1 लाखांची रोकड, 1 किलो चांदी, 144 ग्रॅम सोने… महागड्या गिफ्टमुळे चर्चेत आले मंत्री
एक लाखांची रोकड, 144 ग्रॅम सोने, 1 किलो चांदी, एक रेशमी साडी, धोतर आणि ड्रायफ्रूट बॉक्सचा गिफ्टमध्ये समावेश आहे.
नवी दिल्ली : दिवाळी म्हंटल की भेटवस्तु आल्याच. दिवाळीच्या निमित्ताने अनेक जण आपले नातेवाईक, मित्र मंडळींना भेटवस्तूं देतात. या भेटवस्तुंवमध्ये मिठाई तसेच विविध वस्तुंचा समावेश असतो. मात्र कर्नाटकातील एका मंत्र्याने आपल्या विधानसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित महापालिका सदस्यांना अत्यंत महागड्या भेटवस्तू दिल्या आहेत. या महागड्या गिफ्टमुळे ते चांगलेच चर्चेत आले आहेत.
कर्नाटकचे पर्यटन मंत्री आनंद सिंह यांनी या सदस्यांना सोने, चांदी आणि रोख रक्कम भेट म्हणून दिली आहे. या भेटवस्तूंमुळे ते वादात सापडू शकतात अशी चर्चा रंगली आहे.
कर्नाटकचे मंत्री आनंद सिंह यांनी दिवाळी निमित्ताने भेट वस्तुंची खैरात वाटली आहे. या भेटवस्तू साध्या सुध्या नाहीत. महापालिका आणि ग्रामपंचायत सदस्यांना त्यांनी अत्यंत महागड्या भेटवस्तू दिल्या आहेत.
महापालिकेच्या सदस्यांना भेट म्हणून देण्यात आलेल्या बॉक्समध्ये एक लाखांची रोकड, 144 ग्रॅम सोने, 1 किलो चांदी, एक रेशमी साडी, धोतर आणि ड्रायफ्रूट बॉक्सचा समावेश आहे.
दुसरीकडे ग्रामपंचायत सदस्यांना दिलेल्या बॉक्समध्ये सोने नाही, रोख रक्कमही कमी आहे. पण बाकी सर्व वस्तुंचा यात समावेश आहे. कर्नाटकचे मंत्री आनंद सिंह हे होस्पेट विधानसभा मतदारसंघातून येतात. त्यांच्या मतदार संघात एक महानगरपालिका आणि 10 ग्रामपंचायती यांचा समावेश आहे.
या एका महापालिकेत 35 सदस्य निवडून आले आहेत. 10 ग्रामपंचायतीमध्ये 182 सदस्य आहेत. दिवाळीची ही महागडी भेट मंत्र्यांनी या सर्व सदस्यांना पाठवल्याचे सांगण्यात आले. तर, दुसरीकडे मंत्र्यांची ही भेट घेण्यास काही सदस्यांनी नकार दिल्याचेही चर्चा आहे.
शक्ती प्रदर्शन करत मतदार संघातील महापालिका आणि ग्रामपंचायत सदस्यांना आकर्षित करण्यासाठी या भेटवस्तू दिल्याची चर्चा आहे.