भाजपच्याच राज्यात ‘आरएसएसवर’ वर हल्ला; गावात पथसंचलन नकोच म्हणत बेदम मारले…
आरएसएसच्या पथसंचलनासाठी संघाचे कार्यकर्ते गावात गेले होते, मात्र ग्रामस्थांनी पथसंचलन करु नका अशी विनंती केली, त्यानंतर हा वाद विकोपाला गेला.
हावेरीः कर्नाटकातील हिंदू-मुस्लिम (Hindu Muslim) वाद काही मिठण्याची चिन्हं दिसत नाहीत. एकामागोमाग एक अशा अनेक घटना कर्नाटक राज्यात घडत असल्याने अनेकांची या घटनांबाबत चिंता व्यक्त केली आहे. कर्नाटकातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) एका कार्यकर्त्यावर हल्ला केल्याची घटना आता समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 20 हून अधिक जणांवर गुन्हा दाखल केला आहे.हे प्रकरण कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यातील एका गावात घडले आहे. मंगळवारी रात्री येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) कार्यकर्त्यावर हल्ला केला गेला आहे.
या हल्लाप्रकरणी 20 जणांव गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली गेली आहे. अटक केलेल्यांमध्ये एक मुस्लिम संघटनेचा अंजुमन-ए-इस्लामचा अध्यक्ष असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हावेरी जिल्ह्यातील रत्तेहल्ली गावामध्ये ही घटना घडली असून आरएसएसच्या पथसंचलनासाठी संघाचे कार्यकर्ते गावात गेले होते. त्यावेळी आरएसएस कार्यकर्त्यावर इतर गटातील लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला.
पथसंचलन करण्यावरुन गावात आधी शाब्दिक वाद सुरु झाला होता, त्यानंतर मात्र चर्चा सुरु असतानाच जोरदार हाणामारीला सुरुवात झाली.
हवेरीच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, या घटनेप्रकरणी 20 हून अधिक जणांना अटक करण्यात आली असून या आरोपींपैकी एक मुस्लिम संघटना अंजुमन-ए-इस्लामचा अध्यक्ष असल्याचे सांगण्यात आले आहे.
कर्नाटकातील एका मदरशात नुकताच काही लोकांनी जबरदस्तीने घुसून पूजा केल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर आरएसएसच्या कार्यकर्त्यावर हल्ला केल्याची घटना घडली असल्यचे सांगण्यात आले आहे.
कर्नाटकातील बिदरमध्ये दसऱ्याच्या कार्यक्रमादरम्यान जमावाने महमूद गव्हाण मदरशामध्ये जबरदस्तीने घुसला होता. या घटनेचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.