्याचे समोर आला आहे. त्याने मागासवर्गीय समाजातील 16 लोकांना आपल्या कॉफीच्या मळ्यात कोंडून ठेवल्याचा त्याच्यावर आरोप करण्यात आला होता. कोंडून ठेऊन त्यांचे प्रचंड हाल करुन मागासवर्गीय लोकांमधील एका गर्भवती महिलेवर (Pregnant women) अत्याचारही (Torture) केला. त्यामुळे महिलेच्या पोटात असणाऱ्या बाळाचाही मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
ज्या भाजपच्या नेत्यांनी महिलेला मारहाण केली आहे, त्या गर्भवती महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी जगदीश गौडा आणि त्यांचा मुलगा टिळक गौडा या दोघांविरुद्ध दलित अत्याचार प्रकरणी गुन्हा नोंद केला गेला आहे.
मात्र, आरोपी पिता-पुत्र दोघेही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. भाजपने मात्र ते आपले कार्यकर्ते नसल्याचे सांगून हात वर केले आहेत.
पक्षाच्या प्रवक्त्या वर्षसिद्धी वेणुगोपाल यांनी या प्रकरणी बोलताना सांगितले की, हे पक्षाचे कार्यकर्ते किंवा सदस्य नाहीत. ते फक्त पक्षाचे समर्थक आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित दलित समाजातील असून, ते जेनुगड्डे गावातील एका कॉफीच्या मळ्यात काम करत होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्यावर मालकाचे 9 लाख रुपयांचे कर्ज होते, ते देण्यास उशीर झाल्याने त्यांना कोंडून ठेवून मारहाण केली गेली आहे.
या प्रकरणी बोलताना एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, 8 ऑक्टोबर रोजी काही लोक बलेहोन्नूर पोलीस ठाण्यात आले होते.
त्यांनी जगदीश गौडा यांच्यावर नातेवाईकांचा छळ केल्याचा आरोप केला होता, मात्र पुन्हा या लोकांनी घाबरून तक्रार मागे घेतली होती.
आता पुन्हा या प्रकरणी चिक्कमंगळुरू येथे नवीन तक्रार दाखल केली गेली आहे. या प्रकरणामध्ये जिल्हा पोलीसप्रमुखांनी लक्ष घातले असून त्यांनी या प्रकरणी शोध मोहीम सुरु ठेवली आहे.